धक्कादायक! सासुरवाडीत पत्नीचा गळा आवळला मग स्वतः केली आत्महत्या
माढा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील व्होळे खुर्द या ठिकाणी एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशांत महादेव ओहोळ (वय 34, मूळ रा. मोडनिंब, सध्या रा. व्होळे खुर्द) असे पतीचे तर सोनाली ओहोळ (वय 26) पत्नीचे नाव आहे.
प्रशांत हा त्याच्या आई-वडिलांसोबत भांडण करुन आपल्या सासरी आला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून तो सासू सासऱ्यांच्या गावीच राहत होता. जावई आणि मुलगी डोळ्यासमोर राहत असल्याने सासरचे लोक देखील आनंदात होते. पण, प्रशांतने अचानक हे धक्कादायक पाऊल उचलल्याने त्यांना जबर धक्का बसला आहे.
प्रशांत ओहोळ याने पत्नी सोनालीचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना माढा तालुक्यातील व्होळे (खुर्द) येथे शनिवारी सकाळी घडली आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. टेंभुर्णी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जावयाने मुलीला ठार करून स्वतःही आत्महत्या केल्याने सासू-सासऱ्याला आणि सासरकडील लोकांना जबर धक्का बसला आहे. जावयाने अचानक हे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
Comment here