आम्ही साहित्यिक

… फिरस्ता जोतिषी…  ——— ( एक अनोखी शब्दफेक )———

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

… फिरस्ता जोतिषी…

 ——— ( एक अनोखी शब्दफेक )———

        **************************

     आता बघा एकदाची कर्म धर्म संयोगानी गावची निवडणूक लागली निवडणूक जरी गाव पातळीवर असली तरी काही काही ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या कितीतरी पटीनं गाव पातळीवर या निवडणुकीमध्ये रंगत येते खरचं बघायसारखा आणि मजेदार सोहळा असतो कारण गाव पातळी म्हटली म्हणजे त्या उमेदवाराची सगळी कुंडली प्रत्येक गावकऱ्याला माहीत असतीयं पण दुसऱ्या मोठ्या निवडणुकीत उमेदवार हा परगावचा असतो फक्त नावानिशी व त्याचं कार्य एव्हढ्यावर आपण त्याला ओळखतो त्यामुळे सर्वसामान्यांना त्याची एवढी काय माहिती नसते आणि म्हणून तो त्याच्यामध्ये एवढा रस घेत नाही आपलं स्थानिक राजकारण बरं याकडे त्याचा जास्त कल असतो आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ.

     आता समजा ग्रामपंचायतीची किंवा लोकसंख्या वाढल्यामुळे तर नगरपालिका म्हणा या निवडणुकीमध्ये गेल्यावेळी कसातरी निसटता पराभव स्वीकारलेले व यावेळी हुरुपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असे महाशय खूप नियोजनबद्ध चालले होते प्रचार यंत्रणा पण तंतोतंत योग्य होती कुठेही शंकेला वाव नव्हता पण एका अवघड वळणावर गावामध्ये लोककलेची जोपासना करणारा फिरता ज्योतिषी आला आणि एक विचाराला वेगळी कलाटणी मिळाली हे बघा ज्योतिषी ही एक कला आहे नव्हे साधना पण म्हणावी लागेल कारण ती काय कुणाला पण येत नाही आता ही ज्योतिषी एवढं काय वयानी नव्हतं तसं बघितलं तर नुकतीच किशोर अवस्था पार केलेलं पंधरा वर्षाचं पोरगं…. पण त्याला मानावं लागेल रस्त्याने जरी मोकळं चाललं तरी त्याची ती वेशभूषा आकर्षक पणे वाटायची एकपात्री नाटक केल्यावानी स्वतःशीच बडबड करत चालायचं अगदी हावभाव सादरीकरण करून अशी काही शब्द फेक करायचं की समोरचा माणूस आणि मग हे काय म्हणतात सगळं थोतांड आहे किंवा ही लोकं काहीतरी बनवाबनवी करतात डोळ्यात माती फेकतात असली विशेषण जरी असली तरी काय झालं गल्लीतल्या चार जणांच्या सांगण्यावरून याची गाठ त्या उमेदवारासंग पडली आणि त्यामुळे झालं काय तर लेखाला इथून सुरुवात झाली

     आता बघा गावातलं ही उमेदवार चांगलं मेन रोडनी चाललं होतं तर त्याला पायवाटेने आडवाटेने चालावं लागलं त्याच्या विचारावर या ज्योतिषाने एक प्रकारे अतिक्रमण केलं झालं आता निवडणुकीतील उमेदवार म्हणजे भावी कोणीतरी असतो अशांनी पण या दोन शब्दाच्या आहारी जाणं म्हणजे गावात एक चर्चेचा विषय ठरतो आता बघा गावातले 5-50 जण सतत आपल्या मागेपुढे घरी कायम या कार्यकर्त्यांचा राबता पण खरं सांगू का त्यातले फक्त 2-5 जणचं निष्ठावंत असतात बाकी उगाच आपलं सीजन आहे म्हणून कसंतरी हात धुऊन घ्यायचं असली गत कारण फॉर्म भरायला अख्खा गाव प्रचाराला अख्खा गाव उमेदवार पडला एकटा घरी आला आला दोन दिवसांनी त्यातली दोन चार जणं दीड शहाणी आणि येऊन याचं सांत्वन करतात तसं बघायला गेलं तर निवडणुकीत ही पडल्यामुळे एक प्रकारे दुःखी प्राणी असतो याला येऊन म्हणतात काय आपलं गावच नालायक आहे आता तसं बघायला गेलं तर ही पण गावचच असल्यामुळे ही तर पहिलं नालायक पण काय करता आहे ती बरयं परत त्याला म्हणतात कसं जाऊ द्या आता आपण पंचायत समितीकडे बघू ही मनात म्हणलं मी गावालाच कमी पडलो तर तालुक्याला काय करणार

          पण या फिरत्या ज्योतिषांचं एक सरधोपट समीकरण असतं एकतर रोजचा ह्योच धंदा काम कामाचा गुरु त्यामुळे कोणत्या शब्दावर किती जोर द्यायचा ही ठरलेलं असतं आता बघा दोन पाच बाया आपल्या अंगणात उभ्या असतात त्यातल्या एकीला म्हणणार तू मस दुनियेचं चांगलं करती पण दुनिया तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेती तू कितीबी उपकार कर लोक तुला पाठ दाखवतात मग ती माऊली बिचारी मनातल्या मनात गणितची सुरुवात करती हिशोब करती आपण आमक्या आमक्याला किती जीव लावला तो गद्दार झाला उपकार विसरला झालं इतक्या दिवस तिच्या मनात कधी विचार सुद्धा आला नाही पण यांनी सांगितल्यामुळे मागचा सगळा जुना चित्रपट तिच्या डोळ्यासमोर आला आणि विचाराला चालना मिळाली ह्यांचं कसं असतं सकाळी आंघोळ वगैरे केल्यावर ज्यावेळी जोतिष सांगायची सुरुवात करतो तेव्हा चालताना बोलायची एक ढब असते ती कुणाला जमणार नाही भविष्य सांगणार…ज्योतिष्य सांगणार… तुमच्या मनातलं बोलणार… तुम्हाला माहित नाही ते सांगणार…खोटं वाटलं तर मनात ठेवा…पटलं तर होय म्हणा…तुमच्या डोक्यावर आमक्या आमक्या देवाचा हात आहे…सांगतो तेवढं ऐका…सांगितलेलं कोणाला सांगू नका…

     आता ग्रामपंचायतीचा योग का नशिबाचा भोग सगळं सांगणार…दिली दक्षिणा तर उपाय पण सांगणार…वाट दाखवणार… आणि मग फुकट ऐकशील तर तुझ्या वाईटावर असलेल्यांना तुझ्या घराची वाट दाखवणार… काय ते लगेच सांग असा झटपट निर्णय घ्यायला सांगतात जराशी सुद्धा उसंत घेऊ देत नाही आपल्याला टाईम नाही एवढी तुझी एकच लाडाची ग्रामपंचायत नाही… त्याच्यावर दुसरा पण टपून बसलेला आहे… तुला अजून झेड पी बघायची आहे…आता ह्याच रात्री झोपू नकोस कारण जागशील तर जगशील… नाहीतर या मेन चौकात पाच वर्ष आंदोलन करून मरशील… दादा तुम्ही साधा माणूस हायसा… 12 मुलखातनं आम्ही हिंडतोय तुमच्यासारखा माणूस अजून जिंदगीत पाहिला नाही…

     तुम्ही बी 12 गावचं पाणी पेलेलं तुमची पारख चुकायची नाही लोकं साथ सोडून गेली म्हणून घोर लावून घेऊ नका…तुम्ही वस्ताद आहे…पैलवान घडवण्याचं तुमचं काम आहे…तुम्ही मेहनत घेतली… चार चांगले डाव शिकवले…गावच्या जत्रत कुस्तीमध्ये उतरून जितायला बी लावलं… त्यास्नी वाटायला लागलं आपण पण लई ताकतीचं हाय…वस्ताद आपल्याला मोठा पहिलवान बनून देत नाही…म्हणून गेली दुसऱ्याच्या तालमीत…आणि ह्यालाच म्हणतात राजकारण आता तुम्हीच शिकवलेल्या डावानी तुमच्याशीच कुस्ती खेळायची म्हणतात… पण त्यासनी कुठं माहितीयं वस्ताद हा वस्तादच असतो… सगळ्यांना पुरून उरतोय…सगळे डाव तो कधी सांगत नसतो… एखादा डाव राखून ठेवलेला असतो…

     त्याचं काय झालं एक असाच तालमीतला पैलवान जरा उतमात करीत होता त्याच्या पैलवानकीचा त्याला गर्व झाला होता छोट्या मोठ्या कुस्त्या करत त्यांनी एक दिवशी मोठ्या पातळीवरील नामांकित कुस्ती जिंकली अजून ह्याचा गर्व चढला गावांनी सत्कार ठेवला यांनी भाषण काय केलं आता स्टेजवर येताना पण नुसत्या मांड्याच वाजवायचं एखाद दुसरी बैठक पण मारायचं भाषण केलं गावाची तर जिरवली… कारण आता त्याला गर्वच तेवढा झाला होता आता वस्तादाकडं एकदा बघायचं म्हणजे झालं आणि काय सांगू वस्तादाचं वय 70 च्या आसपास ती म्हटलं वस्तादाबरोबर एकदा खेळायचं…ठरलं वस्तादानी ओळखलं आज आपल्या दोन-चार बरगड्या तरी क्रॅक होणार पण ठरल्याप्रमाणे कुस्ती सुरू झाली वस्ताद पण मैदानात उतरलं आता ह्यांनी काय केलं बळं होऊन त्या वस्तादाला कवळी मारली वस्तादाने क्षणात डोळ्याची पापणी लवूस्तवर असं काय उचलून आपटलं तोंडात माती गेली आणि पाठ जमिनीला लागली माती झटकत उठलं आणि वस्तादाला म्हणतंय तुझ्यासारखा नालायक वस्ताद मी कुठं पाहिला नाही तू ह्यो डाव मला का नाही शिकवला वस्ताद म्हणाला तुला एक दिवस गर्व होणार त्यो उतरायला मी ह्यो डाव राखून ठेवला होता तर एखाद्या ठिकाणी सुखवस्तू कुटुंब व वातावरण दिसल्यावर काय व कसं बोलायचं या सर्व प्रकारचं ज्ञान यांना असतयं आता बघा माणूस व बाई दोघघं नवरा-बायको बांधकामावर जात्यात दिवे लागनीला घरी येतात सहाजिकच त्यांचे हातपाय काँक्रीटने पांढरे झालेले असतात तर ह्यो सहज आपलं म्हणून जातो तुम्ही मेहनत लय करता पण पैशाला पैसा लागत नाही घरातलं तुमच्यावर कोणीतरी जळतंय आता गवंडी काम करणारे मजूर यांना काय महिन्याला पाच-पन्नास हजार रुपये पगार मिळणार आहे का आपलं तुटपुंज्या मजुरीत घर चालवायचं असतयं असा त्यांचा एकंदर ताळमेळ व अंदाज असतो त्या पद्धतीने त्यांची बोलीभाषा असते व ते शब्द फेक करून समोरच्याला भुरळ पाडतात व मग भावनेच्या आहारी जाऊन माणूस ते मागतील तेवढी दक्षिणा त्यांना देतात आणि मग नंतर विस्तृत खुलासा झाल्यावर पश्चाताप करत बसतात यालाच म्हणतात कळतंय पण वळत नाही कारण ती एक शब्द फेक असती कारण लेखकाला शब्द गुंफायला जमतात कवीला यमक जुळवायला जमतं व्याख्यान करणाऱ्या व्याख्यात्या जवळ श्रोत्यांना खिळवून ठेवायची ताकद त्यांच्या वाणीमध्ये असती तसंच एखादी शब्द फेक करण्याचे क्षेत्र असेल तर त्यातील ते दर्दी असतात

*************************************

किरण बेंद्रे

पुणे

7218439002

litsbros

Comment here