आईसाहेबांचा मंचक
………………………………
( तुळजापुरातील आईसाहेबांच्या पलंगाविषयी )
…………. थोडसं………….
**********************
खरं तर आपलं बालपण आणि जीवन जसं काय ग्रामीण भागाशी पक्क नातं आणि म्हणून हे नवीन नवीन विषय सुचतात आता ग्रामीण भाग म्हणजे खेडेगाव म्हटलं तर नुसती ऍडजेस्टमेंट खाण्यापिण्यात…राहणीमानात…कपड्या लत्यात… कुठलीही अशी चॉईस नाही…पण आता आपण बघू कारण या अशा खेडेगावात साधं राहायसाठी पत्र्याचं घर..नाहीतर कुणाचं छप्पर…किंवा एखाद्या दगडी बांधकामाचं आणि माळवदाचं घर पण असतं आणि ती म्हणजे सधन कुटुंब….गावातलं एक प्रस्थ म्हणजे सर्वांपेक्षा जरा सुरळीत तसं बघायला गेलं तर सगळं नीट नेटकं टायमावर आपलं ठरलेलं आपलं सर्वसामान्यांचं कसं काम धंदा करून आल्यावर सांजेला घास कुटका खायचा आणि बिछाना म्हटला तर खाली साधा साखरेचा बारदाना त्याच्यावर एक अन पांघरायला एक अशा दोन गोधड्या एकाद दुसऱ्या घरात बाज म्हणजे खाट ती पण आपली काथ्यानी विणलेली आलेला पाहुणारावळा अंगणात टाकलेल्या खाटेवर बसायचा.
अशातच एखाद्याने फळ्या जमवून सुताराकडून लाकडी पलंग बनवून घेतलेला तर अशी ही पलंगाची गत असं एकेकाचं म्हणणं असतं खेडेगाव म्हणजे खरं निसर्गाकडून मिळालेलं आयुष्य बारमाही आपलं पोत्यावर झोपायचं… लग्न ठरलं लग्नात लोखंडी खाट आली म्हणजे त्यातल्या त्यात श्रीमंतीचं लक्षण समजायचं तर या बहाद्दराला पोत्यावरून म्हणजे गोधडी वरून खाटंवर कवा गेला कळालच नाही असे ते दिवस होते तर बघा पलंग म्हणजे एक उपयुक्त फर्निचरचा प्रकार त्याचा उपयोग झोपायसाठी किंवा विश्रांतीसाठी म्हणून प्रतिष्ठित वर्गातील विशेषत: राजघराण्यातील लोक करीत असायचे इतरत्र मात्र जेवणासाठी त्याचा अनेकदा वापर करण्यात येई अजूनही काही ठिकाणी म्हणजे विशेषता हायवेवरील पंजाबी ढाबा तेथे अजून पण लाकडी बाजा बघायला मिळणार एकावर बसायचं दुसऱ्या बाजेवर समोर फळी ठेवून त्याच्यावर जेवण करायचं असा तो थाट असायचा
लाकडी पलंग म्हणजे चार पाय अन वर साधी चौकट अशी रचना तर काहींना मान टेकवण्यासाठी चंद्राकृती पट्टी जोडलेली हे पलंग हलके आणि शोभिवंत दिसतात काही राजघराण्यातील पलंगावर विविध प्रकारच्या कोरीव नक्षी पलंगाच्या चौकटी ब्रांझ धातूच्या असून कधी कधी सोने…चांदी…किंवा हस्तीदंत याचा सुद्धा वापर केलेला असायचा जरा थोड्याश्या पूर्वीच्या म्हणजे महाभारत काळात तर यजमानाला बसण्यासाठी चौरंगासारखे पीठ देण्यात येई ते पण सुताच्या दोरीने विणलेले असायचे राजपुरुष हे मंचकावर बसायचे लाकडाची काटकोनी चौकट काथ्यानी विणलेली भारतीय चारपाई म्हणजे बाज काही ठिकाणी लाखेचं पाणी देऊन खास मढवलेले पलंगाचे पाय त्याच्या सौंदर्यात भर घालायचे नंतर पर्याय म्हणून वेताचेसुद्धा पलंग व बैठका अस्तित्वात आल्या त्यातल्या त्यात 16 व्या शतकामध्ये खाटेचे पाय म्हंजे पुरुषभर उंचीचा खांब असायचा वरील बाजूस पडदा किंवा मच्छरदाणी लावण्यासाठी सोय केलेली असायची तर पलंगाबद्दल आपण थोडसं पाहू
त्यातही आपलं अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजापूरची आई श्री तुळजाभवानी माता आणि इतर अलंकाराच्या प्रमाणेच एक विशेष मान असलेली जिन्नस म्हणजे आईसाहेबांचा पलंग त्याविषयी थोडसं पाहू तर श्री तुळजाभवानीच्या सर्वच प्रथा व परंपरा इतर देवस्थानापेक्षा वेगळ्या आहेत कारण हिंदू धर्मात श्री तुळजाभवानी मूर्ती शिवाय इतर कुठलीच मूर्ती नसेल जी प्रत्यक्षपणे काढून मूळ मूर्तीला पालखीत ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते आणि आई साहेबांच्या घोरनिद्रा…श्रमनिद्रा आणि भोगनिद्रा अशा तीन निद्रा आहेत खरंतर आई साहेबांचा लाकडी पलंग हा बनविण्याचा मान खरा तर पलंगे कुटुंबीयांचा व हा लाकडी पलंग भीमाशंकर जवळील घोडेगाव या गावी तयार केला जातो तर आईसाहेबांचं माहेर हे अहमदनगर जवळ बुरानगर येथे त्यांची पालखी बनते सोळाव्या शतकात मा जिजाऊ आईसाहेब श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाची विधिवत पूजा तसंच आईसाहेबांची ओटी भरण्याचा कार्यक्रम जुन्नरला करीत असे आणि आता आपण पलंगाविषयी थोडं पाहू
मूळ मूर्तीला वर्षातून तीन वेळा सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आपण तुळजापूरला मुख्य गाभाऱ्यात गेल्यानंतर उजव्या हाताला ओवरीमध्ये एक पलंग दिसतो त्या पलंगावर देवीची मूळ मूर्ती काढून भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावस्या… अश्विन शुद्ध एकादशी ते पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा… आणि पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी पर्यंत देवीची निद्रा असते त्याला देवीची घोरनिद्रा…श्रमनिद्रा व भोगनिद्रा म्हटले जाते तत्पूर्वी सिमोल्लंघनासाठी हीच मूर्ती पालखीत ठेवून मुख्य मंदिराभोवती मिरवली जाते विशेष म्हणजे दसऱ्यानंतरच्या पौर्णिमेच्या दिवशी जुना पलंग विधीवत पूजा करून होमात टाकला जातो व नवा पलंग ठेवला जातो तुळजापुरातील मराठा समाजातील एका घराण्याकडे या पलंगाची सेवा करण्याची परंपरा असल्यामुळे त्यांचे आडनाव पलंगे असे पडले आईसाहेबांच्या चांदीच्या पलंगाचे सेवेकरी असा त्यांचा मान आहे पलंग आणि पालखी या दोन्ही वस्तू देवीसाठी महत्त्वाच्या असल्या तरी त्या आणण्याचा मान अहमदनगरच्या तेली समाजाचा आहे
आणि त्यातही वेगळेपण म्हणजे तेली मानकरी असले तरी त्या वस्तू वेगवेगळ्या जागी तयार होऊन कशाप्रकारे तुळजापूर पर्यंत पोहोचतात हा प्रवासच अनोखा आहे देवीचा पलंग घेऊन येण्याचा मान सध्या पलंगे घराण्याला आहे माननीय बाबुराव अंबादास पलंगे हे मानकरी व अहमदनगर मधील श्री तुळजाभवानी मंदिराचे पुजारी आहेत तुळजापूर प्रमाणेच येथेही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते पलंग घेऊन येण्याचा मान पलंगे असला तरी तो तयार करण्यासाठी राबणारे हात वेगळेच आहेत प्रत्यक्षात देवीचा पलंग करण्याचे काम पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील ठाकूर घराणे परंपरेने श्रद्धापूर्वक करत आहे पलंग तयार केल्यानंतर तो नगरच्या पलंगे नावाच्या तेली समाजातील मानकऱ्याकडे दिला जातो तेथून तो तुळजापूरच्या दिशेने रवाना होतो असा आहे आई साहेबांच्या पलंगाचा प्रवास
घोडेगावातून वाजत गाजत पलंगाचा प्रवास सुरू असतो दरम्यान तो जुन्नर… नारायणगाव…आळेफाटा..पारनेरमार्गे..नगरपर्यंत प्रवास करत असतो घटस्थापनेच्या दिवशी पलंग अहमदनगर मधील श्री तुळजाभवानी मंदिरात दाखल होतो एक दिवस मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या माळेला तो नगर जवळील भिंगारला मंदिराकडे प्रस्थान करतो आणि याच वेळी राहुरी येथे तयार झालेली देवीची पालखी भिंगार मध्ये दाखल होते अतिशय नयनरम्य सोहळ्यात तेथे पलंग आणि पालखीच्या भेटीचा सोहळा संपन्न होतो तिथून पुढे तुळजापूरला पलंग घेऊन जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील खुंटेफळ… चिचोंडी पाटील…सय्यद मीर लोणी…आणि कुंडी या चार गावचे लोक सेवेकरी म्हणून सोबत असतात अशा रीतीने नगर…भिंगार… जामखेड आष्टी…भूम… चिलवडी…आणि आपसिंगामार्गे दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुळजापुरात हा पलंग आणि पालखी सोहळा दाखल होतो तर आईसाहेबांच्या पलंगाविषयी आपण माहिती घेतली पण हा विषय निवडण्यामागे श्री तुळजाभवानी मातेची पुजारी माननीय जीवनराव अमृतराव कदम व आईसाहेबांच्या पलंगाच्या सोहळ्याचे मानकरी माननीय गणेश पलंगे यांच्या विशेष सहकार्यांने व प्रोत्साहनामुळे लिहिण्याचा योग आला
खरं पाहायला गेलं तर तुळजापूरचे आमचे बेंद्रे कुटुंबांचे पुजारी माननीय रावसाहेब अमृतराव कदम व त्यांचे सुपुत्र माननीय लिंबाजी अमृतराव कदम यांचे आणि आमचे घरोब्याचे संबंध तुळजापूरला गेल्यानंतर आस्थेने विचारपूस करून घरचीच माणसं असल्यासारखी वागणूक सर्व म्हंजे देवीची पूजा विधी…अभिषेक… नैवेद्य करून आणखी एखादा दिवस राहण्याचा आग्रह करणारे व अखंड माणुसकीचा झरा असा त्यांचा लौकिक आहे त्यांचा अन आमचा जवळजवळ 52 वर्षाचा स्नेह असलेले आमच्या घराण्याचे पारंपारिक असलेले तुळजापूरचे पुजारी आणि आता तर काय विविध प्रकारच्या सोयी निघाल्यामुळे फोनवरच ऑनलाईन बुकिंग करून आधार कार्ड त्यांना दिल्यानंतर दर्शन मिळण्याची सुविधा त्यांनी केली आहे त्यामुळे भक्तांना होणारा मानसिक ताण कमी होतो आता वयोमानामुळे त्यांचे सुपुत्र माननीय भाऊसाहेब उर्फ भैय्या व माननीय जीवनराव हे पूजा विधीचे कार्य. म्हंजे नैवेद्य…अभिषेक…वगैरे छान पैकी कमी वेळात करतात आणि क्वचित प्रसंगी पैशाची अपेक्षा न करता अगदी मनोभावे तेही सेवा करतात आणि आपल्या तरुण वर्गाने नोकरीच्या मागे न लागता त्यांनी व्यापार उद्योगात काम करून उद्योजक बनावे ही त्यांची तळमळ असते आणि कित्येक तरी तरुणांना त्यांनी अल्पावधीतच उद्योजक बनवलेले आहे आपलं तुळजापुरातील हक्काचं माणूस आणि घर अशी त्यांची ख्याती आहे आणि आपण घरात गेल्यावर प्रथम आपल्या गावाकडच्या माणसांची आस्थेने चौकशी करणार असे कितीतरी भक्त त्यांच्याकडे येतात पण सर्वांची माहिती अचूक स्मरणात ठेवणे म्हणजे त्यांच्या आठवणीत किती जी बी चं मेमरी कार्ड असेल आणि तुळजाभवानी मातेने त्यांना ते पण बहाल केलयं…
***********************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
Add Comment