मृग नक्षत्र कोरडे चालल्याने खरीप हंगाम धोक्यात: करमाळा तालुक्यातील शेतकरी हवालदिल, वाचा सविस्तर
करमाळा (अलीम शेख);
गेल्या मे महिन्याच्या कडक उन्हाच्या तडाक्यातून संपूर्ण तालुका होरपळून निघालेला आहे. रोहिणी नक्षत्रातल्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्याने तालुक्यातील पश्चिम भागात थैमान घालून कोट्यवधी रुपयांचे फळबागांचे नुकसान केले होते. यातून शेतकरी सावरत असतानाच आस्मानी संकटाची मालिका अन्नदाता शेतक-यांच्या मुळावर उठली आहे.
सध्या मृग नक्षत्र निघून आठवडा उलटला आहे. तरीही पाऊसाचा पत्ता नाही. या पावसाने हुलकावणी दिलेली आहे. सध्या उन्हाचा पारा मे महिन्याहून अधिक तापत आहे. त्यामुळे पूर्व भागातील शेतक-याचे आभाळाकडे लक्ष लागले आहे.
मृग नक्षत्र कोरडे चालल्याने खरीप हंगाम मात्र आता धोक्यात आला आहे.
मृग नक्षत्राची पेर ही 21 जून पर्यंत आहे. मृग नक्षत्रातातील पेर हे खरीप हंगामात महत्त्वाची मानली जाते. मृग नक्षत्रात झालेली पेरणी मुळे येणारे उत्पन्न निरोगी व उत्पादन भरपूर होते. यामध्ये उडीद, मुग ,मटकी, चवळी आदि कडधान्याची पेरणी केली जाते.
तसेच मृग नक्षत्रानंतर मका, कडवळ, कांदा याबरोबरच केळी तसेच ऊसाचीही लागण मोठ्यापर्यंत प्रमाणात केली जाते. पण मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर नाही झाल्यास खरीप हंगामातील पिकांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मृगातील पाऊसाची पेरणी महत्वपूर्ण ठरते.
पण मृग नक्षत्रातील पाऊसाने उशीर केल्यास खरीप पिकांना नुकसान होते हा अनुभव आहे .मृग नक्षत्रानंतर खरीपाची पिके येत नाहीत किंवा उत्पन्नात घट होते व पुढील रब्बी हंगामातील पिकांना त्याचा फटका बसतो. खरिपाच्या अडीच तीन महिन्यातील पिकाच्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येतात.
त्या जोरावर रब्बी हंगामातील पिकांच्या तयारीला तो लागतो. त्यामुळे शेतक-याना खरीप हंगाम हा तारणारा असुन त्याची सर्व भिस्त मृग नक्षत्राच्या पावसावर अवलंबून आहे. अन्नदाता शेतकरी आता खरीप हंगाम वाया जातो की काय या विवंचनेत असुन मृगाचा पाऊस कधी पडेल याकडे देव पाण्यात ठेवून बसला आहे.
मृग नक्षत्राचा पाऊस आठवड्यात पडला नाही तर खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात येणार आहे. पिकांची पेरणी होणार नाही. खरीप हंगामात उडीद , मुग, मटकी, चवळी, तिळ आदि बियाणाची पेरणी केली जाते. एकतर ऊसाचे बिल कारखान्याने दिले नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यापूर्वीच केळीचे वादळामुळे सगळीकडे नुकसान झाले आहे. त्यामुळे चिंता वाटत आहे.
– दिपक गायकवाड, शेतकरी, पिपंळवाडी,
Add Comment