करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील पाणी व चारा टंचाईची वरून पाटील गटाने केले आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर ‘हे’ आरोप
करमाळा {प्रतिनिधी};
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे मागील आवर्तन वेळे आधी बंद केल्यामुळेच पूर्व भागात पाणी व चारा टंचाईची संभाव्य परिस्थिती निर्माण झाली, असा घणाघाती आरोप पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला.
आज महसूल विभागाच्या वतीने चारा व पाणी टंचाई आढावा बैठक होत असून त्यापूर्वी पाटील गटाकडून दहीगाव उपसाचा मुद्दा अधोरखित करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की सन 2016 ते 2019 या कालावधीत तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सुद्धा दाहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन दिले.
त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील पाणी साठे भरून राहिले व चारा आणि पाणी टंचाई निर्माण झाली नाही.माजी आमदार पाटील यांच्या कुशल नियोजनामुळे उजनीची पाणी पातळी कमी होण्यापूर्वीच करमाळा तालुक्याला पाण्याचा लाभ घेता आला. त्यांच्या आमदारकीच्या कालावधी मध्ये दहिगाव उपसाची दीर्घ काळ चालू असणारी मोठी आवर्तनं दिली गेली.
आता आमदार संजयमामा शिंदे यांच्या कालावधीत वेळेपूर्वीच दहीगाव उपसाचे आवर्तन बंद का होते ? दोन्ही पंप हाऊस मधील सर्व पंप पुर्ण क्षमतेने का सुरू केले जात नाहीत ?
नुकत्याच झालेल्या उजनी पाणी नियोजन अर्थात कालवा समितीच्या बैठकीत विद्यमान आमदार महोदय उपस्थित होते का ? सदर बैठकीत दहीगाव उपसा व सिना भीमा जोड कालव्यातून पाणी सोडण्यात यावे असा आग्रह धरला गेला का ? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली तर बरे होईल. विभागीय बैठकीला गैरहजर असाल तर
किमान तालुका कालवा समितीची बैठक तातडीने होणे गरजेचे आहे.
करमाळा तालुक्याला लाभलेल्या उजनी, कुकडी व सीना कोळगाव यांचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेतला तर चारा व पाणी टंचाई संकट उभा राहणार नाही. माजी आमदार नारायण पाटील यांच्या कालावधी मध्ये कुकडीची जवळपास सतरा आवर्तनं तालुक्यात आली होती.
पाण्याचं प्रमाण कमी अधिक असेल पण पाणी मिळणं महत्त्वाचं ठरलं.दहीगाव उपसाच्या माध्यमातून पूर्व भागातील लहान मोठे पाणी साठे भरून घेतले गेले.आज कित्येक शेतकऱ्यांनी वीज बिल v पाणी पट्टी भरूनही त्यांना दहिगावं उपासाचे पाणी मिळाले नाही.
घोटी, नेरले, वरकुटे, मळवडी पाथर्डी, साडे, सालसे, कोंढेज यासह पूर्व भागातील अनेक गावातील तलाव व बंधारे वेळीच भरून घेतले असते तर याचा परिणाम पूर्व भागातील विहारी व कूपनलिका यांच्या पांच्या भूगर्भातील पाणी पातळी वर झाला असता व पाणी टंचाई प्रश्न इतका दाहक वाटला नसता.
माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा मतदार संघातील कमी पाऊस, पाणी टंचाई, चारा टंचाई, खरिपाची पिके वाया जाणे आणि पीक उत्पादनात झालेली घट या सर्व बाबीची तपशीलवार माहिती शासनाकडे पाठवली असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या मागणीचे निवेदन सादर केले असल्याचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.
Comment here