केतूर परिसरात अवकाळी पावसाची हजेरी
केत्तूर ( अभय माने) गेल्या दोन-तीन दिवसापासून करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभ क्षेत्रातील इतर परिसरात ढगाळ वातावरण तयार होत आहे. पावसाचे वातावरण तयार होऊनही पाऊस काही पडत नव्हता मात्र सोमवार (ता. 27 ) रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाच्या हलक्या सरीने हजेरी लावल्याने नागरिकांची व शेतकऱ्याची एकच धावपळ उडाली.तसेच परिसरात गेल्या आठवड्यात रात्रीच्या वेळी दाट धुकेही पडत होते.
दरम्यान सध्या पडत असलेला हा पाऊस तालुक्याच्या पश्चिम भागातील रब्बी हंगामातील ज्वारी पिकास वरदान ठरणार आहे, मात्र ढगाळ हवामानामुळे कांदा,गहू, हरभरा पिकावर रोगराई वाढून औषध फवारणीच्या खर्चात वाढ होणार असून शेतकऱयांची दुसऱ्या बाजूने डोकेदुखी ही वाढणार आहे. ढगाळ वातावरणामुळे पडू लागलेली थंडी मात्र पुन्हा एकदा गायब झालेली आहे.
दरम्यान अरबी समुद्रात हामून चक्रीवादळ आल्याने मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
Comment here