‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाचे रविवारी पुण्यात प्रकाशन; ‘बाबासाहेब करमाळा शहरात आले होते’ तो इतिहास उलगडणार!
करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील हिवरे गावचे लेखक जगदीश अशोक ओहोळ यांनी लिहिलेल्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन चरित्रात्मक पुस्तकाचे रविवारी पुणे येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह फुलेवाडा या ठिकाणी प्रकाशन होत आहे.
जेष्ठ कामगार नेते व विचारवंत डॉ बाबा आढाव व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते हे प्रकाशन होत असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संपादक अभिजीत कांबळे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड, सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे व समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे आदी दिग्गज मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सभा 24 जानेवारी 1937 रोजी करमाळा शहरात झाली होती. त्या सभेत करमाळा शहरातील कोण नेतृत्व करत होते.? बाबासाहेबांच्या सोबत कोण कोण होते.? आदी मुद्दे संशोधन करून ओहोळ यांनी प्रथमच करमाळाकरांच्या समोर आणले आहेत. त्यामुळे या पुस्तकाची करमाळाकरांना विशेष उत्सुकता लागली आहे.
Comment here