🌹 रानातला मांडव अन ढेकळातली पंगत 🌹
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
आजकाल आपण काही काही गोष्टी नवीनच पाहतो… ऐकतो…वाचतो…पण एक परंपरागत असलेला प्रकारच गायब होत चाललाय खरं तो प्रसंग आठवला म्हणजे मन कसं मोहरून जातं ती म्हणजे लग्नातली पंगत…..
आणि त्या वेळेला कसं…आता sss वाजंत्री सावध सावधान म्हणता क्षणीच सारं बसलेलं वऱ्हाड बुड झटकून हातामध्ये उरलेल्या दोन-चार अक्षदा नवरा नवरी कडे फेकून पहिल्या पंगतीला बसायची काय ती मजा असायची राव जेवण झाल्यावर सकाळी नदीवरून दोन-तीन बैलगाड्यांमध्ये भरून आणलेली थंडगार पाण्याची ती पिंपं आणि पिंपातलं कोमट झालेलं पाणी आणि त्या टिपाडाला साखळीने बांधलेली ती दोन चार जर्मली गलासं काय तो सीन आज आपण विचार करणार आहोत पन्नास वर्षापूर्वीचं लग्न ती पंगत आणि ते वाढपी
आता बघा एखाद्या टायमाला लग्न असू किंवा सत्यनारायण…वास्तुशांती… किंवा एखाद्या बर्थ डे पार्टीमध्ये जवा आपण जेवायला जातो आणि वाढप्याने पानाच्या डावीकडे भाजी आणि गोडाची वाटी उजवीकडं किंवा सरळ पानाच्या बाहेर ठेवली किंवा लोणचं मध्येच कुठेतरी वाढलं तर बहुतेक राग येत नाही पण अनकम्फर्टेबल वाटतं मग खरंतर आपल्याला किंचितसा त्या वाढणाऱ्याचा थोडा त्रास होतो रागच येतो म्हणाना मग तो कुणी का असं ना एक पद्धत असते जेवण वाढण्याची इथपासून एक उपदेशपर विचार मनात डोकावून जातो कारण जेवताना आपला हात तसा हलत असतो ना अहो अप्रतिम जेवण बनवणं ही एक कला आहे तसेच जेवण शास्त्रशुद्ध पद्धतीने वाढणं ही पण एक कला आहे हे तितकच खरयं पण झालयं असं की बुफे या पश्चिमात्य भोजन पद्धतीमुळे आपल्या अस्सल महाराष्ट्रीयन पंगतीची परंपरा लोप पावत चाललीयं जेवणाची लयबद्ध पद्धत पडद्याआड गेल्यासारखी वाटायला लागलीयं आणि जेवणाची लयबद्ध वाढणी पण याला दक्षिणात्य मंडळी मात्र अपवाद आहे.
आजही त्यांच्या अनेक जेवणावळी या हिरव्यागार केळ्याच्या पानावर पारंपारिक पद्धतीने वाढलेल्या भोजनाने संपन्न होतात आता तुम्ही म्हणाल काय फरक पडतो आमटी डावीकडे वाढली तरी पोटातच जाणार ना कारण याबद्दल न बोललेलं बरं कारण यांना कोण सांगणार पण तिथल्या वाढलेल्या छान पानाबद्दल आणि त्यात मिळणाऱ्या आनंदा बद्दल जवा आम्ही लहानपणी किंवा शाळकरी जीवनामध्ये होतो तेव्हाचा काळ त्या लग्नाच्या पंगतीत काय मजा असायची शे दीडशे लोकांची पंगत एक एक पदार्थ वाढणारी अनेक वेगवेगळी लोकं आणि वाढपी काय लगबगीने ताट वाढायचे आणि सर्व पदार्थांनी वाढलेलं… सजलेलं…आणि भरलेलं ताट बघून अर्ध पोट भरायचं जेवायला सुरुवात व्हायची… डावीकडे पिवळ्या रंगाच्या केशर मिरवणाऱ्या गरमागरम चमकदार जिलब्या…मठ्ठा…समोर लिंबू… मीठ.. लोणचं…कोशिंबीर…पापड…कांदा बटाटा भजी…मसुराची आमटी…बटाट्याची सुकी भाजी.. मधोमध पांढरी शुभ्र भाताची मुद त्यावर हलकसं वरण सांडलेलं…वरणावर हळुवार सोडलेली लोणकढी तुपाची धार…मुद फोडली की एक जण गरमागरम वरणाचे भांडे घेऊन समोर उभाच असायचा…पात्रातील भात संपत आला की…पुरी… वडे…आणि मागोमाग मसालेभात…आलाच म्हणून समजायचा
बरं हे झालं एका दृष्टीने या सगळ्या गडबडीमध्ये प्रत्येक पदार्थ मात्र न सांगता न चुकता योग्य ठिकाणीच वाढला जायचा सुंदर मांडणी असलेल्या या चमचमीत जेवणामध्ये आग्रहाची जोड तर हमखास असायची त्या आग्रहानिमित्त संवाद पण घडायचे लांबच्या नात्यातली एखादी मावशी जिलबीचे ताट घेऊन पंक्तीत बसलेल्या कोणाशी तरी बोलत बोलत हसतच समोर यायची आणि नको नको म्हणत असताना तू सोनारीन काकूचा किरण ना रे…मग घे गुपचूप असं म्हणून दोन जिलब्या वाढून जायची मी सोनारीन मावशीचा मुलगा असणं आणि दोन जिलब्या यांचा काय संबंध हे मला आत्तापर्यंत कळालेलं नाही पण त्या अनोळखी मावशीच्या चेहऱ्यावरचा प्रेमळ भाव आणि जिलब्यापेक्षाही तिच्या आग्रहातला गोडवा आजपर्यंत मी मनात जपला आहे आणि एका दृष्टीने मी माझा पंगतीतला अनुभव घेतलाय पण एखादी पंगत खास ग्रामीण भागाच्या असती आणि ती पण 50 वर्षांपूर्वीची बघा नवरदेवाचं वऱ्हाड जायचं गेल्यावर नवरदेवाची वेशीजवळ दृष्ट काढली जायची वऱ्हाड उतरायसाठी एखादा वाडा जाणवस घर म्हणून दिला जायचा तिथं पण दोन-चार करवल्यांची धांदलचं असायची चार-सहा घरचं गडांगण खाऊन झाल्यावर हळद आणि मग लग्न व्हायचं आणि ती लग्न वाडी वस्तीवर असल्यामुळे बाजूच्या मोकळ्या रानातच भव्य मांडव टाकलेला असायचा एकदा का बसायची जागा पायाने सपय करून बसलं की पत्रावळीवाल्याची काय सुख चूक बिचाऱ्याची पण फाटकीट पत्रावळी द्यायचा पुरवणी म्हणून दुसरी पण फाटकीच पत्रावळी पत्रावळी वाऱ्याने उडायची म्हणून जवळचे दोन चार बारके दगड त्याच्या कडेने ठेवले जायचे
आता वाढप्यामध्ये पहिला मान असायचा मीठ वाढणाराचा तो बहुतेक वाकून नाही तर उभ्यानिच पत्रावळीत मीठ टाकायचा ती रांगोळी पसरल्यावानी वाटायचं मग दोन बोटांनी मीठ नीट करूस्तवर बुंदी वाला बरोबर बुंदी त्या मिठावर टाकून निघून जायचा बुंदीचं मिठातलं निवड काम हुस्तवर भाताची डेक घेऊन दोन बशांनी भात वाढला जायचा लग्नातला भात थोडा गितकाच असाय पाहिजे असा आचाऱ्याचा नियम पण भात फोडून आळं केलं तरी वरण वाढणारा थोडं तरी वरण आळ्याच्या बाहेर जाईल अशा अटकळीनं वाढायचा तो वरणाचा छोटासा लोंढा पत्रावळीच्या बाहेर पडून ढेकळापुढं लोटांगण घालायचा आता थोडक्यात सांगायचं झालं तर शेताच्या बांधावरचा पालापाचोळा… नुकतीच कापून फेकलेली हरळीची पानं…कालवलेल्या भातावर येऊन बसायची भातामधून बुंदी निवडायची की हरळीची पानं या संभ्रमात जो तो असायचा वदनी कवळ घेता ही ललकारी थोडीशी भुकेने चिडलेल्या अवस्थेमध्ये असायची बुंदीची पहिली बचक तोंडात सारली जायची बुंदी खाताना मंडपाच्या छताकडे बघावं लागायचं त्यामुळे खाली पत्रावळीत गुपचिप येऊन पडलेली मनभर भाताची बशी बघायला चान्स नसायचा
म्हणून भातावर तुटून पडणारा वरणवाला सरकारी कर्मचारी असल्यासारखा भरकन वरण ओतून पळून जायचा काही मिनिटांमध्ये पत्रावळी मधून जसं पाणी जिरपावं तसा खालचा ढेकुळ झिरपून वर येऊ लागायचा आधीच बुंदी आणि उसळीनं रंगलेला भात ढेकळाच्या संगतीनं सावळा दिसायचा एक तर बाराचं लग्न अडीच ला लागलेलं असायचं मे महिन्याचा उन्हाळा मी म्हणतोय वर सूर्य देव उन्हानी रागाने खाली बघतोय प्रत्येक जण उपरण्यांनी घाम पुसाय मध्ये तल्लीन झालेला आहे भूक लागल्यामुळे खाणारे पत्रावळीच्या दुर्दशे कडे न बघता एका मागे एक भाताचे व बुंदीचे ढीग संपवतच पसरलेले मीठ बोटावर चोळून पत्रावळीची घडी घालून पुन्हा ती उडू नये म्हणून मोठा ढेकूळ त्या पत्रावळीवर ठेवायचे आणि पाण्याच्या टँकर कडे धाव घ्यायचे पाण्याच्या पाईपाला ठिबक सिंचनाच्या दहा नळ्या जोडून चिखलात रुतलेला हा स्थितप्रज्ञ पाईप अर्ध पाणी खाली सांडवत असायचा पहाटेला भरून आणलेला थंडगार पाण्याचा टँकर एव्हाना आंघोळीच्या पाण्यासारखा गरम झालेला असायचा प्लास्टिकच्या रंगीबेरंगी ग्लासा मधून दोन घोट पाणी पिऊन लोक आपापल्या घरी परतायचे
पण प्रत्येक जण आपापल्या घरी परतताना पोरीच्या बापाची गाठ घेऊन पोरीच्या बापाने लग्न हे त्याच्या ऐपतीप्रमाणे केलेलं असतं ते कसं का असं ना पण त्याच्या खांद्यावर हात ठेवून लग्न एकदम झकास झालंय आणि जेवण तर एक नंबर झालयं एवढे दोन वाक्य ऐकण्यासाठी त्याने आयुष्य पणाला लावलेलं असतं
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
Comment here