जि.प.प्रा. केंद्रशाळा पोथरे येथे ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी – आज जि.प.प्रा. केंद्रशाळा पोथरे येथे जागतिक महिलादिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या स्वयंपाकी जैबुन्निसा शेख या होत्या . त्यांच्या हस्ते आदरणीय आणि वंदनीय सावित्रीबाई फुले, जिजाऊ आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
आजच्या कार्यक्रमासाठी पोथरे गावचे सरपंच श्री . अंकुशदादा शिंदे, ग्रामविकास अधिकारी श्री. दरवडे भाऊसाहेब, श्री .झिंजाडे सर,गावातील बचतगटाच्या सदस्या सौ. राणी झिंजाडे, सौ. नूतन शिंदे, सौ . माया शिंदे, सौ . मनिषा झिंजाडे ,लघुउद्योजिका सौ . उषा आढाव आणि सन्माननीय माता पालक आवर्जून उपस्थित होत्या .
शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना चविष्ट आणि रूचकर शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या अन्नदात्री आणि विद्यार्थीप्रिय स्वयंपाकी आदरणीय जैबाताई शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला . शाळेतील विद्यार्थीनींनी सर्व महिला शिक्षिकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करून आदर व्यक्त केला .
यावेळी विद्यार्थीनींनी महिला दिनानिमित्त त्यांचे विचार व्यक्त करताना सावित्रीमाईंचे विशेष आभार मानले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनींनी ‘आई बाबा मला वाचवा’ ‘मुली वाचवा आपले भविष्य वाचवा ‘* म्हणणाऱ्या गर्भातील मुलीचे पोस्टर तयार करून उपस्थितांना स्त्रीभृण हत्या थांबवण्याविषयी आवाहन केले
यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले व विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मा. सरपंच व सर्व उपस्थितांनी विशेष कौतुक केले .
यावेळी मा. सरपंच यांनी गावामधे राबविल्या जाणाऱ्या स्त्रीविषयक विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन बालविवाह रोखण्याचे आवाहन केले तर आदरणीय झिंजाडे सर यांनी स्त्रियांच्या सन्मानाची सुरुवात घरापासून केली तर समाज आपोआप सन्मान करेल असे सांगितले . उद्योजिका सौ . उषा आढाव यांनी पतीची साथ असेल तर एक सामान्य गृहिणी देखील यशस्वी उद्योजिका बनून गावातील स्त्रियांना कसा रोजगार मिळवून देऊ शकते या बाबतीत स्वतःचे उदाहरण देऊन पटवून दिले .
हेही वाचा – करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची नुतन कार्यकारणी जाहिर- दिनेश मडके
सुपरफास्ट एक्सप्रेसच्या धडकेत आरपीएफ जवान ठार;जिंती येथील घट
विषयशिक्षिका श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी (शेख) यांनी आजच्या स्त्रीच्या सर्व क्षेत्रातील घोडदौडी बरोबरच तिची सुरक्षितता ,स्त्रीभृण हत्या, मुलींचे घटत चाललेले प्रमाण त्यामुळे वाढते अत्याचार याचा सविस्तर लेखाजोखा मांडून चिंता व्यक्त केली . यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी देखील आपल्या मुलांना संस्काराचे शिक्षण देऊन त्यांना संवेदनशील बनवावे व युवापिढीनेही त्यांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगून आजच्या मुलींनीही स्वसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन विद्यार्थीनींना केले .
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सहशिक्षक श्री. लहू जाधव यांनी केले तर आकर्षक आणि उद्बोधक फलकलेखन सहशिक्षिका श्रीम. सविता शिरसकर यांनी केले .
सहशिक्षिका श्रीम. शाबिरा मिर्झा आणि श्रीम. स्वाती गानबोटे यांनी आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .