मुसळधार पावसाची शक्यता; येत्या २४ तासांत ‘या’ १० राज्यांमध्ये धो धो कोसळणार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
महाराष्ट्रसह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील २४ तासांत पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.
देशभरातील हवामानात झपाट्याने बदल होत आहे. तापमानात घट होत आहे तर काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी उन्हामध्ये वाढ होत आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण भारतात अनेक राज्यांमध्ये दमदार पावसाची हजेरी सुरु आहे. ईशान्येकडील राज्यांमधील हवामानात बदल होत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पावसाचा इशाराही देण्यात येत आहे.
रब्बी हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रब्बी पिकांची काढणी सुरु असताना शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
६ मार्च ते ८ मार्च महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर, पुणे, नाशिक, खानदेश, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच हिमालयीन पश्चिम बंगाल-सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.
त्याचवेळी, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये येत्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह हिमवृष्टी आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हरियाणा, दिल्ली, पंजाबमध्ये पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरातच्या पश्चिम भागात अनेक भागात पाऊस पडू शकतो.
देशातील अनेक राज्यांमधील तापमानात चढ उतार होऊ शकतो. तसेच सध्या दिल्लीमधील तापमान 16.6 अंश सेल्सिअस आहे. दिल्लीत दुसऱ्या दिवशी शनिवारी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याची शक्यता आहे. देशाची राजधानी दिल्लीत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
Comment here