ग्रामीण भागात बँका चालविणे जबाबदारीचे व कसरतीचे काम – चेअरमन अशोक लुणावत
नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिर
माढा / प्रतिनिधी-(राजेंद्र गुंड-पाटील) –कर्जदाराची पत व कर्जवसुलीची क्षमता न पाहता नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप झाले आणि ते जर वेळेवर वसुल झाले नाही तर बँका बंद पडतात ही वस्तुस्थिती आहे.अनेक वेळा कर्ज द्या म्हणून जे लोक शिफारस करतात ते कर्ज वसुलीच्या वेळी सहकार्य करीत नाहीत त्यामुळे ग्रामीण भागात बँका चालविणे जबाबदारीचे व कसरतीचे काम असल्याचे प्रतिपादन नागरी बँक्स असोसिएशनचे चेअरमन अशोक लुणावत यांनी केले आहे.
ते सोलापूर येथे नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरात बोलत होते.
शिबिराचे उद्घाटन चेअरमन अशोक लुणावत व तज्ज्ञ मार्गदर्शक प्रमोद मेहता यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले.
पुढे बोलताना चेअरमन अशोक लुणावत म्हणाले की,नागरी बँका चालविताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही तांत्रिक अडचणी येऊ नयेत,त्यांचे ज्ञान व माहिती नेहमी अपडेट आणि अपग्रेड ठेवण्यासाठी त्यांना वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक आहे.याच उद्देशाने हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतक्याच बँकांचा एनपीए ‘0’ टक्के आहे.कर्मचाऱ्यांनी बँक ही आपली घरची लक्ष्मी आहे असे समजून प्रामाणिकपणे कामकाज केल्यास बँकेची प्रगती व नावलौकिक निश्चितच होतो असे मत त्यांनी व्यक्त केले.
पहिल्या सत्रात पुणे येथील बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक प्रमोद मेहता यांनी “कर्ज वितरण करताना घ्यावयाची काळजी” या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, कर्ज वितरण करणे सोपे आहे परंतु ते वेळेवर वसुली करणे अवघड असते म्हणूनच सुरुवातीलाच कर्ज वाटप करतानाच कर्जदाराची मार्केटमधील पत,कर्जफेड करण्याची क्षमता,सक्षम जामीनदार आणि कर्ज वितरणापूर्वी योग्य तपासणी पाहूनच त्याच्या कुवतीप्रमाणे कर्ज वाटप करावे.कर्ज वितरण करताना तारणाबरोबरच मंजुरी पत्रालाही महत्त्व द्यावे असे आवाहन केले.
दुपारच्या सत्रात तज्ञ मार्गदर्शक सुनील हिरेमठ यांनी “थकबाकी वसुलीची कार्यपद्धती” या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की,बँक वाचली तरच आपण वाचतो ही भूमिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवावी.कर्ज वसुलीच्या वेळी संचालक मंडळाने थकित कर्जदारला नव्हे तर बँकेच्या हितासाठी वसुलीला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी.कर्जदारांनी वेळेवर कर्ज न भरल्यास त्यास कायदेशीर नोटीस बजावावी.मुदत देऊनही थकीत कर्ज भरले नाही तर त्याच्या तारण मालमत्तेची जप्ती करून अशा कर्जदारांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करावे.कर्ज काढताना कर्जदाराची जी मानसिकता असते तीच हप्ते भरताना असायला पाहिजे तरच बँका सक्षमपणे चालू शकतात.ज्या थकित कर्जदारांवर एकशे एक दाखल केले आहे त्यांना शक्यतो ओटीएस योजनेचा लाभ देऊ नये असे मत त्यांनी व्यक्त केले.सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी ढवळे यांनी केले. आभार संचालक अशोक सुरवसे यांनी मानले.
यावेळी नागरी बँक्स असोसिएशनचे संचालक दिनकर देशमुख,डॉ.अशोक सुरवसे,दिपक मुनोत,राजेंद्र कोठावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी ढवळे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,सुरज कांबळे,अमोल चिन्ने,किरण साळुंके, रामचंद्र पाठक,नंदकुमार दुड्डम, राजकुमार भोळे,निलेश कुलकर्णी, लक्ष्मण शिंदे,सचिन खापरे जयंत खुर्द,प्रमोद शिंदे,विक्रम पाटील, शिवाजी घाडगे,चंदन येमलवार,संदीप टोणपे,नंदू लोंढे,दिनेश प्रक्षाळे,श्रीकांत अंबूडकर,अन्नपूर्णा सामलेटी,आशा उजळंबे यांच्यासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी- सोलापूर येथे नागरी बँक्स असोसिएशनच्या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना चेअरमन अशोक लुणावत बाजूला संचालक डॉ.अशोक सुरवसे,दिपक मुनोत व इतर मान्यवर.
Comment here