आम्ही साहित्यिक

🌹🌹🌹 गोधडी पुराण 🌹🌹🌹

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🌹🌹🌹 गोधडी पुराण 🌹🌹🌹

            ****************************

     कोणत्याही गोष्टीचा म्हणाल तर जरा थोडा सखोल विचार करायला गेल्यावर त्याबद्दलची थोडी जाणीव आपल्याला आपोआपचं होते पहिलं बघा आपल्या प्रत्येक खेडे गावामध्ये एकदा पित्तरपाठ झाला की गोधड्या इतर अंथुरणं पांघुरणं धुण्याचा कार्यक्रम असतो आता जरा थोडसं दूर म्हणजे फर्लांगभर उंचीवरून जर बघितलं तर हा एक सोहळाच वाटतो एखाद्या चित्रकारांनी मुक्त हस्ते केलेली रंगांची उधळण आणि त्यातून साकारलेली कलाकृती दिसते कारण यातून आपल्याला कितीतरी चित्रांची प्रतिकृती दिसते घडीत मोर, घडीत शेतातील निसर्ग चित्र, घडीत डोंगर, इत्यादी पण दिसतं आपण एक प्रकारे त्या विश्वामध्ये हरवून जातो.

    जरा मराठीतील अशा अनेक कवितांमध्ये किंवा एखादी वेळी कादंबरीमध्ये सुद्धा या गोधडीला अनन्य साधारण स्थान आहे गोधडी म्हणजे कौटुंबिक कष्टाचं आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असतं ती केवळ मामुली चादर नसते तर त्यामध्ये माया ममतेला ऊब देण्याची ताकत असते प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया असते गोधडीच्या आत लपेटून शिवलेलं कापड म्हणजे गोधडी वरचं अस्तर वडिलांच्या फाटलेल्या धोतराच्या किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचं असतं त्यामुळे गोधडीवर जणू आई-बाबांची माया लपेटलेली असते

     आणि गोधडी च्या आत मध्ये आईने दुमटून दाटीवाटीने बसवलेल्या अनेक चिंध्या असतात त्या वरवर पाहता चिंध्या असतील पण मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेला जुना जीर्ण सदरा असतो आईने माहेराहून आणलेल्या आपल्या लुगड्याचा एक तुकडा असतो आणि पहिल्या मकर संक्रांतीच्या सणाला बाबांनी आईला प्रेमाने घेतलेल्या साडीचा एक लाडक्या लुगड्याचं अंथरूण असं असंख्य ढिगळांचे लावलेले तुकडे असतात असे अनेक भावनांचे पदर असलेली गोधडी म्हणजे आता पारंपारिक वस्त्र न राहता त्यांनाही चांगले दिवस आलेले आहेत गोधडी बद्दलचे कुतूहल जागृत झाले आहेत याच कुतुहलाची पूर्तता करण्यासाठी कित्येक ठिकाणी गोधडी शिकवण्याचे वर्ग सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत गोधडी बनवणे ही जुनी कला आहे आपल्या आजी आजोबांच्या काळात त्याला खूप महत्त्व होतं आता जसं व्हाट्सअप ग्रुप असतं व्हिडिओ कॉल करता करता कामं केली जातात अगदी त्याच पद्धतीने पूर्वीच्या स्त्रिया दुपारी किंवा संध्याकाळी एकत्र बसून गप्पा मारत गोधड्या शिवत असायच्या

     गोधडी शिवताना खूप जास्त संयम व चिकाटी असावी लागते तसेच एखादी साधना करता करता सुद्धा हे काम करता येते म्हणजे एखादी पोथी, गाणं किंवा ओवी अगदी तोंडपाठ असलेला हरिपाठ सुद्धा म्हणता येतो म्हणजेच मेडिटेशन ही होतं गोधड्या धुणं हा गावाकडे एक सोहळा असतो घरातल्या सगळ्या बाया पोर पहिलं दुपारचं जेवण तयार करून ते व्यवस्थित बांधून धुण्याबरोबर नदीवर नेतात जाताना चक्क बैलगाडीतून या गोधड्या घेऊन जाव्या लागतात इतक्या असतात म्हणजे कुटुंबात साधारण दहा-पंधरा माणसं तरी नक्कीच असणार तर या गोधड्यांनी भरलेली बैलगाडी साधारण दहा वाजण्याच्या सुमारास नदीवर पोहोचते म्हणजे वाळलेल्या नदीपात्रात शिरते अगदी पाणी जिथून वाहत असेल तिथे जवळच जिथे मोठे दगड असतील अशा आयडियल ठिकाणी थांबते मग गोधड्या उतरायच्या निरमा पावडरचे डबे खाली घ्यायचे आणि मग पोरं पाण्यात खेळतात आणि बाया गोधड्या धुतात पण मी लहान असल्यापासून अजून पर्यंत न बदललेली एक सिस्टीम म्हणजे गोधडी दगडावर आपटायची झाली की सगळे जमायचे सगळ्यांनी मिळून गोधडी उचलून आणि धपा धप आपटायची या मोठ्या दगडावर जेव्हा जे काही पाणी उडतं ना ते असं गुदगुल्या करणारं असतं गोधड्या पिळायची पाळी आली की पोरं पळ काढायची आणि हे झाल्यावर भूक सटकून लागलेली असती तिथेच पुलाचा आडोसा बघून पंगत बसायची

     कसली आलीया ताट, वाटी, तांब्या हातावरच भाकरी घ्यायची आणि खायची मध्यंतरी गावाला गेलो तवा तीन दिवस भटकत असताना कृष्णेच्या खोऱ्यामध्ये एक काळी पिवळी जीप भरून आणलेल्या गोधड्या धूताना एक फॅमिली दिसली आणि पोमलवाडीच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या गोधडी आणण्याची स्टाईल वर्षानुवर्ष बदलत असली तरी उत्साह टिकून आहे हे महत्त्वाचं माझ्या पाहण्यात आलेलं गोधडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे गोधडी हा विषय जरी साधारण असला तरी बाजारात विकत घेतलेल्या गोधड्या आणि श्रद्धा वानांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या गोधड्या यामधील महत्त्वाचा फरक म्हणजे या कुठल्याही अपेक्षेशिवाय व सद्गुरु वरील निरपेक्ष प्रेमापोटी बनवलेल्या असतात त्यामुळे या सेवेला भक्तीची पण जोड मिळते तसेच गोधडी तयार करण्याचेही समाधान मिळते माझ्या शेजारची एक वृद्ध आजीबाई दर टाक्यागणित श्री स्वामी समर्थांचा जप केल्यावानी करते त्यामुळे ती सदैव उत्साही राहते

      गोधडी शिवताना घालण्यात येणारे टाके मुद्दामहून अतिशय बारीक घातले जातात त्यामुळे लहान बाळाच्या कानातली रिंग किंवा पायातले वाळे त्यात अडकत नाहीत तसेच गोधड्या वजनाने इतक्या हलक्या असतात की गरोदर स्त्रियांना सुद्धा या गोधड्या धुवून वाळत घालता येतात तसेच गोधड्यांमध्ये चारही बाजू पद्धतशीरपणे बंद केल्या जातात त्यामुळे खेड्या पाड्यात, वाड्या वस्तीवर, राना वानामध्ये राहणाऱ्या लोकांना गोधडीच्या आतील पदराच्या भागांमध्ये किटक, गांडूळ, किंवा सापाचे पिल्लू शिरण्याची भीती नसते तर गोधडी म्हणजे कपड्याचे तुकडे जोडणं असं नव्हे तर लोकांची मतं जोडण्याचे एक पवित्र कार्य म्हणावं लागेल तसंच गोधडी बरोबर लेफ्टी, वाकळ हे टोपण नाव पण अस्तित्वात आहेत एक साधारण कपडा किंवा कपड्याचे तुकडे इथपासून या गोधडी बनण्याचा प्रवास तसं बघायला गेलं तर खूपच खडतर म्हणावा लागेल तर गोधडी म्हणजे नसतो नुसत्या चिन्हांचा बोचका तर ती असते एक उब, गोधडीही आपल्याला या जगामध्ये आल्यानंतर आपल्या देहाला लपेटून टाकत असते

     दुपटे हे गोधडीचे नाजूक अधिक मऊ व छोटे खाणी रूप आहे दुपट्यातून आपण गोधडी मध्ये कधी येतो हे आपल्याला पण कळत नाही आणि कधी ठामपणे आठवत पण नाही गोधडी अगदी अर्भकावस्थेतून बाल्याअवस्थेत येताना आपल्याला एक घट्ट संरक्षण देत असते आपल्या प्रत्येकाच्या मनात गोधडीच्या ज्या काही स्मरण खुणा असतात त्या गोधडीचे रंग गोधडीची ती लांबी रुंदी आणि तिची जाडी हे सारं रूतून बसलेलं असतं गोधडी म्हणजे वात्सल्य, प्रेम, ममत्व, टाक्यांचा स्पर्श एक हळुवार स्वर व हळुवार थोपटणं तसंच गोधडी म्हणजे मायेचा स्पर्श देहाचे मुटकुळे करून झोपणं ती एक हक्काची उब लडिवाळपणा मनाने मनाला मनापासून बोलायचं उबदार पांघरून गोधडी म्हणजे अनंत चिंध्यांचं एकत्र येणे

     गोधडी म्हणजे अनंत रंगीबेरंगी तुकड्यांचं संमेलन आणि उभ्या आडव्या धाग्यांचं एक सुंदर जोडकाम आणि साऱ्या रंगाचं अस्तित्व तरीही त्यात असलेला त्याचा स्वतंत्रपणा आणि मऊ व खरबरीतपणाचा स्पर्श आणि बालपणाचे हजारो क्षण आणि भावंडांशी निरागसपणे केलेली मस्ती आणि हसू व असू तसंच डोक्यावर पूर्ण ओढून घेऊन खुसखुसू हसत राहणं आणि गोधडी म्हणजे धपाट्या पासून इवलसं संरक्षण म्हणजे आईने गोधडी वरून मारलेला फटका एवढा जोरात लागत नाही आणि एका वयापर्यंत हक्काचं पांघरून आपल्या अनेक उबदार आठवणींना जपणारा उबदार पदर आपल्या मौनाचं शब्द भांडार आणि आपल्या शब्दांचं एक मौन तसंच गोधडी म्हणजे जीव घेणे ठरलेले अपमान आणि जाणून बुजून केलेल्या अवहेलना याची एक घडी मनाने केलेली आणि मनामध्येच ठेवलेली

     आणि गोधडी म्हणजे एक सुखाचं वृंदावन जणू जपलेल्या आपल्या मनाच्या पांघरूणी कप्प्यात गोधडी म्हणजे पूर्वजांची एक खूण वंशजासाठी अभिमानाची खात्री आणि जगण्याच्या व्यवहारातली चंदन सावली आणि आपल्या माणसांची हळुवार आठवण आपल्याला छळणाऱ्या क्षणांचे धागेदार स्मरण एक विलक्षण गारवा आणि हिवाळ्यात व पावसाळ्यात पण मलईदार उब आणि ऐन उन्हाळ्यामध्ये घाम टिपणाऱ्या टीप कागदाची थोरली बहीणचं जणू

****************🌹🌹🌹****************

किरण बेंद्रे

पृथ्वी हाईट्स… कमल कॉलनी… पुणे

7218439002

litsbros

Comment here