ब्रेकिंग; सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनावर बाजार बंद करण्याचा निर्णय ; जनावरे वाहतूकही बंद
सोलापूर : राज्यामध्ये जनावरांचा लंपी आजार पुन्हा डोके वर काढल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनावर बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच जनावरांच्या एकत्रित वाहतूक करण्यावरही बंदी घालण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मंगळवारी लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात पशुसंवर्धन विभागाची बैठक घेण्यात आली.
त्या बैठकीला पशुसंवर्धन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपायुक्त डॉक्टर समीर बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे यांच्यासह अकरा तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर सीईओ आव्हाळे यांनी माहिती दिली.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस सांगोला मंगळवेढा पंढरपूर या भागामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्याचा मृत्यू दरही जास्त असल्याने या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व जनावरे बाजार बंद करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
तसेच जनावरांची एकत्रित वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या गोठ्याची स्वच्छता ठेवावी, आवश्यक त्या औषधाच्या फवारण्या कराव्या असे आवाहन त्यांनी केले.
Comment here