आम्ही साहित्यिक

सत्तरीच्या दशकातली पोमलवाडी अन केतुर                    “”””””””””””””””””””””””””””   🌹 ……..( चला पोमलवाडीला )………🌹                

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

* सत्तरीच्या दशकातली पोमलवाडी अन केतुर *

                   “”””””””””””””””””””””””””””

  🌹 ……..( चला पोमलवाडीला )………🌹

                 “”””””””””””””””””””””””””””””””

       खरंच पोमलवाडी सारखं एखादं गाव असतं की लवकर मनाला भुरळ पाडतं अन भुरळ ही तशी सहजासहजी पडत नसती त्यासाठी पोमलवाडीच्या अंगा खांद्यावर खेळावं लागतं हे बघा ज्याचं घरदार… शेतीवाडी…वतनदारी तिथं आहे त्यांचे ठीक आहे पण माझ्यासारख्या भटकंतीच जिणं असणाऱ्याला पोमलवाडीने जवळजवळ दहा-बारा वर्ष अंगा खांद्यावर खेळवलं.

        तो काळ साधारण 70 च्या दशकाचा असेल तुम्ही म्हणाल अचानक आता कशी काय आठवण झाली तर कालच्या गुढी पाडव्याला म्हणजे आपले हिंदूंचं नववर्ष आता खरं सुरू झालं आपलं नवं कॅलेंडर सुरू झालं कारण हे जे काय हिंदू सण येतात ते 2 फेब्रुवारी…18 मार्च अशा ठराविक तारखांना येत नसतात फक्त मकर संक्रांत याला अपवाद आहे तर ते सण येतात अश्विन शुद्ध प्रतिपदा…चैत्र शुद्ध प्रतिपदा…अश्विन शुद्ध दशमी…वगैरे म्हणजे आपल्यापुढे उभे राहतात तर हे सगळे सण आपल्यासमोर फेर धरून एकामागे एक असे उभे राहिलेले असतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळे सण उत्साहात साजरे केले जातात आणि प्रत्येक सणांचे महत्त्व आणि वैशिष्ट्य वेगळं परंतु प्रत्येक सणांचा हेतू आपल्या माणसांमध्ये व कुटुंबामध्ये आनंद आणि उत्साह घेऊन येण्याचा असतो रंगचपंचमी तसं बघितलं तर एकमेकातील दुरावा कमी करते… गणपतीमध्ये उत्साह आणि आनंदाची भावना जागृत होते… रक्षाबंधनाचा सण बहिण भावांना सजवतो… गुढीपाडवा नवीन वर्षाचे स्वागत करतो…पण या सगळ्यांमध्ये सणांची राणी म्हणून दिवाळीला खास करून ओळखलं जातं.

       मला चांगलंच आठवतंय मी पाचवी सहावीत असताना मला समजू लागल्यापासून समज येईपर्यंत तो काळ त्यावेळी आम्ही रेल्वे कॉर्टर मध्ये राहायचो घर रेल्वेच्या अगदी जवळ होतं पहिली कोळशाची इंजिनं होती उन्हाळ्यात बाहेर अंगणात झोपल्यावर कोळशाचं इंजिन लोड घेऊन धडधड करीत न थांबता वेगात निघून गेल्यावर आम्हाला काय सवय झालेली होती पण पाहुणा आला असेल अन तो अंगणात झोपला असला तर गाडीच्या धडधडीने झोपेतून दचकून वाट फुटल तिकडं अंथरुणातून उठून दोन पाच पावलं पळत सुटायचा आमची होती बैठी चाळ तेव्हा चाळीच असायच्या आणि आमच्या सारखा दुसरा वर्ग थेट बंगला…ब्लॉक…फ्लॅट… अद्याप पोमलवाडीमध्ये जन्मलेले नव्हते आणि तिथूनच बघितलं तर गावात त्याकाळी जुन्या केतुर गावात इन मिन दोन-तीन किराणा दुकानं होती लालचंद रांका रांका…मोहनलाल रांका ..गौतम शेठ संचेती…अशी मंडळी होती त्यापैकी मोहनलाल शेठ हे कधीमधी ताग्यातली कापडं पण द्यायचे परत गावात कटिंग चे दुकान असं नव्हतं पांडुरंग आणि कृष्णा देवकर ही दोघं बाप लेकं होम डिलिव्हरी केल्यासारखी घरी जाऊन दाढी कटिंग करायची जिल्हा परिषदेची गावांमध्ये सातवी पर्यंत सात-आठ खोल्यांची छान पैकी शाळा होती गावामध्ये पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सप्ता असायचा त्या वेळेला गावाला जत्रेचं रूप यायचं तवा मी काय केतुर मध्ये राहिलेलो नाही परंतु वावरलेलो आहे पारेवाडी तलाव वर्षातून एकदा भरायचा त्यावर सगळं बागायती क्षेत्र चालायचं त्यावेळी केतुरला जास्त बागायती आणि नदीकाठी मळई होती मा. पोपटराव पाटील… मा.साहेबराव सखाराम पाटील… मा.रामराव आण्णा पाटील यांनी पहिलं उसाचं उत्पादन या परिसरामध्ये घेऊन प्रत्येकाने आपापल्या गावची शान वाढवली तसंच या लोकांनी पहिल्यांदा हायब्रीड ज्वारीचे पीक त्या काळात आपल्या भागात घेतलं

       दुसरं सांगायचं झालं तर पोमलवाडीला रेल्वे चाळीला चाळच म्हणायचे स्लम हा तुच्छता दर्शक शब्द तवा अवतरला नव्हता माझ्यासमोर पण अशीच एक चाळ होती समोरासमोर आठ खोल्या होत्या सगळी माणसं म्हणजे मूर्तीमंत आनंद आता चाळीतील खोली म्हणजे एकूण 150 स्क्वेअर फुट लांबी रुंदी असलेल्या खोलीत बसवलेले दोन लहान खण लांबी रुंदी नसून पण तिला बळजबरीने खोली म्हणावी लागायची कारण तिच्यामध्ये राहणारी गरीब माणसं मात्र मनाने खोल होती एक सांगतो आम्ही नवीन लोखंडी कॉट घेतली होती चार सेलचा रेडिओ होता उन्हाळ्यामुळे बाहेर ओट्यावर खाट टाकलेली मी अन वडील चांगलं झोपलेलो होतो त्यांनी पण दमल्यामुळं रेडिओ ऐकून ऐकून 11:30 ला रेडिओ स्टेशन बंद झालं होतं म्हणजे केंद्र बंद झालेलं होतं पण रेडिओ चालू असल्यामुळे त्यातून नुसता शु ssss असा आवाज येत होता साधारण रात्रीचे दोन अडीच झाले असतील गडी आलं…गडी आलं कालवा सुरू झाला आमच्य म्हाताऱ्यानी थोडी लावलेली होती तसं पळापळीच्या घाई मध्ये म्हाताऱ्यांनी एका हातात माझ्या बकुटीला पकडलेलं अन दुसऱ्या हातात त्या खाटची घडी करून वही घ्यावी तशा अवतारात दोन ढांगातचं अंगणातनं घर गाठलं आणि दार लावलं कारण हे गडी आम्ही झोपलेलो होतो तिथूनच पळालेले होते पण परत माघारी फिरून दगडफेक करत्याल ह्या भीतीने गणिता प्रमाणे एक लांब तार होती त्याचं पुढचं टोक वाकवून हुक तयार केलं तर लावलेल्या त्या हुकाने दरवाज्याच्या सापटीतून एका टायमाला गोधडी…दुसऱ्या टायमाला उशी… अशी पांघूरणं ओढून घरात सरपटत घेतली ही सगळं काम युद्ध पातळीवर चाललेलं होतं डोळ्यावरची झोप कवाच उडून गेलेली होती तोवर तिकडं पोपट जाधवांच्या वस्तीवर गोंधळ आरडाओरडा सुरू झाला तर अशी ही गडी म्हणजे चोरटे आल्यामुळे झालेली तारांबळ या चाळीतल्या खोलीमध्ये आत्ताच्या सारखा फ्लॅट उथळपणा कोणाच्याच वाट्याला नव्हता चाळीतील अशा खोलीत राहणारा आत मध्ये आंघोळीसाठी मोरी आणि वर कौलं किंवा एखादा पन्हाळी पत्रा निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी थेट निसर्गातच जावं लागायचं तेव्हा आजूबाजूचा बक्कळ निसर्ग खरा होता

       प्रदूषण हा संधी साधू शब्द तवा अस्तित्वातच नव्हता आमच्या चाळीतले बाबा लोक कोणी गॅंग मध्ये…कोणी पोर्टरमध्ये अशी कामवाली मंडळी होती सरकारी नोकरी तसा पगार थोडाच पण पोटापुरता म्हणायचा पण दसऱ्याच्या टायमाला बोनस पण मिळायचा तेव्हा आत्ताच्या सारखं प्रत्येकाचा सरकारी नोकरीकडे कल नव्हता घरामध्ये कमावते फक्त वडील असायचे आणि एखादी बाई क्वचित शेतामध्ये खुरपायसाठी जायची बायांनी नोकरी करायची प्रथा आजच्यासारखी सर्रास नव्हती घरामध्ये कमीत कमी चार तरी पोरं असायची रात्री जेवणं झाली की दोन चाळीतल्या मधल्या गल्लीमध्ये बायकांचा गप्पांचा फड रंगायचा गप्पांचा ग्रुप वयानुसार ठरायचा पुरुषांचे पत्ते खेळायचे सुरु व्हायचे दुसरी करमणूक काहीच नसायची अशा या चाळीतल्या वातावरणात दसरा संपला की कुठून तरी रंगाचा डिस्टेंपरचा वास यायचा चाळीतल्या कोणीतरी रंगकाम करायला घेतलेलं असायचं रंगाचा तो विशिष्ट असा वास माझ्यासाठी दिवाळी जवळ आल्याची वर्दी देणारा दूत बनूनच यायचा आतापर्यंत वयाच्या 63 व्या वर्षी सुद्धा असा रंगाचा वास आला तर मला चटकन ती लहानपणीची दिवाळी आठवतीयं इतकं दिवाळी अन रंग याचं नातं माझ्या मनात पक्कं बसलं आहे आता तीन रूमच्या फ्लॅटमध्ये रूमच्या बंद दरवाज्याच्या आड काय चाललंय हे त्याच फ्लॅट मधल्या राहणाऱ्याला सुद्धा कळत नाही तर शेजारच्या फ्लॅट मधलं काय डोंबलं कळणार

       आता टी व्ही वर नेरोलॅक अन एशियन पेंटच्या जाहिराती दिसू लागल्यावर दिवाळीची चाहूल लागते आणि माझ्या मनातली पण दिवाळी सुरू होते दसऱ्याला सुटलेला रंग कामाचा वास विरतोय ना विरतोय तोच कोजागिरी पासून घराघरांमध्ये जात्याची घर कर ऐकू यायची आधी जात्यावर वेगवेगळ्या पिठांचा दरवळ आणि नंतर तळल्या जाणाऱ्या पदार्थांचा घमघमाट चाळीमध्ये घुमायला लागायचा अशा सीजन मधीच रात्री आठ ला दुकान बंद करणारे मा.आबा निसळ… मा.माधव काका आणि मा.केशव अण्णांच्या मदतीने रात्री बारापर्यंत किराण्याचे दुकान चालायचं आबा नुसती गॅसबत्ती घेऊन अंगणात यादी बनविणे…पैसे घेणे ही कामं करायचे अन तिकडं मा.सर्जेराव मामा दोन चार तास गिरण जास्त चालवायचे कारण प्रत्येक घरातलं भाजणीचं दळायला आलेलं असायचं त्या वेळेला आत्ताच्यासारखं आपल्याच घरापुरता फराळ बनवायची प्रथा नव्हती रेडिमेड फराळाचे पदार्थ हा शब्द तवा जन्माला पण आलेला नव्हता चाळीतल्या सगळ्या बाया एकमेकींच्या घरी जाऊन लाडू…करंज्या शेव…चकली…असे पदार्थ करायच्या कोणाच्या घरी कोणता पदार्थ बनवायला जायचं याचा दिवस नाही तर रात्रही ठरलेली असायची हा कार्यक्रम कोजागिरीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू व्हायचा ते पहिल्या आंघोळीच्या आदल्या दिवशी संपायचा पहिल्या आंघोळी पूर्वीचे 8-10 दिवस तर चाळीतलं वातावरण भारलेलं आणि खमंग वासानं भरलेलं असायचं

       इकडं आमची आकाश कंदील बनवायची धांदल उडायची चाळीतल्या 16 बिऱ्हाडामधी एकच मोठा आकाश कंदील असायचा आम्ही तीन-चार जण पोरं कागद…गोंद खरेदी करून दिवाळीच्या आधी दोन-चार दिवस कंदीलाचं काम संपवायचो त्या आकाश कंदीलामुळे प्रत्येक खोलीच्या बाहेर प्रकाशमान झालं की आम्हाला कृत्य कृत्य वाटायचं आकाश कंदीलाच्या बांबूला एक बारकं लोखंडी चाक असायचं आकाश कंदील पटकन वर जावा म्हणून व नंतर वाऱ्यामुळे कंदीलाने वाऱ्याबरोबर हेलकावे खाऊ नये म्हणून त्याच्या बुडाशी एक पावशेर वजनाचा दगड बांधलेला असायचा आकाश कंदील वर चढवतानी मात्र 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ची आठवण व्हायची मग टेलर आणि वेळ यांचा जसा काय नवरा बायकोचा संबंध…तेव्हाही आम्हाला असल्याचं जाणवायचं टेलर कडे शिवायला दिलेलं कापड देण्याचा तगादा त्याच्या मागे लावायचा त्यासाठी मा. नेमीनाथ मामाकडे मारलेल्या चकरा आठवतात आम्ही आपल्या चकरा मारायचो आणि तिकडे त्यांचं काजेच राहिल्यात…बटनच राहिलेत…ह्या असल्या कारणामुळे आमची बालमनं अजून उगाचच दोन चार चकरा जास्त मारायची खरं पाहिलं तर ते त्यांच्या परीने खूप चांगलं शिवणकाम करायचे पण आम्हा पोरांना दम निघतोय होय शेवटी पोरं येड्या मनाचीच असतात फराळासारखाचं कपड्यांना पण रेडिमेड हा शब्द लागू नसायचा

       अन त्या वेळची काय ती कापडं सांगू एकाच डिझाईनचा दहावीस मीटरचा तागा मा. बिसनशेठच्या दुकानातून आणायचा बापाचा आणि पोरांचा सदरा एकाच डिझाईनचा… पोरींच्या गवणी…आईचा झंपर पण एकच युनिफॉर्म असायचा आणि टेलरच्या दुकानातला नव्या कोऱ्या कापडाचा वास मला पुन्हा दिवाळीची आठवण करून देतो आज कपड्याचा सुकाळ असला तरी दिवाळीच्या वेळी कपडे खरेदीची हौस अध्याप पण टिकून आहे त्यावेळी कापड घेताना मळखाऊ आणि टिकाऊ एवढाच निकष असायचा मॅचिंग बीचिंगची भानगड नसायची जी घालीन ती फॅशन समजायची मग ती रात्र उजाडायची पहिल्या आंघोळीच्या आदल्या दिवशी येणारी रात्र म्हणजे मजेचा दिवस समजायचा कारण उद्या मजा ही कल्पनाच मोठी मजेची असते रविवार पेक्षा शनिवारीच रविवारचं सुख रविवार पेक्षा जास्त अनुभवता येतं रात्री रांगोळीच्या ठिपक्यांचा कागद… पुस्तकं… रंगाच्या डब्या.. शोधून ठेवलेल्या असायच्या रात्री रांगोळीची जागा लाल भडक गेरूने सारवून ठेवायची उद्या पहाटे लवकर उठायचं म्हणून आदल्या दिवशी लवकर झोपायचं वर्षभर आतुरतेने वाट पाहत असलेल्या पहिल्या आंघोळीचा तो दिवस उजाडायचा पहाट अवतरायची वाजण्याइतपत थंडी पडलेली असायची तेव्हा पहाट पाच वाजता सुरू व्हायची परिसरातून दिवाळीच्या स्वागतासाठी फटाक्यांच्या सलामी सुरू व्हायच्या त्या आवाजाने राहिलेला गाव जागा व्हायचा

       झोपेतून उठलं की आई पहिलं आंघोळीसाठी मोरीमध्ये ढकलायची थंडीतल्या पहाटच उठून आंघोळीच्या अगोदर ते थंडगार उटणं अंगाला लावताना काटा उभा राहिल्यामुळे कच्चं प्लास्टर केलेल्या भिताडावानी खरबूडं अंग लागायचं पण पुढची मजा दिसत असल्यामुळे जाणवत नसायचं उटणं लावून झालं की कढत पाण्याचे दोन तांबे अंगावर घालून घ्यायचे अंगाला तवा काय मोती साबण वगैरे असलं काही नव्हतं कारण हमाम नाहीतर रेक्सोना हे खेडेगावचे ब्रँड असायचे कारण एरवी लाईफबाय असायचा त्याचे दोन भाग करायचे का तर साबण मोठा पण आहे आणि लई दिवस जावा म्हणून साबणाचा सुवासिक हा शब्द फक्त फार नंतरचा पहिली आंघोळ झाल्यानंतर पोरी रांगोळी काढायला बसायच्या तोपर्यंत दोस्त कंपनी जमा झालेली असायची फटाके फोडायचा मुख्य कार्यक्रम असायचा मात्र आम्ही पोरं फराळाला फाटा देऊन नवे कपडे घालून फटाके फोडायसाठी सज्ज व्हायचो फटाक्यात फुलबाजे लवंगी.. केपा आणि क्वचित ताजमहाल छोट्या आकाराच्या फटाकड्याची लड लक्ष्मी बॉम्ब हा आमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या पोरांचा प्रांत होता लक्ष्मी आणि ताजमहाल फक्त फटाक्यांचीच नावं आहेत एवढेच यावेळी काय ते माहिती होतं हे स्फोटक ऐवज आहेत हे आता समजतंय टिकली वाजवायला हातोडी…सांडशी…नाहीतर एखादा गुळगुळीत दगड असायचा

       पिस्तूलाची हौस परवडण्यासारखी नव्हती झाडं…भुई चक्र…तुळशीच्या लग्नापर्यंत ठेवायचे ते उडवण्यापेक्षा जपून ठेवण्यात वेगळा आनंद असायचा शिल्लक राहण्यासारखं वापरायचं हे संस्कार तवाचे लवंगी ताजमहाल लावताना पण पूर्ण माळ एकदम लावायची नाही एकेक फटाका सुट्टा करून अगरबत्ती ने शिलगावून वाजवायचा खरं बघाय गेलं तर आत्ताचं सगळचं बदललयं आनंदाच्या कल्पनाही बदलल्यात काळाबरोबर हे सारं बदलणारच पण ते लहानपणीचे दिवाळीचे सुख आत्ता अनुभवताना नकळतच आमच्या वेळची दिवाळी काही औरच आणि राजस होती असं वाटतं आमच्या आई-वडिलांना पण तसेच वाटतं असणार पुढे जाणारी प्रत्येक पिढी नकळत आपल्या भूतकाळात रमलेली असते

       आणि असं रमलेलं असताना आपण जगतोय मात्र आत्ताच्या काळात हे विसरून चालणार नाही जुन्या आठवणी कायम ठेवून नवीन काळामध्ये स्वतःला रुजवणं आवश्यक आहे मात्र आज पाहिलं तर प्रत्येक सणाला आपला तो सत्तरीच्या दशकातला सण आठवतोयं ती शुक्रवार आठवडी बाजार ची लगबग लेकी बाळी माहेराला आलेल्या सुनांना पण त्यांच्या माहेरी पाठवलेलं सगळं कसं दिसतंय अन असं वाटतंय आलेला प्रत्येक दिवस दिवाळीचा आहे सकाळी उठल्यावर आज पहिली आंघोळ आहे असा फील येतो आणखी काय हवं

*************🤣🤣🤣🤣🤣**********

किरण बेंद्रे

पुणे

7218439002

litsbros

Comment here