श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम येथे ‘ग्रंथ विद्यार्थ्यांच्या हाती’ हा नवोपक्रम संपन्न
करमाळा (प्रतिनिधी): – भारताचे थोर शास्त्रज्ञ ‘ मिसाईल मॅन ‘ , माजी राष्ट्रपती डॉ.श्री ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी इयत्ता अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून *ग्रंथ विद्यार्थ्यांच्या हाती* हा उपक्रम राबविण्यात आला.
श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या नूतन विद्यार्थ्यांना त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी, त्यांना स्पर्धा परीक्षेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, त्यांच्यात ज्ञान , विज्ञान आणि सुसंस्कार हे जीवनाचे तत्त्वज्ञान रुजवण्यासाठी, त्यांना सुविचार ज्ञात होण्यासाठी, त्यांच्यातील वाचक चळवळ जागृत होण्यासाठी आज या विद्यार्थ्यांना विविध विषयावरील ग्रंथ वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना दर पंधरा दिवसाला प्रत्येकी एक ग्रंथ देवाण-घेवाण करून या वेगवेगळ्या विषयांवरील ग्रंथाचे वाचन करून त्यावर चिंतन मनन करून त्या वाचलेल्या ग्रंथावर किमान दहा ते पंधरा ओळीत माहिती लिहिण्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांच्या अंगी साहित्य चळवळ रुजविणे , त्यांच्यातील नवलेखक- कवी घडविणे , त्यांच्यात वाचन संस्कृती निर्माण करणे हे या नवोपक्रमाचे महत्त्वाचे उद्देश आहेत.
हा नवोपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्री सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा.संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे यांनी परिश्रम घेतले.
Add Comment