मत देणाऱ्या सभासदांचे रश्मी बागल-कोलते यांनी नुसते भावनिकतेने आभार मानण्यापेक्षा आधी ऊसाची बिले अदा करावित; कुणी केले आवाहन..? वाचा सविस्तर
करमाळा(प्रतिनिधी);
श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीची रविवारी मतमोजणी पार पडली आहे. या मतमोजणीमध्ये शेतकरी सभासदांनी बागल गटाला झुकते माप देऊन, आमच्यावर खुप मोठा विश्वास टाकला असल्याचे सौ.रश्मी बागल यांनी म्हटले आहे. स्व. मामांच्या विचारांवर आमचा गट काम करत असल्याचे भाकीत बागल यांनी केले आहे. खरे तर या विधानावर खुप मोठा प्रबंध सादर करता येऊ शकेल. कारण स्व. मामांनी कधी दुसऱ्यांच्या चुलीत पाणी ओतून स्वतःचे राजकारण केले नाही.
परंतू तुम्ही मामांचे नाव घेता आणि दुसऱ्यांच्या चुली विझविण्याचे काम करता, त्याचप्रमाणे मामांकडे कधी कोणता ही व्यक्ती भेटण्यासाठी आला तर, मामानी जेवणाच्या ताटावरुन उटून त्याची भेट घेतली आहे. परंतू तुम्ही दोघे भाऊ-बहिण मामांचे नाव घेऊन दुसऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचे काम करत आहात.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि श्री मकाई सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्याची एकहाती सत्ता बागलांकडे मोठ्या विश्वासाने, कारखान्यांच्या सभासदांनी दिली होती. परंतू आदिनाथ कारखान्याची तुमच्या अवकृपेने वाट लागली. आणि आता मकाई कारखान्यामध्ये सुध्दा एवढा भ्रष्टाचार आणि एवढा झोलझाल करुन ठेवला आहे कि, त्याचे आता मापच राहिले नाही. सध्यातरी कारखान्यातील सर्व साखर विकून सगळा पैसा तुम्ही लंपास केला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घातला आहे. त्यांचे अद्यापपर्यंत एक रुपया सुध्दा बील तुम्ही अदा केले नाही.
तुम्ही शेतकऱ्यांची बीले वेळेत अदा करु, म्हणून किती वेळा फेकाफेकी केली असेल याचे माप नाही. आणि तरी सुध्दा शेतकरी सभासद तुम्हाला मतदान करेल हे कसं शक्य आहे. आणि जर तुम्हाला शेतकरी सभासदांविषयी एवढे प्रेम ऊतू चालले असेल, तर आधी ऊसाची बीले अदा करा. आणि परत शेतकरी सभासदांची ऊसाची बीले रकडविल्यामुळे, माफी मागून येथून पुढे तरी आता कारखाना नेटाने चालवू असे म्हणून कानाला खडा लावा. त्याचप्रमाणे सध्याच्या बागल गटाच्या नूतन संचालक मंडळावर शेतकरी सभासदांनी जबाबदारी टाकली आहे. असे आपण वक्तव्य करता, मग याआधीचे निष्कामी संचालक मंडळ बेजबाबदार होते, हे आपण मान्य करता काय? अशा प्रकारचा मिश्किल टोला दशरथआण्णा कांबळे यांनी लगावला आहे.
तर पुढे बोलताना कांबळे म्हणाले कि, मतदानाच्या आधी तुम्ही किती जणांच्या गाठीभेठी घेतल्या? त्याचप्रमाणे किती ठिकाणी बोगस मतदान केले गेले? हे काही नवीन सांगायला नको. तुमच्यासाठी कुठल्या-कुठल्या गट प्रमुखांनी, सभासदांना दबावात घेऊन बागलांनाच मतदान करा! असे आदेश पारीत केले.
आदेश देणारांचे सुध्दा निदान आपण आभार मानाल असे वाटले होते. परंतु असो तुमचा आधीच कारखानदारी आणि आमदारकीचा ठरलेला फॉर्म्यूला संपूर्ण तालूक्याने पाहिलेला आहे. त्यामुळे ९८०० मतदान झाले आणि त्यातील ८४०० मतदान तुम्हाला पडले असे म्हणता, तो सभासदांनी दाखविलेला विश्वास नाही.
तर तालुक्याच्या बाहेरुन किती राजकिय वरदहस्तांनी, तुमच्या पॕनेलला मतदानातुन निवडून दिले आहे. हि संपूर्ण तालूक्यात सुरु असलेल्या चर्चेवरुन तुम्हाला समजत असेल. तुम्हाला जर एवढाच विश्वास तुम्ही केलेल्या विकासावर होता.
तर होऊ द्यायची होती निवडणूक, कशाला वरिष्ठ पातळीवरुन राजकीय ताकद पणाला लावून विरोधकांचे चुकीच्या पध्दतीने अर्ज बाद करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले. जो मकाई सहकारी साखर बागलांना नीट चालविता आला नाही.
तो कारखाना या नुतन संचालक मंडळाला चालविता येईल का? कारण या संचालक मंडळामध्ये बरेचसे असे हि संचालक आहेत, कि ज्यांचा ऊसाचा एक टिपरु सुध्दा आतापर्यंत कारखान्याला गेला नाही, अथवा त्यांच्याकडे एक गुंठाभर सुध्दा जमीन नाही. अशा संचालकांना तुम्ही चुकीच्या पध्दतीने संचालक मंडळामध्ये घेतले आहे.
त्यामुळे तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी तुम्ही स्व. मामांचे नाव घेऊन मतांचा जोगवा मागणे बंद करा. कारण तुम्ही फक्त मामांच्या रक्ताचे वारस आहात, मामांच्या विचारांना तुम्ही केव्हाच तिलांजली दिली आहे.
त्यामुळे तुम्ही शेतकरी सभासदांचे आभार मानण्यापेक्षा, तुमच्यासाठी ज्यांनी-ज्यांनी बोगस मतदान केले आहे त्यांचे आभार मानल्यास बरे होईल. असा टोला शेवटी दशरथआण्णा कांबळे यांनी लगावला आहे.
Add Comment