हे राजकारण बरं नाय ! !
केत्तूर (अभय माने) चार साडेचार महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. आता विधानसभेचा रणसंग्रामाचा बिगुल वाजला आहे. आणखी कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून हेही जाहीर होत असले तरी प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या भरपूर आहे त्यामुळे संभाव्य उमेदवारांची खालच्या पातळीवरील टीका टिप्पणी मात्र सुरू झाली आहे.सोशल मीडिया त्यामध्ये तेल ओतण्याचे काम करत आहे.
सुरुवातीला शिवसेनेचे दोन गट झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले.त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. सध्याचे राजकीय वातावरण पाहता पक्षनिष्ठा कोठेच शिल्लक राहिली नाही असेच दिसून येते. पक्षबदल होत आहेत.पक्ष बदल करण्यालाच प्रतिष्ठा मानले जात आहे. वस्तूतः ही लोकशाहीची चेष्टा मस्करी करण्याचा प्रकार आहे.
यापूर्वी राज्यातील राजकारण खेळीमेळीच्या वातावरणात केले जात होते,कितीही मोठा आणि कट्टर स्पर्धक असला तरी काही दिवस मनात राग व अबोला असायचा. परंतु जसजसे दिवस आणि महिने सरायचे तसे ते पाठीमागील सर्व काही झालेली विसरून एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्रित आणि एका व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलेले पहावयास मिळत होते. मात्र आता राजकारणात प्रतिस्पर्ध्याला स्पर्धक न मानता कट्टर शत्रू मानले जात आहे ही अतिषय खेदाची बाब आहे.राजकारणातील खिलाडूवृत्ती आता लोप पावत चालली आहे, हे सध्याच्या राजकारणावरून दिसून येत आहे.
आजकालच्या राजकारणात मतभेदाचे रूपांतर मनभेदात होत आहे.त्यातून एकमेकांची जिरवण्यासाठी अतिशय हीन दर्जाचे आणि पराकोटीचे राजकारण केले जात आहे. एकमेकांच्या खाजगी बाबी जाहीर केल्या जात आहेत हे राजकारण समाजाच्या हिताचे नाही अशी चर्चा गावागावात आता होत होऊ लागली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय स्पर्धा वाढणार आहे त्यातून खालच्या पातळीवर टीका टीका टिप्पणी एकमेकांवर होणार आहे.
गेल्या लोकसभेला घराघरातील छोट्या मोठ्या गोष्टीही चव्हाट्यावर आणून अतिशय खालच्या टोकावर येऊन राजकारण केले जात होते.तेच आता विधानसभा निवडणुकी दरम्यान पहायला मिळणार आहे .मतदारांची मात्र यामुळे करमणूक होणार आहे.