संकटात सुद्धा सन्मार्ग व सत्कर्म न सोडल्यास यशाचा मार्ग हमखास सापडतो – आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड
मानेगाव येथे कृतीशील शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार समारंभ
माढा /प्रतिनिधी- प्रत्येकाच्या जीवनात यश-अपयश, चढ-उतार,सुख-दु:ख,संकटे व विविध प्रकारच्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक अडीअडचणी येतात हे जरी एक कटूसत्य असले तरी संकटाच्या व अडचणीच्या काळात सुद्धा प्रामाणिक प्रयत्न,सत्संग, सन्मार्ग,सत्कर्म व ध्येयनिष्ठा न सोडल्यास यशाचा मार्ग हमखास सापडतो असे प्रतिपादन विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले आहे.
ते आनंदनगर-मानेगाव ता.माढा येथे श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात आयोजित सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
प्रास्ताविक सहशिक्षक सुनील खोत यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने दिला जाणारा सन- 2024 चा जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र गुंड यांचा सत्कार प्रभारी मुख्याध्यापक प्रविण लटके व मानेगावचे माजी सरपंच शिवाजी भोगे यांच्या हस्ते करण्यात आला.
पुढे बोलताना आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी सांगितले की,कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सातत्याने प्रामाणिक प्रयत्न,जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास उराशी बाळगून सतत सत्कर्म केल्यास निश्चितच आयुष्यात आनंदाचे व यशाचे क्षण येतात.आपल्यापेक्षा यशस्वी,गुणी व चांगल्या सवयी असणाऱ्या व्यक्तींबरोबर ईष्ट स्पर्धा केली तर ती अधिक फलदायी ठरते परंतु आपल्यापेक्षा कामचुकार व वाईट सवयी असणाऱ्या व्यक्तींबरोबर अनिष्ट स्पर्धा केली तर आयुष्यात अधोगती होऊन अपयश पदरी पडते.मानवी आयुष्य हे एकदाच मिळते त्यामुळे स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना आनंदी पहायची इच्छा उराशी बाळगली तर ख-या अर्थाने मानवतावादी दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक प्रविण लटके म्हणाले की,राजेंद्र गुंड सर हे खरोखरच एक विद्यार्थीप्रिय व हाडाचे आदर्श शिक्षक आहेत.ते नेहमी सकारात्मक विचार करतात. अनेक चांगले गुण व सवयी त्यांना आहेत.त्यांचे अध्यापन हे नेहमीच सर्वसामान्य विद्यार्थी केंद्रबिंदू मानून असते त्यामुळे ते इतरांसाठीही प्रेरणादायी आहे. शाळेतील प्रत्येक शालेय व सहशालेय उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो त्यामुळेच त्यांना आजतागायत अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
हेही वाचा – गणेश चिवटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपात सक्रिय होण्याचे आदेश
अंजनगाव येथील श्री खिलोबा विद्यालयाचे क्रिडा शिक्षक विनोद काळे कृतिशील क्रिडा शिक्षक पुरस्कार जाहीर
शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्रकुमार बाळू गुंड यांना महाराष्ट्र राज्य कृती समितीचा जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मानव सेवा सुरक्षा समितीचे तालुकाध्यक्ष सोपान चव्हाण, कायदेशीर सल्लागार ॲड.गणेश चव्हाण,महिला अध्यक्षा शीतल देशमुख, सीआरपी रोहिणी भोगे, कोषाध्यक्षा मोहिनी पारडे, अबॅकसच्या शिक्षिका सुनयना क्षीरसागर यांच्या हस्ते पुस्तक, शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच शिवाजी भोगे,तुकाराम कापसे,तनुजा तांबोळी,सुधीर टोणगे,सुनील खोत,सचिन क्षीरसागर,सागर राजगुरू,लहू गवळी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळी- मानेगाव ता.माढा येथे कृतीशील शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना मुख्याध्यापक प्रविण लटके, शिवाजी भोगे व इतर मान्यवर.