कृषी प्रदर्शनाचा फार्स करण्यापेक्षा अगोदर शेतकरी, कामगार, वाहनमालकांची बिले द्या : शंभुराजे जगताप
करमाळा(प्रतिनिधी); कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या बागलांनी आपल्या मकाई कारखान्याला शेतकऱ्यांनी घातलेल्या उसाचे पैसे तात्काळ द्यावेत.बागलांनी कृषी प्रदर्शनाचा फार्स आपल्या राजकीय स्वार्थासाठी केला आहे अशी टीका जगताप गटाचे युवा नेते तथा करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी केली आहे.
मकाई कारखान्याकडून शेवटच्या महिन्यात आलेल्या उसाला काटा पेमेंट देणार असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात शेतकऱ्याला काटा पेमेंट तर दिलेच नाही शिवाय ऊस घालून चार चार महिने झाले तरी देखील शेतकऱ्यांना ऊसाची बिले मिळालेली नाहीत.वाहन मालकांची अवस्था ही तशीच आहे.
या विषयी अधिक बोलताना जगताप म्हणाले कि बागलांनी वारेमाप भ्रष्टाचार करून कारखान्यांची अक्षरशः दुर्दशा केली. परंतु तरीदेखील आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला ठेका देवून स्टॉलच्या नावाखाली पैसे गोळा करून तुम्ही कृषी महोत्सवाचा घाट घातला आहे.
इथल्या शेतकर्यांना बीले नाहीत, कामगारांना पगारी नाहीत व तुम्ही हेलिकॉप्टर राईड्च्या माध्यमातून पैसे गोळा करण्यात मग्न आहात हा निर्लज्जपणाचा कळस आहे. तुम्ही रोख पेमेंट जाहीर करून देखील शेतकरी तुम्हाला ऊस घालत नाहीत, तुमची विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे.
त्यामुळे यापुढे बागलांनी कृषी प्रदर्शना सारखी किती जरी नौटंकी केली तरी या तालुक्यातील जनता या नौटंकीला फसणार नाही, आपल्याला राजकीय सहानुभूती मिळणार नाही असेही शंभूराजे जगताप यांनी म्हटले आहे.
Comment here