आम्ही साहित्यिक

🌹🌹 गोड साखरेची कडू कहाणी 🌹🌹

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🌹🌹 गोड साखरेची कडू कहाणी 🌹🌹

           काही वेळा प्रश्न मनात असा उभा राहतो तो म्हणजे दिसतं तसं नसतं साधं उदाहरण घेऊ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये साखर हा अविभाज्य घटक आहे तसं पाहायला गेलं तर सकाळी उठल्यावर नुसती चूळ भरून अंथरुणातच बेडवर बसून चहा घेण्यात एक वेगळी मजा आहे त्याला आपण बेड टी म्हणतो हे एक ऐष आरामाचं लक्षण समजलं जातं तर बहुतेक सणाला पुरणपोळी ही ठरलेली असते घरच्या कुलदेवतेला पुरणपोळीचा महानैवैद्य दाखवला जातो वेळप्रसंगी बासुंदी… खिर… श्रीखंड…असे आलटून पालटून पदार्थ बनवून सणाचे वैविध्य साधले जाते तर महत्त्वाचा विचार केला तर साखर जरी चवीला गोड असली तरी त्याची पार्श्वभूमी किंवा त्या मागचा इतिहास विचारात घेतला तर * गोड साखरेची कडू कहाणी * प्रत्येकाला माहिती होईल

           तर साखरेसाठी प्रमुख घटक म्हणजे ऊस उत्पादन क्षेत्र म्हणजे बागायती आली ऊसाच्या लागवडीसाठी सुरुवातीपासून पिक काढण्यापर्यंत ह्या जगाच्या पोशिंद्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो म्हणजे मशागत… पाणी देणं… खतं…औषध फवारणी एवढं झाल्यावर ऊस काढण्यासाठी 17 अडचणी एक तर ऊस तोडणी मजूर वेळेवर मिळत नाही आणि मिळाले तर वाहतूक व्यवस्थेचा लवकर मेळ लागत नाही आणि एवढं करून पण दैवावर हवाला म्हटल्याप्रमाणे स्वतःचे पिक असून पण ऊस आपला अन भाव ठरवणार कारखाना… आता तरी चार आठ ओळीत सांगितलं तरी यांचा सगळा खेळ चार सहा महिन्यांचा असतो आणि मी तर म्हणेन की शेतकऱ्यापेक्षा जास्त यातना या ऊसतोड मजुराला भोगाव्या लागतात कित्येक प्रतिकूल परिस्थितीतून त्यांना जावं लागतं काही दिवसापूर्वी बघा साखर उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्र मध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर होता .

           महाराष्ट्रामध्ये एकंदर 173 सहकारी व 23 खाजगी साखर कारखाने आहेत त्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक म्हणजे 96 साखर कारखाने आहेत एकंदर ऊसतोड मजुरांची संख्या नऊ ते दहा लाख असून तो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वर्षातील जवळपास चार ते सहा महिने साखर कारखाना परिसरामध्ये वास्तव्यास येतो आणि अस्थिर व स्थलांतरीतांचे जीवन जगत असतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या ऊसतोड मुजरांची तसं बघायला गेलं तर खूप फरपट झाली त्या काळामध्ये आपल्या कुटुंबासोबत घरी सुरक्षित राहत असलेल्यांना साखर गोड लागत असली तरी साखर निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण घटक असलेला ऊस तोडणी मजूर आपल्या घरापासून दूर होता अनेक कारखाने त्यावेळी सुरू असल्याने हे मजूर ऊस तोडणीचे काम करीत होते त्यांच्या अन्नधान्याची गरज व सुरक्षिततेची काळजी कारखानदार किंवा ऊसतोड उत्पादक शेतकरी घेत नाहीत 

           रोजगारासाठी पर्याय उपलब्ध नसल्याने बहुतेक जण या व्यवसायात येतात पुरुषांसोबत महिलाही या व्यवसायात भरपूर प्रमाणात आहेत तसं पाहिलं तर राज्यातील 16 जिल्ह्यातील 52 तालुके ऊसतोड मजुरांचा पुरवठा करतात या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थलांतर साधारण कारखाना परिसरात सहा महिन्याचं स्थलांतर समजायचं आणि या व्यवसायामध्ये बीड व अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश कामगार आहेत आपल्या नवऱ्याबरोबर महिलाही कोयता घेऊन फडात ऊस तोडणी साठी जातात आणि इथं पण आपल्याला जरा याचा विचार केला तर मजुरांना काम मिळून कामाचा मोबदला मिळेपर्यंत या कोयत्याच्या व्यथा संपत नाहीत खरा विचार केला तर जगभरात गोड साखर खाऊ घालण्यात मोठा वाटा असणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या नशिबी कायम कडू आठवणींचे आयुष्य वाट्याला आलेले असते राब राब राबूनही योग्य मजुरी नाही राहण्याचं कायमस्वरूपी ठिकाण नाही ना शिक्षण… ना आरोग्याची सोय…ना कुठल्या शासकीय योजनांचा आधार

           हाती कोयता घेतलेल्या तीन-तीन पिढ्यांच्या नशिबी ह्याचं मूलभूत सुविधांचा विचार केला तर शिक्षणापासून व आरोग्य सुविधा पासून कायम दूर आता या अर्ध्या कोयत्याची परवड अशी आहे की ऊस तोडणी साठी सहा महिने उघड्यावर राहणाऱ्या ऊसतोड मजुरांना त्यांच्या तोडणीचा मोबदला कोयत्याच्या हिशोबात मिळतो ही कोयता म्हणजे पती-पत्नीची जोडी तर अर्धा कोयता म्हणजे लग्न न झालेले तरुण या ऊस तोडणीच्या व्यवहारामध्ये महिला या अर्ध्या कोयत्याच्या धनी असतात देशातील 36% साखर कारखाने एकट्या महाराष्ट्रात ही एक कौतुकाची बाब म्हणावी लागेल त्यात राज्यातील बहुतेक नेत्यांचे राजकारण उसाच्या मळीवर पोसलेलं त्यात बीड जिल्हा म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा संपूर्ण राज्यच नाही तर सीमेलगतच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा आजही राज्यातील 85% ऊसतोड महिलांना कोरड्या शेतीमुळे ऊस तोडणीसाठी कोयता हाती घ्यावा लागतो दररोज सरासरी 15 तास काम करावं लागतं कामाच्या ठिकाणी ना रेशन मिळते… ना दवाखाना ऊसतोड कामगारांच्या राहुट्यावरील उघड्यावर पडलेले संसार लपलेले कधीच नव्हते

           उसाच्या गाड्यावर पाठपोट एक झालेल्या महिला व पुरुष…पाचाटात खेळणारी कच्ची बच्ची…अनेकांनी पाहिलेली आहेत 84% कुटुंब टोळीने ऊसतोड करणारी मंडळी काही वेळा काही ठिकाणी ऊस तोडणी चालू असताना अवकाळी पाऊस सुरू झाला तर जनजीवन विस्कळीत होते दरम्यान संततधार पाऊस सुरू असतो त्यामुळे ऊसतोड कामगारांचे राहण्याच्या दृष्टिकोनातून खूप हाल होतात त्याचबरोबर ऊसतोड होत नसल्यामुळे मजुरी सुद्धा मिळणार नाही या चिंतेने ते सदैव ग्रासलेले असतात खरंतर यांचा दिवस पहाटे तीन वाजताच सुरू होतो राहुटी लगतच्या परिसरामध्ये फडामध्ये जाण्याची एक वेगळीच लगबग सुरू असते आणि नंतर आंघोळी…भाकर कुटका…सगळं आवरून ही मंडळी सकाळी सात वाजता फडावर हजर असतात 

           आपली लहान बालकं त्यांच्या अंगावर धड कपडे नाहीत अशी बालकं थंडीने गारठतात त्यांना अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे नसतात त्याच बरोबर स्वयंपाकासाठी लागणारे लाकूडही ओलं असल्यामुळे जळण्यासाठीही लाकूड उपलब्ध होत नाही त्यामुळे कधी कधी त्यांच्यासमोर खाण्यापिण्याचाही प्रश्न उभा राहतो आणि काही बहाद्दर मंडळी अशा मध्येच त्यांचे फोटो व व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न असतात यालाच म्हणावं लागेल * गोड साखरेची कडू कहाणी * या माध्यमातून गोड साखरेची चव देणाऱ्यांची ही कडू कहाणी पहायला मिळते

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

किरण बेंद्रे

पुणे

7218439002

litsbros

Comment here