समांतर जलवाहिनीचे काम १८ महिन्यांत करणार पूर्ण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापुरात प्रतिपादन, वाचा सविस्तर..
सोलापूर(प्रतिनिधी);
सोलापूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असून आगामी १८ महिन्यांमध्ये समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हातर्फे संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलन गुरूवारी हेरिटेज लॉन येथे झाले. यावेळी श्री. फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील, खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते – पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, जयवंत थोरात, शशिकांत चव्हाण, धैर्यशील मोहिते – पाटील, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अक्कलकोट आणि पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करून त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी राज्यातील सर्वात मोठा २ हजार ७०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून त्याचे तीन डिझाईन अंतिम टप्प्यात आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन हे काम करण्यात येणार आहे.
सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी समांतर जलवाहिनीसाठीची निविदा काढली होती. परंतु गेल्या अडीच वर्षात या कामाचा सत्यानाश करण्यात आला. आता सरकार आल्यानंतर पुन्हा या कामाला गती देण्यात येणार असून ६०० कोटींची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. याशिवाय ३९४ कोटी रुपयांचे गॅप फंडिंगही देण्यात येणार आहे, अशी घोषणादेखील श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.
देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वैश्विक नेतृत्व लाभले आहे. पण देशाचा विकास पाहून काहींच्या पोटात दुखत आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडीत काढली आहे. त्यामुळे ज्यांची दुकाने बंद होत आहेत ते आता भाजप आणि मोदी सरकारवर टीका करत आहेत. परंतु भारतातील महाराष्ट्रासह भारतातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशीच राहणार आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजप सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचा परिणाम म्हणून सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख १७ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. यातून फळबागा विकसित झाल्या आहेत टेंभू योजनेला चालना दिल्यामुळे ५० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. आगामी काळात महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंडित वीज देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षात शासन १० लाख घरे बांधणार आहे. राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून सोलापूर जिल्ह्याला तब्बल ४१५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी९ वर्षांत केलेली विकासकामे सामान्य माणसापर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी पोहोचवावीत. बूथ प्रमुख रचना, पान प्रमुख रचना बळकट करून आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी प्रास्ताविक तर संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
Comment here