वर्गणीचा हिशोब मागितला म्हणून मारहाण प्रकरण; कुंभारगाव येथील त्या आरोपींचा जामीन नामंजूर
करमाळा(प्रतिनिधी) – तालुक्यातील कुंभारगाव येथे गावातील मंदिराच्या वर्गणीचा हिशोब मागितला म्हणून १२ जुलै रोजी बाळू विलास गलांडे यास मच्छिंद्र शंकर पानसरे, जालिंदर विठ्ठल पानसरे, दशरथ महादेव पानसरे आणि बाबा दत्तात्रय पानसरे यांनी लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने, दगडाने, काठीने आणि चाकूने मारहाण केली होती.
याबाबत करमाळा पोलिसांत बाळू गलांडेच्या फिर्यादीवरून या चौघांविरुद्ध गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
करमाळा पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींपैकी आरोपी नं. १, ३ व ४ यांना दि. १७ जुलै रोजी अटक केली होती. आरोपी नं. २ जालिंदर विठ्ठल पानसरे ( माजी उपसभापती, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती ) अद्याप फरार असून करमाळा पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.
अटक आरोपींना करमाळा न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
यानंतर सदर आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर मूळ फिर्यादीचे वकील ॲड. अलीम पठाण यांनी हरकत घेऊन या आरोपींना जामीन देण्यास प्रखर विरोध केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश आर. ए. शिवरात्री यांनी या आरोपींचा जामीन नामंजूर केला आहे.
Comment here