आम्ही साहित्यिकमहाराष्ट्र

* ऐरणीच्या देवा तुला *

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

* ऐरणीच्या देवा तुला *
…………………………
तसं बघायला गेलं तर तो काळ होता 1970 -72 चा त्याकाळी मनोरंजनाचं साधन असं काहीच नव्हतं गावात एखादा दुसरा रेडिओ असायचा बस एवढच मला चांगलं आठवतंय तो काळ म्हणजे आर्थिक दृष्ट्या कमकुवत होता बाजार मूल्य जरी वाढलेलं नसलं तरी उत्पन्नाचं स्त्रोत पण वाढलेलं नव्हतं मला आठवतंय माझा बाप रेल्वेत नोकरीला होता बेसिक फिटर म्हणजे पंप ड्रायव्हर 210 रुपये बेसिक महागाई धरून 250 ते 300 रुपये पगार पडायचा दिवाळीचा बोनस साधारण तीनशे रुपयांच्या आसपास मिळायचा तेवढ्यात चार भावंड…आई बाप… आजा आजी… आणि एक आत्या…या सगळ्यांची दोन दोन जोड कापडं…दिवाळीच्या फटाकड्या…दिवाळीचे सामान… दोन-चार दिवस फटाकडे उडवून बचकभर फटाकड्या तुळशीच्या लग्नापर्यंत काढून ठेवायच्या…एवढी बरकत होती पण मला कंपनीमध्ये 28 हजार रुपये बोनस मिळाला कपडा लत्ता आणि दिवाळी पण काटकसरीनेचं करावी लागली तवा आपला बाप तीनशे रुपयांच्या बोनस मध्ये एवढ्या शान मधी कसा दिवाळी साजरी करत असेल डोळ्यात टचकन पाणीच आलं राव…
असो गावात त्यावेळी इन मीन चार-पाच रेडीओ होते एक ग्रामपंचायतचा… दुसरा बदडे सरांचा…तिसरा सय्यद मास्तरचा…चौथा बेंद्रें कडे पाचवा होता कोळसावाल्या पांडु रासकरकडे पण मी त्यावेळी मराठी सातवीला असेल अकरा वाजता घरी आलं की रेडिओवर कामगार सभा लागलेली असायची तशातच आमच्या आईची स्वयंपाकाची घाई आणि दिलेली ती खमंग फोडणी अन उठलेला तो ठसका आजही आठवलं तर मन कसं मोहरून जातं आणि रेडीओवर ते ठराविकच गाणं नाच रे मोरा… ऐरणीच्या देवा तुला… बाई मी विकत घेतला शाम… नाहीतर नाचतो डोंबारी…या गाण्याची त्या वेळेला हवा होती तर अशी करमणूक असायची आणि शनिवारी संध्याकाळी लोकनाट्य तमाशा आणि बुधवारी रात्रीची बिनाका गीतमाला अमीन सयानीचा तो दर्दभरा आवाज ऐकून गाव रेडिओच्या भवताली जमा व्हायचं आणि खरंतर या लेखाचा जन्म इथं झाला आतापर्यंत आपण गाव पातळीवरील समाज घटक म्हणजे बारा बलुते अन अठरा आलुते यावर विचार केला त्याचे पैकी लोखंड आणि आगीशी अगदी जवळच नातं असणारा माझा लोहार समाज खरचं त्याचं कौतुक वाटतं एवढं कणखर लोखंड पण त्याच्या मनाप्रमाणे अक्षरशः म्हणेन तसं वागतंय हाय का नाय कमाल
आपला देश हा शेतीप्रधान देश आहे अन शेतकरी म्हटलं की विविध प्रकारची साधनसामुग्री आणि लोखंडाची म्हटल्यावर अगदी खुरपं विळ्यापासून… बैलगाडीच्या चाकाची धाव…नांगराचा फाळ…किंवा अनेक प्रकारचे सामान पूर्वी लोहार याची निर्मिती करायचा नंतरच्या काळात मशिनरीवर करायची उत्क्रांती झाली तर असा हा समाजातील घटक जो गावाशी आणि शेतकऱ्याशी कायम जोडलेला असायचा एवढेच काय चावडीसारखं प्रतिष्ठिताचं थांबण्याचं गावातलं एकमेव असं ठिकाण असायचं कारण आमच्या गावचे लोहार दादा म्हणजे कमावलेलं शरीर…

दंडावरच्या बेटकुळ्यावर शोभून दिसणारा लाल दोऱ्यातला ताईत…नजरेत भरायचा अंगात सदराचं काय पण कोपरी पण नसायची आणि त्याची कारभारीण नाहीतर पोरगं तापलेल्या लोखंडावर घन मारायचं आणि तो जबरदस्त भाता दोन पाट्या कोळसा पण पाच मिनिटात लालबुंद करायचा खरंच नवल होतं आता या बलुतेदाराचं वैशिष्ट्य म्हणजे आलेला मेहनतीचा पैसा ते त्यांच्या ऐरणीला… हातोड्याला… सुताराच्या रंद्याला…सोनाराच्या पेटीला…स्पर्श करूनच गल्ल्यात नाहीतर खिशात ठेवायचे कारण त्यांचे ते दैवत असते
खरं म्हणजे त्यांचा तो देव सगुण साकार आहे जो कुठल्याही देव्हार्‍यावर अदृश्य नाही तर त्याच्या समोरच ऐरणीच्या रूपात त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटवत आहे त्याच्या पूजेमध्ये कसलेही अवडंबर म्हणजे कसल्याही प्रकारचा शो नाही उदबत्ती…निरांजन…ओवाळणी…फुलं.. नैवेद्य…वगैरे काही नाही पण कष्टाने मारलेल्या प्रत्येक घावागणिक उडणाऱ्या ठिणग्यांची अग्निपुष्पे अर्पण करतो आपल्या कर्मावर श्रद्धा दाखवून प्रामाणिकपणे कष्ट करायची तयारी असते आणि या देवाला कामावर कृपा दृष्टि ठेव अशी विनवणी करतात धंद्यात भरभराट होऊ दे अशी त्यांची देवाकडे मागणी असते आणि आणखी एक विशेष म्हणजे हे जरी काम करताना भारी भारी कपडे घालत नसतील क्वचित प्रसंगी आहे तेच आणि खाण्यापिण्याची म्हणजे पालावरचं कायम काम करणारं जीणं म्हटल्यावर वेळच्यावेळी टायमावर आपल्यासारखा स्वयंपाक पाणी नसेल थोडीशी आबाळ पण होत असेल आणि अतोनात कष्ट कामाच्या रूपाने वाट्याला येत असेल तरी हरकत नाही असं असलं तरीही हा लोहार दादा यातून मार्ग काढून सुख साध्य करतो हे विशेष
आणि त्याच्या मनगटात बळ येऊ दे हेच मागणं तो त्या ऐरणीच्या देवाला करीत असतो आणि या सर्व प्रसंगातून त्याची कारभारीन त्याच्या खांद्याला खांदा लावून घन मारण्यासारखी अंग मेहनतीची काम करून त्याला साथ देत असते आणि आपला संसार गाडा सुखाने हाकत असते हे खरे वंदनीय आहे खरं तर हे निर्धन निराधार आयुष्य जगत असतात कारण सकाळी उठल्यापासून रात्री धरणीला पाठ लावूस्तवर सर्व कारभार या पालातून चालतो हे विशेष आणि हे कारागीर कायम पैशाला म्हणजे लक्ष्मी देवीला आम्ही केलेल्या कामाचं…कष्टाचं चीज होऊ दे पैसा आमच्याकडे येऊ दे आणि मुक्कामाला राहू दे अशी विनंती करतात आणि तुझी कृपा या भात्यातील वाफेसारखी कायम तेवत राहू दे म्हणजे आमचा हा भाता… ऐरण हातोडीचं काम अखंड चालू राहावं यासाठी विशेष परिश्रम घेतात खरंतर गरीबाच्या अन कष्टकऱ्यांच्या वाट्याला तसं तर सुख कमी अन दुःख जास्त हा तर निसर्ग नियम आहे
उपेक्षित किंवा अशा या गरीब कलाकारांचे शोषण करण्यासाठी दुनिया ही दबा धरून बसलेली असते आणि तिकडं मॉलमध्ये गेल्यावर मागल ती किंमत जी एस टी सकट गुपचूप देतील पण माझ्या लोहार दादाच्या मजुरीमध्ये घासाघिस करून नाहीतर आता एवढे घे बाकी नंतर बघू असं त्याची इच्छा नसताना उधार ठेवतील कारण त्याची कुठे ना नोंद…ना कुठली डायरी… सारा दैवावर हवाला आणि तेवढ्यात चार दोन खुरपी भट्टीत तापलेली दिसली ऐरण हातोडीचा आवाज घुमायला लागला तर ह्याला काय कमी आहे असं म्हणायला मोकळं तर असलं ही गाव आता बघा तसं बघायला गेलं तर आपली भावकीच आपल्याला एखाद्या टायमाला त्रासदायक ठरते तर ती कशी आपण पाहू सोनार आणि लोहार आपापली काम करताना सोन्याच्या कणाची आणि लोखंडाच्या कणाची गाठ पडली तर कसा काय कोण जाणे तेव्हा सोन्याचा कण लोखंडाच्या कणाला खूप दिवसाची ओळख असल्यासारखा बोलू लागला.

सोन्याचा कण म्हणाला आपलं दोघांचं दुःख सारखं आहे म्हणजे बघ आगीत लालबुंद तापायचं आणि ऐरणीवर ठेवून हातोडीने आपल्यावर घाव घालायचे तर लोखंडाचा कण म्हणाला तुझं तर लय बरं आहे बाबा पण माझं म्हणजे भाऊबंदचं म्हणजे लोखंडाची ऐरण आणि लोखंडाचाच हातोडा वरून खालून माझ्यावर घाव घालतात तर आपण या समाजा विषयी जरासं
लोहार समाजामध्ये लोहार…गाडी लोहार… पांचाळ…नालबंदी…घिसाडी…या पोटजाती आहेत कोकणामध्ये मानवाचार्य लोहार… विदर्भामध्ये मनु पांचाळ… मराठवाड्यात मनु लोहार…अशा पोटजाती व पोट शाखा आहेत तर खरं बघितलं तर लोहार हा शेतकऱ्यांचा जिवलग मित्र पावसाळा सुरू व्हायच्या आधी विळे… टिकाव…खुरपी… फावडी…कुऱ्हाडी…प्राण्यांच्या खुराना ठोकायची नाल… बैलगाडीच्या चाकाची लोखंडी धाव…पाण्याच्या मोटी…नांगराचे फाळ.. कुदळी…पहारी…या पारंपरिक अवजारांची दुरुस्तीची लगबग सुरू व्हायची बांधकामाची घमेली…थापी…घरगुती…कढ्या…चिमटे…झारे सांडशी…वगैरे वापराच्या लोखंडी वस्तू यापूर्वी लोहार बनवायचा आमच्या गावात वेशीच्या आत त्या पंचायतीच्या पारासमोर मोठे चिंचेचे होतं त्याच्या खालीच म्हणा पुढे ताडपत्रीचं पाल… मोठा भाता…पुढे भट्टी… रसरशीत निखारे आणि भट्टीला हवा देण्यासाठी भात्याला जोडलेला बांबू आणि खाली ओढायसाठी त्याला लावलेली साखळी आणि छोटीशी लाकडी मुठ भट्टीच्या बाजूलाच ऐरण…मोठे लांब चिमटे…हातोडा…घन कानस…आणि दोन-चार छन्न्या… व पोगर… यासारखी अवजारे भट्टीच्या तडतड उडणाऱ्या ठिणग्या आणि त्या पसाऱ्यात घामाघुम झालेला माझा लोहार दादा जणू काळ्या कातळातली हलती डुलती मूर्ती गरम केलेला लोखंडाचा तुकडा आणि त्याच्यावर घनाघाती यंत्राप्रमाणे ठोके मारणारी आणि घामात निथळणारी माझी लोहारीण माय हे दृश्य म्हणजे एखाद्या निष्णात पेंटर कलाकाराच्या हातून साकारलेली पेंटिंग सारखीच सशक्त जिवंत कलाकृती

हेही वाचा – भाजप खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आमदार संजय मामा शिंदे यांनी काढले तिकीट; निवडणुकीच्या तिकिटांच काय?

………… मळदचा जागरण गोंधळ……………. ( एक अनुभवलेलं देवकार्य ) ***********

बरं तसं बघायला गेलं तर लोहार हा नुसता शेतकऱ्यांचाच नाही तर बारक्या पोरांचा पण दोस्त बरं का त्यांना पण तेवढाच जवळचा उन्हाळ्याच्या सुट्टीत भोवरा प्रिय आणि जाळी दुकानात घ्यायची पण लोहाराकडे जाऊन खप्पड आरी बसवून घ्यायची मज्जाच न्यारी या खेळाचे विशेष असे शब्द म्हणजे खप्पड आरी… जाळीवरचा हात…धप्पल आरी…मध्ये दोन प्रकार एक टोकदार आणि दुसरी खप्पड म्हणजे स्क्रू ड्रायव्हर सारखी अणुकुचिदार धार पण आधुनिकीकरणामुळे हे समाजातील घटक दिसायला सुद्धा दुर्मिळ झालेत एवढेच काय आता ही कलाच हळूहळू लोप पावती का काय असं कधी कधी वाटतं
*************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here