आम्ही साहित्यिक

** प्राजक्तांच्या फुलातलं म्हातारपण **                   // इथं रिटायर लोकांचं मांडलंय… //        // हाय ती बरंय म्हणायचं //

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

** प्राजक्तांच्या फुलातलं म्हातारपण **

         

        // इथं रिटायर लोकांचं मांडलंय… //

       // हाय ती बरंय म्हणायचं //

     हे बघा… प्राजक्ताचे फुल म्हणजे काय फुलांचा राजा किंवा प्रधान नाही तर त्याचे एक स्वतःच असं एक अस्तित्व आहे एक वेगळा रंग दिमाख आहे ते फुल शक्यतो तोडावं लागत नाही सूर्योदयापूर्वी त्याचा अंगणात सडा पडलेला असतो तवा काय कुणी झाड हलवत नसतंय ती एक निसर्गाची किमया आहे… आणि अगदी तसंच मायेचा सडा सगळी म्हातारी माणसं आपल्या कुटुंबावर टाकत असतात म्हणून ही एक कल्पना…

      निवृत्ती ही प्रत्येकाच्याच कपाळी असते आपण नुसतं नोकरीतून रिटायर होतो असं नाही तर पार शेतकऱ्यापासून व्यापाऱ्यापर्यंत सगळेच एखाद्या दिवशी रिटायर हे होत असतात म्हणजे बघा जोपर्यंत अंगात रग आहे नसानसात उत्साह आहे तोपर्यंत अंगात एक प्रकारची चलाखी असते तवा त्याला शेतात काम करताना पण वेळ काळ याच काही पण भान राहत नाही आता त्याला काही लंच टाईम नसतो गठुडयात बांधून आणलेली भाकर तो बांधावर बसून कवापण खाऊ शकतो पण बिचारा शेतात कुळवणी व नांगरणी करताना कामाच्या रगाड्यात दिवस दिवस उपाशी राहतो ती भाकर सुद्धा खात नाही तसंच गठुडं परत वस्तीवर नेलं जातं आणि सांच्याला तीच खाल्लं जातं तसंच व्यापाऱ्याच पण लोकांची दुकान नऊ-दहा वाजता बंद व्हायची पण ह्यो लालसे पोटी रात्री दहा साडे दहापर्यंत दुकान चालवायचा का तर तेवढाच जादा धंदा होईल पण 80 च्या पुढे गेल्यावर गात्र गळीत झाल्यानंतर तिकडं दुकान आठला बंद करा नाहीतर दहाला बंद करा तिकडे लक्ष देत नाहीत.

     अगदी तीच परिस्थिती नोकरी करणाऱ्यांची पण असती पण एक मात्र खरयं की अंगातलं अवसान गेल्यावर माणूस खऱ्या अर्थाने रिटायर होतोय पण तोंडातलं अवसान मात्र कायम असतं काय झालं एकदा मी एस टी ने प्रवास करीत होतो माझं लक्ष समोरच्या चार वर्षाच्या मुलाकडे गेलं मुलगा खूप गोंडस होता त्याचे आई-वडील वृद्ध आजी बाजूला बसलेली होती आणि तो आपल्या आजोबांच्या सोबत खिडकीत बसून गप्पा मारत होता त्या मुलाचे अल्लड बोल व कल्पना आजूबाजूच्या प्रवाशांना भुरळ पाडीत होत्या व आकर्षित करीत होत्या मी त्या मुलाची गंमत पाहत होतो काही वेळाने तो मुलगा आजोबाच्या कुशीत झोपी गेला त्याची आई मला म्हणाली खूप लाडका आहे आजोबांचा दोघांचं खूप छान जमतं एकमेकांशिवाय दोघांना पण करमत नाही तितक्यात ते आजोबा हसून म्हणाले मुद्दलापेक्षा व्याज जास्त हवाहवसं वाटतं मुद्दल तर आपलंच असतं पण व्याज ही आपली कमाई असते खरंच आजकाल वृद्धाश्रमातील कटू बातम्या ऐकून मन खिन्न होतं हा प्रसंग पाहिला आणि मनात आलं खऱ्या सुखी कुटुंबाची आणखी व्याख्या दुसरी ती काय असावी.

     त्या आजोबांचा व्याज आणि मुदलाचा हिशोब माझ्या मनावर प्रभाव टाकून गेला खरंच प्रत्येक नातं ही गुलाबाच्या कळीसारखा असतं हळूहळू खुलणारं जसं जसं त्याला हळुवार प्रेमाची फुंकर मिळती तसं तसं ते हळुवारपणे खुलत जातं आणि जितकं खुलत जातं तितकं ते अधिकाधिक सुंदर आणि सुगंधित होतं आयुष्याची संध्याकाळ झाली की जेष्ठ मंडळींना निवांत वेळ हा खूप मिळतो नोकरी व्यवसायातून हे निवृत्त झालेले असतात निम्म आयुष्य दगदग आणि टेन्शनमध्ये संपलेलं असतयं काही नाही तरी घरातून निघाल्यावर ऑफिसपर्यंत सुखरूप जाईल का? अन ऑफिस सुटल्यावर घरापर्यंत नीट जाईल का? याची काही गॅरंटी नाही बरं रात्री घरात झोपल्यावर पण उद्या परत कामाला जायचं म्हणजे त्याचं कसं झालं पोरगी लय दिवस माहेराला राहून उद्या सासरी जायची म्हणून आदल्या मुक्कामाची ती एक भावनिक तडफड

     निवृत्तीनंतरचा काळ हा खर तर निवांत असतो पण हा निवांतपणा काही लोकांना त्रासदायक वाटत असतो तर काहींना कंटाळवाणा वाटतो काही मोजक्यांची निवृत्तीनंतरची वेळ आनंदात जाते आयुष्याची सांजवेळ कंटाळवाणी आणि त्रासदायक का वाटावी याला जबाबदार कोण ज्येष्ठ मंडळी का तरुण वर्ग का आजकालची दिवसेंदिवस बदलत चाललेली जीवनशैली याची कारणं तसं पाहायला गेलं तर अनेक असू शकतात जर वृद्धाश्रमातील जेष्ठ मंडळींना प्रश्न विचारला की तुमचा मुलगा काय करतो तर डॉक्टर…इंजिनियर… प्रोफेसर… आहे मोठ्या पगारावर साहेब आहे… तिकडे विदेशात आहे… अशी त्याला त्याच्याकडून उत्तर मिळतात कोणत्याही शेतकऱ्यांनी किंवा मोलमजुरी करणाऱ्या ऊसतोड कामगार अथवा वीट भट्टीवर काम करणाऱ्यानी मोल मजुरी पासून अलिप्त न राहून आईबापांना वृद्धाश्रमात आणून सोडलं नाही याला कारण त्यांची आपल्या आई बापाला सांभाळून घ्यायची तयारी असते पण तरीपण घरामध्ये जेष्ठ मंडळी वरून लहान मोठे वाद हे होतच असतात आणि त्याचं कारण त्यांची विचारसरणी आजच्या तरुण वर्गाशी जुळत नाही

     आज-काल सर्वत्र नकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्याला जास्त पाहायला मिळतो त्यामुळे आजच्या युवा वर्गात सहनशक्ती फार कमी झालेली आहे तसंच वय वाढलं की जेष्ठ मंडळींचा स्वभाव लहान मुलांसारखा चिडचिडा होतो त्यांच्या आपल्या मुलाकडून व सुनेकडून खूप अपेक्षा असतात प्रत्येक युवा वर्ग त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पण आपण पाहतो प्रत्येक घरामध्ये आपल्या मुलांची आणि सुनेची तुलना इतरांशी केली जाते. शेजारच्या मुलांनी आई-वडिलांना आमक्या आमक्या ठिकाणी तीर्थ यात्रेला पाठवलं फिरायला पाठवलं हे आणलं ते आणलं मुलांनी काही आणलं तर एक तर शेजाऱ्याच्या मुलाशी नाहीतर सुनोशी तुलना करायची तो किती चांगला आणि तू किती कमी पडतो असं वारंवार टोमणे मारल्या सारखं प्रत्येक कामात टोचून बोलायचं सुनेची तुलना आपल्या लोकांशी करणे तिला पण टोचून बोलणं सारखं सारखं आमच्या काळी असं होतं आम्ही एवढे कष्ट घेतलेत आम्हाला हे मिळालं नाही किंवा ते मिळालं नाही आणि आम्ही असे कष्ट केले म्हणून तुम्हाला हे सुख पाहायला मिळते काही ठिकाणी तर अतिशोक्ती होते सुनेला मुलगी मानलं जातं पण एक लक्षात ठेवा मुलगी ही मुलगी असती सून कधीच मुलगी होत नाही एखाद्या ठिकाणी अपवाद असेलही तो एक देखावा असतो असं वारंवार नेहमी कुचकं बोलून त्यांचं मानसिक खच्चीकरण करणं हे काही बरोबर नाही

              त्यामुळे नात्याची गाठ नकळत कुठेतरी सैल होते आणि मनोमन दुरावा निर्माण होतो मुली आपल्या आईचं घर सोडून येतात त्या आपल्या सासू-सासर्‍यामध्ये आई-वडील शोधत असतात पण वारंवार त्यांची इतरांशी तुलना त्यांच्यातील दुरावा निर्माण करायला कारणीभूत ठरतात जसं नात्याला व नाण्याला दोन बाजू असतात तसेच काही मुलींना सासरी जुळवून घ्यायची तयारी नसते त्यांच्यामध्ये ती एक विशिष्ट प्रकारची सहनशक्ती कमी असते त्यामुळे घरामध्ये वाद होतात नातं हे फुलपाखरासारखं असतं त्याला जर मोकळं सोडलं तर मोकळेपणाने उडताना ते खूपच सुंदर दिसतं आणि हातात घट्ट धरून ठेवलं तर त्याची पंख चुरगळून जातात त्याच सौंदर्य नष्ट होतं आणि त्याप्रमाणे आपण आणि आपल्या लेकरांमधील नात्याला जर घट्ट धरून ठेवलं नेहमीच त्याच्या प्रत्येक कामात चुकाच काढत गेलो तर त्याच्या व आपल्यामध्ये पोकळी वाढत जाते आपण आपलं आणि मुला मधलं नातं घट्ट धरून ठेवण्यासाठी सगळे मार्ग अवलंबत असतो त्याच्यातील काही त्याला आणि आपल्यालाही त्रासदायक असतात मुलं तारुण्यात येताना एक नवचैतन्य निर्माण झालेलं असतं त्यांच्यातील चैतन्य ओळखून त्यांचे मित्र बनून मार्गदर्शन करणे योग्य ठरतं घरामध्ये सून असल तर तिच्यातील गुण ओळखून तिला प्रोत्साहन दिले पाहिजे जेव्हा मुलं आणि सुनेचे खरे मित्र बनून प्रोत्साहित कराल तेव्हा त्यांच्या मनामध्ये तुमच्या पासून दूर जाण्याचा विचार सुद्धा येणार नाही

     उलट वेळोवेळी ते तुमचे मार्गदर्शन घेण्याबाबत उत्सुक असतील उतार वयामध्ये ज्येष्ठ होऊन मार्गदर्शक बनावे म्हातारं होऊन टोमणे मारणारे नाही माझ्या पाहण्यामध्ये आलेले काही तर्क वितर्क असे की जी जेष्ठ मंडळी असतीयं ती या तरुण वर्गाला अजिबात कुठेच वाव देत नाही हे पण एक दृष्टीने चुकीचं आहे का तर तवा गाव पातळीवर ग्रामपंचायत निवडणूक असायच्या तवा तरुण रक्ताला थोडा तरी वाव दिला पाहिजे आणि इथं हीच मंडळी हात थरथर करतोय सही काय पण अंगठा पण उमटवता येत नाही तरी पुढची टर्म लढवायची बाबा अशी भारी इच्छा तरुण वर्गाला म्हणतात कसं काय तुम्हाला जमल का? अरे तुम्ही काय केलं दिवे लावल्यात ही साऱ्या गावाला ठाव आहे आणि एके ठिकाणी दोन-तीन वेळेला जाण्याचा योग आला चांगलं दुमजली ऐस पैस बंगला…गाड्या…नोकर चाकर…राजकारणामध्ये वावर कायम घरामध्ये माणसांचा राबता मी सहज विचारलं तुमचे वडील कुठे दिसत नाही तर म्हणतोय कसा त्यांना इथलं वातावरण सूट होत नाही हा ना मिसेसचे आणि त्यांचे विचार जुळत नाहीत म्हणून वृद्धाश्रमात त्यांना ठेवलेलं आहे मग म्हटलं जिन्याच्या जवळच्या खोलीत कॉटवर असतात ते कोण तर म्हणतोय ते तिचे वडील आहेत म्हणजे बघा काय न्याय हिच्या वडिलाला हितलं वातावरण सूट होतंय आणि त्याच्या वडिलाला वातावरण सूट होत नाही असं कोणत्या कटिबंधातलं वातावरण आहे हे बघा एका हाताने काही टाळी वाजत नाही कारण घरोघर मातीच्या चुली शेवटी घर आहे भांड्याला भांड हे लागणारच पण त्याचा आवाज खऱ्या अर्थाने उंबऱ्याच्या आत पाहिजे कारण हा विषय गावाच्या चर्चेचा होऊ नये

**************************************

किरण बेंद्रे

पुणे

7218439002

litsbros

Comment here