महाराष्ट्रातील ‘या’ माजी खासदाराला सुनावला चार वर्षांचा तुरुंगवास
माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा व त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना सीबीआयच्या दिल्ली विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात दिल्ली विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
छत्तीसगडमधील कोळसा घोटाळा प्रकरणात अनेक मोठ्या नावांचा समावेश होता. या घोटाळ्यात राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्यांसह आयएएस अधिकारी देखील राजपूर तुरुंगात बंद आहेत. याच्यामध्ये आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव सौम्या चौरसिया, कोळसा घोटाळ्यात सिंडीकेटची भूमिका बजावणारा सूर्यकांत तिवारी, सुनीर अग्रवाल यांचाही समावेश आहे.
मागील काही दिवसांपूर्वी या प्रकरणात माजी खासदार आणि ‘लोकमत’ माध्यम समूहाचे विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एचसी गुप्ता, केएस क्रोफा आणि के सी सामरिया या दोन अधिकाऱ्यांसह जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक मनोज कुमार जयस्वाल या सर्वांना न्यायालयाने दोषी ठरवले होते.
सीबीआयने 27 मार्च 2013 रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात या सर्वजणांनी गैरमार्गाने कोळसा खाणी आपल्या ताब्यात घेतल्या, असा आरोप केला होता. 20 नोव्हेंबर 2014 रोजी सीबीआयचा या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार देत या प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यावेळी न्यायालयाने दर्डा यांनी पंतप्रधान मनमोहनसिंह यांना लिहिलेल्या पत्रात चुकीच्या पद्धतीने तथ्यांना सादर केल्याचाही ठपका ठेवला होता.
काही दिवसांपूर्वी कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणांमध्ये विशेष न्यायालयाने काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डांसह सर्व आरोपींना दोषी ठरवले होते. या आरोपींच्या शिक्षेवरील सुनावणी होणार होती. आयपीसी कलम 120बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली न्यायालयाने या सर्वांवर छत्तीसगडमधल्या फतेपुर खाणीचं कंत्राट जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्धतीने मिळवल्याचा ठपका ठेवला होता.
Add Comment