अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दिल्लीमध्ये निधन झालं आहे.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. मनमोहन सिंह यांची कारकीर्द
प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. आता त्यांचं निधन झालं आहे. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली.
सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर 2009 साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. त्यांच्या कारकीर्दीत त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अनेक महत्वाच्या पुरस्कारांपैकी भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार(1987), भारतीय विज्ञान कॉंग्रेस मध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्म शताब्दी सन्मान(1995), अर्थ मंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड (1993 व 1994), केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार (1956), केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार आहेत. याशिवाय जपान निहोन कायझाई शिम्बून सारख्या अनेक संस्थांनी डॉ. सिंग यांना सन्मानित केले आहे. केम्ब्रिज व ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठांकडूनही डॉ सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे . डॉ. सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी 1993 मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली.
पद्मश्री आनंद कुमार यांनी केला प्रा. गणेश करे पाटील यांच्या कार्याचा गौरव
सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.
सन 1996 साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली यूपीएची सत्ता आल्यानंतर ड. मनमोहन सिंह यांनी देशाचे 13 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं. एप्रिल 2024 साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली.
सन 1991 सालाच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आलं. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली.