***** अडगळीतली फणेरपेटी *****
*********************
आता बघा श्रृंगार म्हटलं की हा शब्द तंतोतंत जुळतो तो म्हणजे महिला वर्गाला कारण नटणं… मुरडणं…लाजणं… लाडीकं लाडीकं चाळा… या गाण्यातून पण दाखवून दिलंय तर यालाच ग्रामीण भाषेत शिणगार म्हणतात अन संस्कृतीनेच ठरवलंय की स्त्रियांचा शृंगार हा एकंदरीत सोळा प्रकारचा आणि त्याला इकडं तिकडं दुर्लक्षित जाऊ नये म्हणून चंदनाच्या पेटीत सुखरूप सुस्थितीत राहावा म्हणून फणेर पेटीचा जन्म झाला खरं बघितलं तर ही फणेर पेटी चंदनाच्या लाकडाची नाही म्हटलं तर झालीच तर शिसवाची तरी असते त्याची ती छोटीशी पितळी कडी हा जणू फणेर पेटीचा अलंकार कारण फणेर पेटी स्त्रीचा एक अलंकार आणि या फणेर पेटीचा हा पितळी कडी कोयंडा अलंकार आता या पेटीचं सांगावं तेवढं कवतिक थोडंच म्हणावं लागेल कारण हे जे काही साज शृंगाराचं साहित्य एकाच ठिकाणी राहावं म्हणून ही फणेर पेटी हातात सौंदर्य प्रसाधनाची हळवी शृंगार पेटी.
पूर्वी बायका केस विंचरायला लाकडाची फणी वापरायच्या आणि ही फणी ठेवण्यासाठी असणाऱ्या लाकडीपेटीला फणेर पेटी म्हणायचे चंदन तर कधी शिसवाच्या लाकडापासून ही पेटी बनवायचे ती सर्रास सर्वांकडे नसायची फक्त मोजक्या अन हौशी लोकांकडेच ती बघायला मिळायची सुबक चौकोनी अथवा आयताकृती पेटीला वर पितळेची कडी पेटी उघडायला असायची आणि बंद करायला एक नाजूक पितळी कडी कोंडा असायचा पेटीवर पाना फुलाची किंवा नाजूक उठावदार नक्षी असायची पेटी उघडली की दर्शनी भागामध्ये वरच्या झाकणाच्या आतल्या बाजूला एक आरसा बसवलेला असायचा पेटीच्या खालच्या बाजूला वेगवेगळे कप्पे असायचे त्यात फणी ठेवायला एक कप्पा… कुंकवाचा लाकडी करंडा…मेणाची डबी… काजळाची डबी… यासाठी वेगळा कप्पा अजून हौसेनुसार केसाचे आकडे… अंबाड्याच्या विणलेल्या जाळ्या … घुंगराचे क्वचितच मिळणारे चाप… नाजूकशी अंबाड्यात खोचायची फुलं…असं काहीही वेगवेगळ्या कप्प्यात विराजमान असायचं
पावडर…स्नो त्याकाळी नव्हतं त्यामुळे आटोपशीर सौंदर्यप्रसाधनं ठेवायला ही पेटी उपयुक्त असायची तसंच प्रवासाला न्यायला पण ही पेटी सोपी पडायची पूर्वी बायका कुठं पण केस विंचरत नसायच्या ज्येष्ठ पुरुषासमोर देखील केस विंचरणं ते म्हणजे मॅनर्स नसल्याचा भाग समजायचे आणि समजा केस विंचरताना कुणी पुरुष माणूस आलाच भले नवरा असला तरी विंचरणं तसचं सोडून डोक्यावर पदर घ्यावा लागायचा त्यामुळे जिकडे जास्त पुरुषांचा वावर नसेल तिथं सर्व कामे आटपून कारण सकाळच्या कामाच्या गडबडीत स्वतःकडे लक्ष द्यायला स्त्रियांकडे वेळ नसायचा मग परसदारी सावलीत निवांत बसून केस विंचरायचा कार्यक्रम चालायचा केस विंचरून घट्ट अंबाडा बांधला जायचा एकही केस किंवा बट दिसू नये याची काळजी घेतली जायची परसातलं एखादं फुल त्यावर खोचलं जायचं हौदातील नाहीतर रांजणाच्या पाण्यानं चेहरा धुऊन पदराने स्वच्छ पुसला जायचा फणेर पेटीतील आरशात बघून मग कपाळावर मेणाचा पातळ थर दिला जायचा आणि मग त्यावर चिमटीने कुंकू लावून बोटाने गोलाकार किंवा लंबगोलाकार दिला जायचा
तशीच एक चिमट भांगात भरली जायची मग चेहरा निरखून निरखून आरशात बघितला जायचा मनासारखं सारं जुळून आलं की गालावर हळुवार स्मित फुलायचं आणि कसं प्रसन्न प्रसन्न वाटायचं कंगवा कुंकू…मेण फणेर पेटीमध्ये बंद व्हायची आणि देवळीमध्ये किंवा फळीवर विश्रांती घ्यायची ती दुसऱ्या दिवसाची वाट बघत नंतर काळ बदलला युगं बदलली प्लास्टिकचा जमाना आला आणि लाकडी फण्या बंद झाल्या खरंतर फणीचे दात जवळजवळ असल्यामुळे डोक्यातील धूळ अन मळ साफ व्हायचा न केस स्वच्छ राहायचे परिणामी केस गळतीचं प्रमाण कमी असायचं कंगव्याने म्हणावं तसं केस स्वच्छ होत नाहीत फण्या गेल्या अन फणेर पेट्यांची गरज हळूहळू कमी होऊ लागली आणि त्या आपोआप अडगळीत गेल्या आता बंगल्यामध्ये ड्रेसिंग टेबलात मेकअपचे सगळे साहित्य असतं आणि तिथे तास न तास असण्यात गेला तरी हरकत नसती मध्यमवर्गीयांच्यात पण आरशाला जोडलेली एखादी प्लास्टिकची पेटी असते तिथे कंगवा… टिकल्या वगैरे ठेवलेलं असतं आता फणेर पेटी म्हणजे शृंगाराचा उगम व एक साठवण तर आता हे निसर्गात स्त्री वर्गाचा शृंगार म्हणजेच नटणे व संस्कृती जपणे तर एकंदर हे सोळा शृंगार यामध्ये कोणते आरोग्याचे रहस्य लपलेत बघा केसांमध्ये गजरा फुले किंवा वेणी यांना स्त्रियांचे दागिने म्हणतात.
म्हणजे सुगंधाचा मनाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होऊन मन प्रसन्न आणि आनंदी राहते कपाळावर बिंदी लावल्यामुळे व्यक्तिमत्व प्रभावी होतं डोक्याच्या मध्यभागी बिंदी लावल्यामुळे तिसरा डोळा जागृत होतो म्हणून वैज्ञानिक परिणाम होऊन महिलांचा आत्मविश्वास अधिक वाढतो त्यावेळी मन देखील शांत राहतं शरीर शास्त्रानुसार सिंदूर ज्या ठिकाणी सजवला जातो सिंदुरामधले घटक चेहऱ्यावरील सुरकुत्यांचा प्रभाव कमी करतं हार किंवा मंगळसूत्र कानातील झुमके.. मांग टिक्का… बांगड्या… बाजूबंद…कमरबंद… पैंजण… जोडवी…नथ… अंगठी… मेहंदी… काजळ… लाल किंवा हिरव्या रंगाचे कापड परिधान केल्यामुळे सौंदर्याचं वेगळचं उठून दिसणं… शृंगाराचं म्हणाल तर जिला नटायला आवडत नाही अशी एखादी सुद्धा महिला सापडणार नाही नव्हे विरळच कारण महिलावर्ग आणि शृंगार म्हणजे नटणं या शब्दांना एकमेकापासून वेगळं करता येत नाही सगळ्याच महिलांना नटायला आवडतं ती तर आपली संस्कृतीच आहे म्हणा आणि त्याच्या या नटण्याला शास्त्राचा आधार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
32 वर्षानंतर उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांनी अनुभवली आपली शाळा
कारण सोळा शृंगाराबद्दल आपल्या वेदांमध्ये सुद्धा छानशी कल्पना म्हटली गेलेली आहे सण समारंभाचा विचार केला तर विवाहित स्त्रिया करवा चौथ…वटपौर्णिमा… मकर संक्रांत.. गौरी गणपती… प्रत्येक शुभकार्य आणि शुभप्रसंगी संपूर्ण सोळा शृंगार करून स्वतःला नटवतात एक विवाहित स्त्रीसाठी हे सोळा शृंगार आवश्यक आहेत आणि प्रत्येकीसाठी हे खूप महत्त्वाचं मानलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये पूजेपासून लग्नापर्यंत प्रत्येक शुभप्रसंगी हे महत्त्वाचं आहे महिलांच्या या सर्व दागिन्यांमध्ये मंगळसूत्र व काळे मणी खूप आवश्यक अन महत्त्वाचे समजले जातात
********************************
किरण बेंद्रे
पृथ्वी हाईट्स… कमल कॉलनी…मांजरी
पुणे
7218439002