महत्वाची बातमी; मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस पुढील आदेश येईपर्यंत बंद
करमाळा (प्रतिनिधी);
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न हा तणावाचा आहे. अशातच आता कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ही बससेवा बंद राहणार आहे.
महाराष्ट्रात सध्या मराठा आंदोलन तीव्र झालं आहे. ठिकठिकाणी जाळपोळ झाल्याच्या घटना समोर येत आहेत. बसेस जाळल्या जात आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसेस टार्गेट केल्या जात असल्याने कर्नाटकच्या परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाची सद्यस्थिती काय?
मनोज जरांगे पाटील हे मागच्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. अशात आता या आंदोलनाचं लोन राज्यभर पसरलं आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत.
आमदार प्रकाश सोलंकी आणि जयदत्त क्षीरसागर यांची घरं पेटवली गेली. त्यांनतर राज्यात ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. बसेस जाळण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर आता कर्नाटक सरकारने आपल्या बसेस महाराष्ट्रात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात प्रवेशबंदी
महाराष्ट्रातील तीन मंत्री आणि खासदारांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आज (31 ऑक्टोबर) सकाळी दहा वाजल्यापासून ते 2 नोव्हेंबर संध्याकाळपर्यंत ही प्रवेश बंदी असणार आहे.
तसा आदेश कर्नाटक सरकारकडून जारी करण्यात आला आहे. 1 नोव्हेंबरला महाराष्ट्र एकीकरण समिती काळादिन पाळणार आहे. या दिवशी रॅलीही काढली जाणार आहे. त्यांनतर मराठा मंदिर इथं सभा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळादिन कार्यक्रमात मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर हे राज्य सरकारमधील मंत्री जाणार आहेत. तर खासदार धैर्यशील माने हे देखील या कार्यक्रमाला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या भाषणामुळे कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील या मंत्र्यांना आणि खासदारांना कन्नड संघटनेचे कार्यकर्ते घेराव करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाषिक तेढ निर्माण होऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याचीही शक्यता आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगाव शहर आणि जिल्ह्यात बंदी घातली जात आहे, असं जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी म्हटलं आहे. तसे आदेश त्यांनी दिले आहेत.
Comment here