कोंढार चिंचोली येथे विक्रमी रक्तदान
केत्तूर (अभय माने)अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून देशसेवेसाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे निवृत्त सैनिक मेजर ज्ञानदेव शहाजी गलांडे यांच्या संकल्पनेतुन करमाळा व इंदापूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या कोंढार चिंचोली (ता.करमाळा) या ठिकाणी रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेले हे रक्तदानाचे कार्य सायंकाळी सहा वाजले तरी चालूच होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोंढार चिंचोली या गावात सर्वोच्च विक्रमी रक्तदान यावेळी झाले या शिबिरात 477 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे उदघाटन मेजर ज्ञानदेव गलांडे यांच्या आई वडिलांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बारामती ऍग्रो कारखान्याचे व्हॉईस चेअरमन सुभाष गुळवे यांनी मेजर ज्ञानदेव गलांडे मित्र परिवाराच्या कामाचे कौतुक केले.ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजावर आपण प्रेम केले पाहिजे. कारण या समाजाने आपल्याला खुप काही दिलेले आहे आणि समाजाचे काहीतरी देणे आहे असे समजून दरवर्षी रक्तदान करा, असे आवाहन त्यांनी पुढे बोलतांना केले. प्रास्ताविक भाषणात मेजर ज्ञानदेव गलांडे यांनी भविष्यात आपणाला ग्रामीण भागातील मुलांसाठी मोफत पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सुरू करायचे आहे हा मानस व्यक्त केला.
करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली व आसपासच्या गावातील तरुण वर्गाने हिरारीने सहभाग घेत हे विक्रमी रक्तदान घडवून आणले.रक्त संकलन करण्यासाठी रेड प्लस ब्लड बँक, पुणे यांचे सहकार्य लाभले.दिवसभर रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
छायाचित्र :कोंढारचिंचोली ता.करमाळा येथे रक्तदान शिबिराचे उद्दघाटन करताना .
Add Comment