कारखान्यांनी उसाची बिले त्वरित देण्याची मागणी
केत्तूर (अभय माने) ऊस कारखान्याकडे गाळपासाठी गेल्यानंतर पंधरा दिवसात त्याची बिल मिळणे अपेक्षित असते परंतु, उजनी लाभ क्षेत्रातील ऊस फेब्रुवारी तसेच मार्च महिन्यात तुटून गेला तरी अद्यापही उसाचे बिल मिळालेली नाहीत. त्यामुळे एन उन्हाळ्यात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
असह्य उष्णतेमुळे उजनीचे पाणी वरचेवर खाली सरकत असल्याने पिके जगण्यासाठी शेतकऱ्यांना नदी काठी थांबून,गाळ काढून पाईप लाईन, केबल, वाढवून मोटारीपर्यंत पाणी लागत आहेत, तसेच आगामी पिकांसाठी शेतीची मशागत व खते आणण्यासाठी शेतकऱ्यांना पैश्याची जुळवा जुळव करताना घाम निघत आहे.
तर शेतकऱ्यांच्या हक्काची बिले कारखान्याकडे असतानाही वेळेत मिळत नसल्याने शेतकऱ्याची अवस्था करो या मरो अशी झाली आहे.
तरी कारखान्यांनी त्वरित शेतकऱ्यांची राहिलेली बिले अदा करून सहकार्य करावे अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यातून होत आहे.