🌹🌹🌹 जुनं खोड 🌹🌹🌹
************
अजून पण काही ठिकाणी एखादं मोठं लग्नकार्य असू द्या लगीन घरी एक प्रसंग खूप बघण्यासारखा असतो तो म्हणजे वधू पक्ष असो का वर पक्ष असो त्या घरातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणजे आजी किंवा आजोबा यांना विशेष मान असतो बाहेर गावाहून आलेले प्रत्येक जण त्यांच्या पायावर आदराने डोके ठेवून आशीर्वाद घेत असतात याला कारण काय तर नातेवाईकात… पाहुणेरावळे किंवा गणगोत म्हणजे बहीण भावंडांमध्ये असणारं ही जुनं आता काय बघा एवढेच जुनं कोड राहिलयं असं म्हणून त्यांची एक प्रकारे मायेने केलेली स्तुती वाटते
अन असंच एखादं दुसरे उदाहरण म्हणजे एखादा निर्णय संबंधित लवकर घेऊ शकले नाही किंवा तोडगा काढू शकले नाही तिथे हे आजोबा किंवा आजी त्यांच्या निर्णयाला सर्व मतांनी संमती दिली जाते तेव्हा कौतुकाने म्हणतात उगाच नाही पांढरे केस झाले आणि अन ह्या काय दोन बोटात धरून काढलेल्या सुरकुत्या नाहीत तर चांगलं मुरलेलं लोणचं आहे 10-20 उन्हाळं पावसाळं…उन सावली बघितलेली आहे आणि कित्येक कलागती मिटवण्यात आल्यात म्हणजे यांना सर्व प्रकारचा अनुभव आहे असं वाटतं मला तर वाटतं प्रत्येकाच्या घरामध्ये एखादं तरी म्हातारं माणूस असावं आणि अजूनही एक महत्त्वाचं म्हणजे घरातली चिल्लर पार्टी म्हणजे नात किंवा नातू मग ती मुलाची असो किंवा मुलीची असो त्यांचे आईबाप त्यांचे अतोनात लाड सुद्धा करतील पण आजी आजोबा काकणभर अजून जास्तच करतील त्या चिल्लर पार्टीला पण आईबापापेक्षा आजी आजोबा यांचं एक वेगळच आकर्षण आणि कौतुक असतं खरं बघितलं तर एखादं तरी म्हातारं माणूस घरात असावं असं म्हणतात ते अगदी खरं आहे आता गावचा एक पार असावा तिथे दोन-चार आजोबा बसलेले असावेत म्हणजे त्यांचा तो ठियाच म्हणावा लागेल त्याचे समकालीन मित्र ही त्यांची एकजूट अक्षरशः रक्ताच्या नात्यासारखी घट्ट असते म्हणजे 70 वर्षांपूर्वी केलेलं विणकाम म्हणावं लागेल.
पारावर बसल्यावर जोडीदार आल्याशिवाय समोरच्या टपरीवरचा कटिंग चहा सुद्धा मागवणार नाही एवढं प्रेम समोरचा रस्त्याने चाललेला माणूस किंवा गावात कुठे काय चाललंय याची खडान खडा माहिती असणारा आपल्या गावचा साक्षात सी सी टी व्ही कॅमेराच म्हणावा लागेल आता ही वयस्कर मंडळी म्हणजे आजीचचं बघा ना शक्यतो इरकली लुगडं उच्च राहणीमानाचे लक्षण हिरव्या लाल रंगाची ठराविक पॅटर्नची डिझाईन असलेली नऊवारी इरकल लुगडी…अंगात चोळी… हा तिचा पेहराव कपाळावर… हनुवटीवर तसेच दाढीवर गोंदणाचे दोन चार ठिपके तिच्या गोरेपणामध्ये सौंदर्यात आणखीनच भर घालायचे पायात नेहमी बांधून घेतलेल्या चमड्याच्या जुन्या वळणाच्या वाहणा…हातात छत्रीची वर वाकडी झालेली काठी… आता आजीचं वय असतं साधारण 70 वर्षाचं उन्हा पावसात त्वचा रापलेली असल्यामुळे निसर्गानं एक सुरकुत्यांचे डिझाईनच तिच्या चेहऱ्यावर रेखाटलेलं असतं पितळी खलबत्त्यात कुटलेलं पान खाऊन ते लालसर झालेले ओट विलोभनीय दिसतात आणि भरपूर लाड…कोडकौतुक व्हायचं पण शिस्त फार कडक असायची घरातील सगळ्यांना सगळी काम करता आली पाहिजे तिने केलेल्या कामाची वाटणी असायची
आपल्या सुनानां किंवा नात सुनानां आलटून पालटून काम करायला लावायची गल्लीतल्या बायका दुपारी गप्पागोष्टी करायला यायच्या आणि व्हायचं काय तर आजीचं प्रशासन म्हणावं त्यापेक्षा खूप पावरफुल असायचं सगळेच जण नियमानं शिस्त पाळायचे अन आजोबाचं म्हटलं तर त्यांचा काही पण त्रास नसायचा एखादं दुसरं नातवंडं घेऊन आपलं सकाळीच देवदर्शन म्हणजे दोन-चार देवळात जाऊन…थोडं पारावर शिनं पाकच्या दोस्तात बसायचं एवढं करूस्तवर दुपारी बारा एक झालेले असतात जाताना नातवासाठी बरोबर एक दोन कुरकुऱ्याची पाकीटं…आणि आपल्यासाठी व घरच्यांसाठी दहावीस रुपयाची कांद्याची गोलभजी त्या काळ्या कॅरी बॅगमधी घेऊन घरचा रस्ता धरायचा हे आमच्या आजोबाचा पुण्यातील ताडीवाला रोड परिसरातील रोजचा कार्यक्रम असायचा काही ठिकाणी तर आईबाप दोघंपण नोकरीवर जातात त्यामुळे घरी मुलांची काळजी घेणारे कोणीही नसतं मुलांची तशी आबाळ होत असते त्यांचं खाणंपिणं त्यांचा अभ्यास वगैरे बाबीकडे लक्ष देणारं कोणीही नसतं अशा स्थितीमध्ये घरी आजी आजोबा असतील तर ते मुलाकडे लक्ष देऊ शकतात आजी आजोबांना समाधान पण मिळतं पगारी माणसं घरातल्या माणसाप्रमाणे काळजी घेऊ शकत नाहीत म्हणून आजच्या काळात खरं बघितलं तर एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा होऊ शकतो.
आजी बद्दल म्हणाल तर आजी म्हणजे पर्वताच्या रांगेमधला उठून दिसणारा सुळका असतो रात्रीच्या आभाळभर चांदण्यातला रुपया म्हणजे चंद्र असतो भले आजी शरीर थकल्यामुळं काही काम करू शकत नाही पण तिचं अस्तित्व हे घराचं अस्तित्व असतं आजी म्हणजे घराच्या कडीला लावलेलं कुलूप असतं आजी म्हणजे पायरीमधली नातेवाईकांची पहिली पायरी असते आणि तिच्यापासून बाकीच्या सगळ्या पायऱ्या वरपर्यंत चढत जातात आजी म्हणजे आपल्या घराच्या प्रतिष्ठानचं विश्वस्त असतं कदाचित आजही परिसरातील कित्येक महिला मंडळाची अनुभवी सल्लागार असते खरं म्हणजे आजीचं रूप आठवावं आणि साठवावं तेवढं थोडंच असतं कुठे कुठे तर म्हणे जिथे कुठे डॉक्टर दवाखाने नसतील तिथे आजी म्हणजे
एम बी बी एस असते तिच्या अनुभवाच्या आधारावर उंबऱ्याच्या आतले रोग आणि त्यांचे उपचार ही एक विशेष समीकरण असतं सर्दी खोकला झाल्यावर आजी पॅरेसेटमॉल किंवा ब्रुफिन देणार नाही पण फडक्याच्या पुरचुंडीत ओवा बांधून तापल्या तव्यावरची गरम वाफ पुरचुंडीने कपाळ आणि बाजूचं काना जवळचं आखाळ थोडासं शेकून किंवा एखंड नाही तर अर्ध्या कप दुधात हळद उकळून प्यायला देणार त्यापासून ते खेडेगावच नाही तर वाडी वस्तीवरील बाळंतपणापर्यंतची सगळी समाजकार्य करणार पहिलं काय फोन किंवा मोबाईल नव्हते माणसाकडून आलेला सांगावा आणि सांगितलेलं पथ्य पाळलं की दुखणं पळालं म्हणून समजा असा किती तरी अनुभव आजी आजोबांच्या पाठीशी असतो
*************************************किरण बेंद्रे
घावटे वस्ती… कमल कॉलनी… पुणे
7218439002
Comment here