मुलगा होत नाही म्हणून छळ, विवाहितेने घेतला गळफास
लग्नाला १३ वर्ष होऊन देखील मुलगा होत नसल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. या छळाला कंटाळून विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात रविवारी रात्रीच्या (२४ सप्टेंबर) सुमारास घडली.
अस्मिता केदारी चौगुले, (वय 30, रा. कोथळी, ता. करवीर) असं मृत विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह सासू -सासऱ्यांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
13 वर्षापूर्वी अस्मिता आणि केदारी यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर अस्मिताने दोन गोंडस मुलींना जन्म दिला. मात्र, अस्मिताचा पती केदारी आणि सासू-सासऱ्यांना मुलगाच हवा होता. घरात वंशाचा दिवा हवा म्हणून त्यांनी अस्मिताचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.
गेल्या कित्येक वर्षांपासून अस्मिता सासरच्या मंडळींकडून होणारा छळ सहन करत होती. मात्र, रविवारी रात्री तिच्या संयमाचा अंत झाला. पती आणि सासू-सासऱ्यांसोबत वाद झाल्यानंतर अस्मिताने कोथळी येथील राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
दरम्यान, अस्मिताच्या आत्महत्येची बातमी कळताच तिच्या माहेरच्या मंडळींनी तातडीने कोथळी गावात धाव घेतली. जोपर्यंत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत आम्ही अस्मितावर अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका अस्मिताच्या आई-वडिलांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत अस्मिताचा पती केदारी आणि सासू सासऱ्यांना अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Comment here