पावसाच्या दडीमुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी हवालदिल; जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरी पाऊस नाही
करमाळा(अलीम शेख); जूनचा दुसरा आठवडा संपला तरी सुद्धा पावसाची हजेरी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मान्सूनपूर्व शेत मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. बी बियाणे, खते, कीटकनाशके दुकाने विक्रीसाठी सज्ज झाली आहेत, ती ग्राहकाच्या प्रतीक्षेत आहेत, तर राबणारा शेतमजूर वर्ग काम नसल्यामुळे हतबल झाला आहे.
दरवर्षी मे महिन्यामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पडतो आणि त्या पावसावरती खरीप हंगामासाठी पेरणीपूर्वक मशागतीची कामे सुरू होतात. पण यावर्षी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, उलट प्रचंड उन्हाळा वाढल्यामुळे शेत जमिनी भेगाळल्या आहेत.
पाऊस पडल्याशिवाय शेतामध्ये कसलेही काम करता येत नाही, परिणामी नांगरणी, खुरटणी, कुळवणी, रान वेसणे, बांध बंदिस्ति अशी कामे अजिबात झालेली नाहीत, त्यामुळे शेतकऱ्याचे सारे लक्ष आभाळाकडे लागले असून नातेवाईक आणि मित्रमंडळी त्यांना तुमच्याकडे पाऊस झाला का म्हणून चौकशी करीत आहेत. त्यामुळे चांगलीच काळजी वाढू लागली आहे.
सायंकाळच्या वेळी आभाळ येते पाऊस पडेल असे वातावरण तयार होते, शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत होतात मात्र अजिबात पाऊस पडत नाही, त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढू लागला आहे परिणामी सारेच हैराण झाले आहेत.
अखेरच्या टप्प्यात पेरणीच्या वेळी ही खते खरेदी केली जातात ग्रामीण भागात सुतार, लोहार यांच्याकडून शेतामध्ये लागणारी पारंपारिक अवजारे त्यांची दुरुस्तीची कामे केली जात आहे तर काही छोट्या शेतकऱ्यांनी कुटुंबातीलच सदस्यांना सोबत घेऊन बांध बंदिस्तेची कामे सुरू केली आहेत.
पाऊस लांबल्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी पूर्णपणे खालवली आहे. ऊस, द्राक्ष बागा यांना पुरेसे पाणी देणे अशक्य झाले आहे.
पावसाने हजेरी लावताच भाजीपाला लागवड करण्यात येते त्यातून शेतकऱ्यांना घर खर्चासाठी पैसे उपलब्ध होतात. मात्र मान्सून पावसाने आजपर्यंत करमाळा तालुक्यात जडी मारल्याने शेतकरी कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे.
बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी परेशान
बी बियाणे दुकानांमध्ये नवनवीन जातीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत शेतकरी ही पारंपारिक बियाण्यापेक्षा सुधारित व आधुनिक बियाणे वापरण्याला अधिक पसंती देत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केली आहेत तर काही शेतकऱ्यांनी पारंपारिक बियाण्याची साठवण केली आहे रासायनिक खताच्या किमती गगनाला भिडल्या आहेत सहजासहजी त्या परवडणाऱ्या नसल्यामुळे खते खरेदी करण्यासाठी शेतकरी परेशान झाला आहे.
Add Comment