*दहावीच्या बोर्ड परीक्षा शांततेत सुरू*
केत्तूर (अभय माने) शिक्षण हे केवळ गुणासाठी नसून ते ज्ञानवृद्धी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. विद्यार्थी म्हणून तुमच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. परीक्षा काळात तुम्ही भयमुक्त, कॉपीमुक्तला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असे मत प्राचार्य काशिनाथ जाधव यांनी व्यक्त केले.
केत्तूर (ता. करमाळा) येथील नेताजी सुभाष विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या केंद्रावर आज शुक्रवार (ता. 21) रोजी दहावीच्या बोर्ड परीक्षा सुरू झाली. यावेळी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील दहावीची परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा असून विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून ताण तणाव न घेता आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरे जावे असे आवाहनही करण्यात आले. यावेळी सरपंच सचिन वेळेकर, राजाराम माने,राजेश कानतोडे,विकास काळे,निवास उगले यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
हेही वाचा – शहीद जवान नवनाथ गात यांचा वरकुटे येथे 2 मार्च रोजी स्मृतीदिन विविध कार्यक्रमाचे आयोजन
नेताजी सुभाष विद्यालय केत्तूर नं.2 (ता. करमाळा) या परीक्षा केंद्रावर येथे एसएससी केंद्र क्रमांक 3044 परीक्षेला शांततेच्या वातावरणात सुरुवात झाली.या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी 317 विद्यार्थी प्रविष्ट असून 13 खोल्यामधून सदर परीक्षेचे नियोजन केले गेले आहे. केंद्र संचालक म्हणून प्राचार्य काशिनाथ जाधव व उपकेंद्र संचालक म्हणून भीमराव बुरुटे व किशोर जाधवर हे काम पाहत आहेत. सदर केंद्रावर केतुर नं.2, कोर्टी, कुंभारगाव, सावडी, भिलारवाडी, कात्रज येथील विद्यालयाचे विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून परीक्षा देत आहेत.