जेऊर येथे शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन; युवा नेते पैलवान पृथ्वीराज पाटील यांची माहिती, ‘हे’ असेल आकर्षण
करमाळा प्रतिनिधी जेऊर तालुका करमाळा येथे रविवार 26 मार्च रोजी शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक सोहळा आयोजित केला असल्याची माहिती संयोजन समितीकडून देण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती देताना सांगण्यात आले की दर वर्षी प्रमाणेच ग्रामपंचायत, मा आ नारायण (आबा) पाटील मित्रमंडळ व पै पृथ्वीराज (भैय्या) पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व ग्रामस्थ व शिवप्रेमींना सहभागी करून शिवजयंती महोत्सवाचे आयोजन केले जाते.
यंदाच्या वर्षी रविवार दि 26 मार्च रोजी जेऊर ता करमाळा येथे सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मिरवणुकीस सुरुवात होणार आहे.
या मिरवणुकीमध्ये डोंबिवली येथील 80 मुले व मुलींचा समावेश असलेले ब्रम्ह ताल ढोल-ताशा पथक, कोल्हापुर येथील सर्वोदय टिम द्वारे दांडपट्टा, तलवार बाजी, लाठी-काठी व भाला आदिंची प्रात्यक्षिके, वैराग येथील 100 मुलांचे लेझीम पथक, कराटे व मैदानी खेळ, झांजपथक आदिंचा मिरवणूकीत सहभाग असणार आहे.
यंदाच्या मिरवणूकीचे खास आकर्षण म्हणून रोप मल्लखांबचे राष्ट्रीय कोच पांडूरंग वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखालील 15 जिल्हा व राज्यस्तरीय खेळाडू मुलींची तसेच 25 मुलांची मल्लखांब टिम ही चालू मिरवणूक दरम्यान चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखविणार आहे. काटी व जेऊर येथील हलगी पथके व दोस्ती ब्रास बँड करमाळा यांचे वाद्यकाम राहणार आहे. मिरवणुक वाहन तसेच मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे.
दि 26 मार्च रोजी बाजारतळ जेऊर येथून सायं पाच वाजता मिरवणूक सुरु होणार असल्याने जेऊर व परिसरातील शिवप्रेमींनी या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान संयोजन समिती सदस्य राजाभाऊ जगताप, उमेश कांडेकर, सागर बादल आदिंनी केले आहे.
Comment here