ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील यश निश्चितच कौतुकास्पद – सभापती विक्रमसिंह शिंदे
अंजनगाव खेलोबा येथे ग्रामस्थांच्या वतीने गुणवंतांचा नागरी सत्कार
माढा/प्रतिनिधी- ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षण हे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार आहे शिवाय ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये भरपूर क्षमता व सुप्त गुण असतात.जरी ग्रामीण विद्यार्थ्यांना शहराप्रमाणे अद्ययावत भौतिक व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसल्या तरीही मागील काही वर्षांपासून लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यी प्रामाणिक अभ्यास, कष्ट व गुणवत्तेच्या जोरावर उत्तुंग यश संपादित करीत आहेत ही बाब निश्चितच कौतुकास्पद व आनंददायी असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी केले आहे.
ते अंजनगाव खेलोबा ता.माढा येथे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात 13 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले नूतन अन्न व सुरक्षा अधिकारी विनायक चव्हाण यांच्या नागरी सत्काराच्या वेळी बोलत होते.
अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सज्जनराव जाधव होते.प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष विनायक चौगुले यांनी केले.
यावेळी धनगर समाजाचे नेते बाबासाहेब वाघमोडे यांनी सांगितले की,विनायक चव्हाण यांच्या रूपाने गावात स्पर्धा परीक्षेतील यशाला सुरुवात झाली आहे.ही बाब वृद्धिंगत करण्यासाठी ग्रामपंचायत व सुज्ञ पालकांनी पुढाकार घेऊन गावात एक सुसज्ज वाचनालय व स्टडी सेंटर सुरू करावे. पालकांनी मुलांचे इतर फाजील लाड पुरविण्यापेक्षा त्यांना दर्जेदार पुस्तके व साहित्य वाचनाची आवड निर्माण करावी.युवा पिढीतील वाढती व्यसनाधीनता एक गंभीर सामाजिक समस्या बनली असून ती आटोक्यात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन करून आभार विनायक जाधव यांनी मानले.
पुढे बोलताना विक्रमसिंह शिंदे म्हणाले की,स्पर्धा परीक्षेसह इतर कोणत्याही क्षेत्रात जरी सुरुवातीला अपयश आले तरी न खचता व मनात न्यूनगंड निर्माण न होऊ देता विद्यार्थ्यांनी मोठ्या धैर्याने व जिद्दीने ध्येयप्राप्ती होईपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.आज अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोबाईल व वाढती व्यसनाधीनता ही अडसर व अडथळा बनली आहे त्यामुळे मुलांना यापासून परावृत्त करण्यासाठी पालक व शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
-चौकट – यावेळी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले नूतन अन्न व सुरक्षा अधिकारी विनायक जाधव यांचा सत्कार सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते तर महाराष्ट्र राज्य कृती समितीचा जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने चेअरमन पांडुरंग चौगुले यांच्या हस्ते आणि उपाध्यक्ष सज्जनराव जाधव व सरपंच प्रतिनिधी प्रदिप चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
काॅफीमुक्त परिक्षेसाठी बोर्डाचा आता नवा पॅटर्न;पॅटर्न मुळे काॅफिला बसणार आळा
कुंभेजची श्वेता शिंदे विद्यापीठात अव्वल
यावेळी चेअरमन पांडुरंग चौगुले,सरपंच प्रतिनिधी प्रदिप चौगुले,विठ्ठलवाडीचे ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भांगे,माजी सरपंच भागवत चौगुले,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,अंकुश लटके,आनंद पाटेकर,सचिन चौगुले,सर्जेराव गडेकर,विलास चव्हाण, नागनाथ कोळेकर,विनायक जाधव,शुक्राचार्य लटके,सुरेश जाधव,नानासाहेब वाघमोडे, महादेव गडेकर,बिरुदेव वाघमोडे,शशांक पाटेकर,लखन डोके,आर्यन पाटेकर,जीवन जाधव यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळी – अंजनगाव खेलोबा ता.माढा येथे नूतन अधिकारी विनायक चव्हाण यांचा नागरी सत्कार करताना सभापती विक्रमसिंह शिंदे बाजूला उपाध्यक्ष सज्जनराव जाधव,प्रदिप चौगुले,पांडुरंग चौगुले व इतर मान्यवर.