श्रीराम प्रतिष्ठान करमाळा आयोजित भव्य-दिव्य सामुदायिक विवाह सोहळा ४ फेब्रुवारीला,नागरिकांनी मोठ्या संख्येने शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित रहावे : गणेश चिवटे
करमाळा :- श्रीराम प्रतिष्ठान,करमाळा आयोजित भव्य-दिव्य सामुदायिक विवाह सोहळा रविवार दि.४ फेब्रुवारी रोजी सायं.६.०० या गोरज मुहूर्तावर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानात पार पडणार आहे व याची सर्व पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती भाजपचे जि. सरचिटणीस तथा श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश (भाऊ) चिवटे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,श्रीराम प्रतिष्ठान दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करत असते याचाच भाग म्हणून गत वर्षी २१ जोडप्यांची सामुदायिक लग्न लावून देण्यात आली होती.ही परंपरा कायम ठेवत या वर्षी ३१ जोडप्यांचा विवाह भव्य दिव्य अशा वातावरणात पार पडणार आहे.
या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी खालीलप्रमाणे तयारी करण्यात आली आहे.
मंडप व्यवस्था :- या लग्न सोहळ्यासाठी भव्य मंडप व्यवस्थेचे नियोजन केले असून वऱ्हाडी यांना आरामात बसण्यास बैठक व्यवस्था करण्यात आली आहे,३१ जोडपी, त्यांचे कुरवले, मामा -मामी यांच्यासाठी भव्य मजबूत स्टेज निर्माण करण्यात आले आहे,या विवाह सोहळ्यासाठी नव वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक मान्यवर येणार आहेत त्यांची vip बैठक व्यवस्था करण्यात आली आहे,वधू वरांचे मामा -मामी व आई-वडील यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.विवाहस्थळी उच्च प्रतीचे साउंड सिस्टीम व्यवस्था करण्यात आली आहे तसेच करमाळा शहरात विविध ठिकाणी वऱ्हाडीच्या स्वागतासाठी निमंत्रण-स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत.तसेच वऱ्हाडीच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा सिस्टीम लावण्यात आली आहे.
परण्याची व्यवस्था – वरांचे परणे काढण्यासाठी भव्य तयारी करण्यात आली असून सर्व ३१ वरासाठी घोडे,उंट यांची व्यवस्था करण्यात आली आहे. २ बेंजो वाद्याच्या गजरात घोडे,उंट यावरती बसून फटाक्यांच्या आतिषबाजीत सर्व वरांची करमाळा शहरातून वरात काढण्यात येणार आहे. यावेळी वरांना श्रीरामभक्त हनुमान यांचे दर्शनासह छ. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही आशीर्वाद घेता येणार आहेत.
जेवण व्यवस्था :- ३१ नव वधूवरांच्या गावाकडील वऱ्हाडी,त्यांचे सर्व पाहुणे रावळे,मित्र मंडळी,करमाळा शहर-तालुक्यातील विविध मान्यवर यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत.या सर्वांची जेवणाची व्यवस्था विवाहस्थळी करण्यात आली असून सकाळी ११ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत सर्वासाठी जेवण्याची व्यवस्था स्वतंत्र कक्षात करण्यात आली आहे.यामध्ये १५ हजार वऱ्हाडीना भात-भाजी,पुरी,मटकी,बुंदी या जेवणाचा आस्वाद मिळणार आहे.
शुभाशीर्वाद – सर्व नव वधुवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक मान्यवर येणार आहेत.यामध्ये वारकरी सांप्रदायतील अनेक नामांकित महाराज मंडळी व वरिष्ठ पातळीवरील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
वधूवरांना स्वतंत्र जानवसे – विवाहस्थळी वधूवरांना स्वतंत्र जानवसघरांची व्यवस्था करण्यात आली आहे.यामुळे त्यांना विवाहपूर्व तयारीसाठी प्रायव्हसी मिळणार आहे.तसेच प्रत्येक जोडप्यासाठी एका मदतनीसाची श्रीराम प्रतिष्ठान तर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.
भेटवस्तु – प्रत्येक वधूवरांना संसारउपयोगी अनेक भेटवस्तु देण्यात येणार आहेत यामध्ये सोन्याचे मणीमंगळसूत्र,भांडी सेट,नवरीला २ चांगल्या प्रतीच्या साड्या, चप्पल, मेकअप साहित्य किट,,नवरदेवाला सफारी व एक ड्रेस,बूट इत्यादी भेटवस्तु देण्यात येणार आहे.या विवाह सोहळ्यात नव वधुवरांच्या सर्व इच्छा,अपेक्षा उच्च प्रतीच्या पूर्ण करण्यात येणार आहेत.
श्रीराम प्रतिष्ठान गेली तब्बल १३ वर्षे करमाळा शहरातील गोरगरीब गरजू वृद्ध लोकांना दोन वेळेचे ताजे भोजन देत आहे.याबरोबरच बाहेरगावाहून करमाळा शहरात रूमवर राहून शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना रात्रीचे जेवण देत आहे. सांगली-कोल्हापूर पूर परिस्थिती वेळी ही प्रतिष्ठानने तेथील लोकांना मोठी मदत केली होती.आता या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे श्रीराम प्रतिष्ठान म्हणजे करमाळा तालुक्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला आहेत.या सर्व सामाजिक कामाबद्दल प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे.या शुभविवाहप्रसंगी नववधुवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे आवाहन श्री चिवटे यांनी केले आहे.
Comment here