उजनीची वाटचाल मायनस कडे, शेतकरी चिंताग्रस्त; उरला फक्त ‘इतका’ पाणीसाठा; दररोज होतेय १% पाणी कमी
केत्तूर (अभय माने) सोलापूर,पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे उजनी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे सुमारे 111 टक्के व 123 टीएमसी पाणीसाठा झालेले उजनी धरण,सध्या सोलापूरला नदी,कॅनॉल बोगद्याद्वारे पाणी सोडल्याने उजनी जलाशयाचे हे पाणी मोठ्या वेगाने व झपाट्याने कमी झालेले दिसत आहे.सध्या धरण 12 टक्केवर येऊन ठेपली आहे. दररोज उजनीतला एक टक्का पाणी कमी होत आहे.1 एप्रिलला उजनी 31% होते तर 20 दिवसात ते अवघ्या 12 % टक्केच्या आत आले आहे.
पाणीसाठा एवढ्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने उजनी फुगवटा तसेच लाभक्षेत्रातील परिसरातील शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. आता कुठे उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणीसाठा एवढ्या झपाट्याने खाली जात असल्याने शेतकऱ्यांनी सखल भागात पाईपलाईनचे पाईप,केबल वाढवणे वाढवावे लागत आहे.त्यातच विजेचा लपंडाव संकटात भर घालण्याचे काम करत आहे
तरी एप्रिलमध्येच उजनी 12 % च्या खाली आल्यामुळे पुढील 2-3 महिने कडक उन्हाळा व मागील काही वर्षांचा अनुभव पहाता हा समाधानकारक वाटत असलेला पाणीसाठा सर्वांसाठीच मृगजळ ठरणार की काय ? अशी भीती वाटत आहे.
पाणीसाठा वरचेवर झपाट्याने कमी होत असल्याने लाभ क्षेत्रातील, सखल भागातील शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी मोठी धावपळ व पळापळ सुरू झाली आहे
पाईप,केबल,मोटारी पाणी पुढे जाईल तसतसे वाढवावे लागत आहेत.वाढत्या उन्हाच्या तडाख्याने पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे कोणत्याही परिस्थितीत जलाशयाचा पाणीसाठा लवकरच मायनसमध्ये जाणार असल्याने शेतकरी हबकून गेला आहे.
दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढलेले आहे.बाष्पीभवनाचा दर 1.10 दलघमी इतका असून उजनी धरणातील पाणी कमी होत आहे.पावसासाठी किमान दोन तीन महीन्यांचा कालावधी जाणार असून,विहिरी व बोअरवेल यांनी तर सहजच एप्रिल अखेरपर्यंत तळ गाठला जाणार असल्याने पाण्याची गंभीर अवस्था उजनी पट्ट्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.
” भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल् निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवाव्या लागतील तसेच उन्हाळ्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे.तसेच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे त्यातच येणाऱ्या काळात पर्जन्यमान कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे त्यामुळे आत्तापासूनच पाणी जपून वापरावे लागणार आहे.”
” धरणसाठ्यातील पाणी अतिशय वेगाने कमी होत असल्यामुळे पाण्याखाली झाकलेला भूभाग उघडा पडत आहे.परिणामी स्थानिक पक्ष्यांबरोबर स्थलांतरित पक्षी आपले उदरभरण करण्यात एकच गर्दी करत आहेत.खालावलेल्या पाणीपातळीमुळे परदेशी बदकं मात्र अनानुकूलतेमुळे परतीच्या प्रवासाला लागले आहेत.
– डॉ. अरविंद कुंभार,पर्यावरण व पक्षीप्रेमी,अकलूज“जलाशयाचा पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने हा शेतकऱ्यांसाठी कसोटीचा काळ असला तरी पाणी कमी झाल्यामुळे दलदलीच्या तसेच सखल भाग रिकामा होत असल्याने तो देशी-विदेशी पक्षांसाठी सुवर्णकाळ ठरत आहे त्यामुळे पक्षांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
– कल्याणराव साळुंके,पक्षीप्रेमी,करमाळा
छायाचित्र- करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील हिंगणी रेल्वे पुलाखाली पाणी संपले असून शेतकऱ्यांना पाईप्स,केबल,मोटारी वाढवावे लागत आहेत. (छायाचित्र- अभय माने,केत्तूर)
Comment here