केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे मराठी साहित्य संमेलन वर्ष सहावे मोठ्या उत्साहात संपन्न
केम- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम याठिकाणी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे मराठी साहित्य संमेलन वर्ष सहावे हा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सुरुवातीला शालेय समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर, उपाध्यक्ष गणेश तळेकर, उपाध्यक्षा पल्लवी सचिन रणशृंगारे , सर्व सन्माननीय शालेय समिती सदस्य यांच्या शुभहस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. यानंतर भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. या शोभायात्रेमध्ये श्री विठ्ठल- रुक्मिणी, राजमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा करून शालेय विद्यार्थी रथामध्ये बसून या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी या शोभायात्रेतील रथामधील डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा ठेवण्यात आली होती. या भव्य अशा शोभायात्रेमध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत गावातून दिंडी काढली. यावेळी पालखीमध्ये शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांची प्रतिमा, भारतीय संविधान व डॉ बापूजी साळुंखे यांच्यावर लिखित विविध ग्रंथ ठेवून पालखी फुलांनी सजवलेली होती. केम गावातून ग्रंथदिंडी जात असताना विद्यार्थ्यांनी डॉ.बापूजी साळुंखे यांचा विजय असो, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा विजय असो असा जयघोष केला. ग्रंथदिंडी व रथामुळे या भव्य शोभायात्रेमुळे संपूर्ण केम परिसर बापुजीमय झाले होते. केम ग्रामस्थांनी या भव्य साहित्य संमेलन शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले.
जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाला ‘लोकराजा शाहू पुरस्कार’ ; इचलकरंजी येथे झाला सन्मान
यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यानंतर मराठवाडा विभागप्रमुख व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीवसेवक प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, प्राचार्य श्री सुभाष कदम, शालेय समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर, सरपंच श्री राहुल कोरे, श्री अच्युतकाका पाटील व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य श्री सुभाष कदम यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे मराठी साहित्य संमेलन वर्ष सहावे हे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी ‘शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांचे विचार ही काळाची गरज’ या परिसंवादात डॉ.बापूजी साळुंखे यांचे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांचे आजच्या काळात असणारे महत्त्व सांगितले. त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे मराठी साहित्य संमेलन हे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेसाठी अतिशय अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. त्यांनी या साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी सांगून या उपक्रमाचे कौतुक केले व यातून वेगवेगळे नवनवीन साहित्यिक घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे संमेलनात आयोजित काव्य महोत्सवात प्रसिद्ध कवी व व्याख्याते डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी आई ही कविता सादर करून सर्वांची मने जिंकली. त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक विषयावरील बहारदार कविता चालीमध्ये गाऊन उपस्थित रसिकांची व विद्यार्थ्यांची मने जिंकली.
या साहित्य संमेलनाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे यांनी तर श्री के.एन वाघमारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी साहित्य संमेलन व्यासपीठ व परिसरात भव्य अशा सुबक रांगोळ्या काढल्या होत्या. या साहित्य संमेलनाला केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी नागरिक, सर्व गुरुदेव कार्यकर्ते, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.