जयंती विशेष – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे: बंडखोरी आणि परिवर्तनाची बीजं पेरणारा महान साहित्यिक
जो कलावंत जनतेची कदर करतो त्याची जनता कदर करते हे मी प्रथम शिकून लेखन करीत असतो.
माझा माझ्या देशावर जनतेवर आणि जनतेच्या संघर्ष वर आढळ विश्वास आहे. हा देश सुखी व्हावा इथे समानता नांदावे महाराष्ट्र भूमीचे नंदन व्हावी अशी स्वप्ने रोज मला पडत असतात आणि ती स्वप्ने पाहतच मी लिहित असतो. केवळ कल्पकतेने कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नाही तर ते सत्य मिळवावे लागते.
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या श्रमकर्यांच्या कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे हे विचार दुसऱ्या इयत्तेत शाळा सोडलेल्या माणसाने लिहिले असतील हे कोणाला खरे वाटेल? परंतु हे विचार खरोखर दुसऱ्या इयत्तेत शाळा सोडलेल्या माणसांनी दिले आहेत त्या माणसाचं नाव म्हणजे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.सांगली जिल्ह्यात वाटेगावच्या रखरखीत माळरानावर जिथे गवताची काडीही उगवत नाही अशा ओसाडमाळ रानावर गावकुसाच्या बाहेर जिथे दारिद्र्य आणि उपेक्षा कायम ज्यांच्या वाटेला आली अशा मातंग समाजात एक ऑगस्ट 1920 रोजी एक मूल जन्माला आले त्याच्या त्या हाताच्या बंद मुठीत जणू उपेक्षित्यांच्या दाराचं भविष्य जन्मलं होतं असंच म्हणावं लागेल. कारण ते सृजनशील मुल पुढे जाऊन जग विख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले.
अण्णाभाऊचे जीवन म्हणजे नियती आणि निसर्गाची प्रतिकृती.अक्षर ओळख नसणारा निरक्षर मुलाने ,दारिद्र्य कोवळ्या वयात सोसले, उपेक्षेचे चटके सहन केले. वेठबिगार गिरणी कामगारांची पिळवणूक काळजात साठवली,स्त्री दलित शोषित आणि पीडित यांच नाकारलेले जगणं गावच्या बाहेर हाकलून दिलेल्याचं लाजिरवाण जीनं अनुभवतआणि त्यातून वसा घेतला मानव मुक्तीच्या लढ्याचा. कारण त्यांना माहीत होतं चळवळीची बीजं प्रभावीपणे रुजवण्याचं साहित्य हे प्रभावी शस्त्र आहे तेच शस्त्र अण्णाभाऊंनी उचललं.हे दुधारी शस्त्र उपेक्षितांना न्याय देणार आणि समाजकंटकांना नागवणारं होतं.
1935 साली अण्णाभाऊ साठे अंदाजे 25 वर्षाचे होते ते कामगार चळवळीच्या आंदोलनाने प्रभावित झाले होते. त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले सामाजिक समतेचे आंदोलन लढत होते. आंदोलन अण्णाभाऊ साठे जवळून पाहत होते. आणि त्याचे हेच पडसाद अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून प्रगट झाल्याचे दिसून येते.अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातच होत्या.
अण्णाभाऊ साठेंनी जे जे अन्याय अत्याचाराखाली दबले आहेत त्यांच्या व्यथा आपल्या साहित्यातून जगासमोर मांडल्या. बहुजन समाजातील शेतकरी कष्टकरी शेतात राबतो कष्ट करतो,मरमर मरतो देशाला अन्नधान्य पुरवतो, स्वतः मात्र भाकरीच्या तुकड्याविना उपाशी राहतो.मोठ्या मोठ्या इमारती बांधणारा मजूर मात्र छताविना उघड्यावर पडलेला दिसतो.कापड गिरणीमध्ये काम करणारा कामगार कापड तयार करतो स्वतः मात्र त्याला कपड्याविना नागवच रहाव लागतं हे वास्तव अण्णाभाऊ साठे यांनी जगासमोर आणले.
अशा वास्तव आणि चौफेर लिखाणामुळे अण्णाभाऊंचे साहित्य फ्रेंच आणि रशिया या देशासहित 27 देशांमध्ये भाषांतरीत झाले. त्यांनी मराठी साहित्यातील, बेचव अळणी नी रंजनात्मक लेखनाला मोठा हादरा दिला.
अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाची शोकांतिका अशी की त्यांनी एवढं चौफेर साहित्य लिहून सुद्धा एकाही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची कधी निवड झाली नाही किंवा त्यांच्या नावाचा साधा उल्लेखही संमेलनामध्ये कधी केला गेला नाही. फडतूस आणि फुटकळ लिहिणाऱ्या साहित्यिकांना मात्र साहित्य सम्राटा सारख्या अनेक पदव्या दिल्या गेल्या पण या साहित्यातील हे खरे रत्न मात्र दुर्लक्षित गेले. एखादं दुसरं पांचट बेचव पुस्तक लिहून काच्छपी प्रवृत्तीच्या साहित्यिकांनी लांगुलचालन करून शासनाच्या 10% कोट्यातून घरं घेतली पण अण्णाभाऊ साठे मात्र शेवटपर्यंत आपल्या झोपडीतच राहिले.
वाटेगाव सारख्या लहान गावातून अण्णाभाऊ आपले वडिलांसोबत मुंबईला पाय गेले, मुंबईत हमाली,सिनेमाची जाहिरात करणारी गाडी ओढनं हे करत असतानाच दीड दिवसाच्या शाळेला गेलेले अण्णाभाऊ साठे स्वतःच्या अनुभवाच्या शाळेत शिक्षित होतात एवढंच नाहीतर आभाळाएवढं साहित्य निर्माण करतात त्यांच्या साहित्याचा डोंगर पाहून येथील प्रस्थापित साहित्यिकही तोंडात बोट घालतात. हे शक्य आहे?? यावर त्यांचा विश्वास बसत नाही.अण्णाभाऊ साठे यांच्या वैजयंता या कादंबरीवर आधारित वैजयंता हा चित्रपट 1960 साली, नंतर त्यांच्या आवडी या कादंबरीवर टिळा लाविते मी रक्ताचा चित्रपट, तसेच डोंगरची मैना, मुरली मल्हारी रायाची,वारणेचा वाघ, साताऱ्याची तऱ्हा फकीरा ह्या सात कादंबऱ्या वर चित्रपट निघाले. फकीरा या चित्रपटात तर स्वतः अण्णाभाऊ साठे यांनी स्वतः भूमिका केली आहे. या कादंबरीस महाराष्ट्र राज्य सरकारचे सर्वोत्कृष्ट कादंबरीचे पहिले पारितोषिक मिळाले.त्यांची हीच कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली.
देशभक्त घोटाळे या राजकीय लोकनाट्य मध्ये अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकरांवर कवन लिहिताना म्हणतात की,
जग बदल घालुनी घाव
सांगून गेले मज भीमराव.
गुलामगिरीच्या चिखलात,
रुतून बसला का ऐरावत!
अंग झाडून निघ बाहेर,
घे बिनी वरती धाव.
सांगून गेले मज भीमराव.
त्यामुळे असे म्हणणे वावगे ठरणार नाही की जर अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांसोबत असते तर आज मातंग समाजाचे चित्र काही वेगळे असते.
तसेच अण्णाभाऊ साठेही लोकशाहीर, समाज सुधारक,साहित्यिक,तत्त्वचिंतक आणि उद्धारक म्हणून पुढे आलेले दिसले असते.
येथील व्यवस्थेने अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान केला नाहीच पण तदनंतर अण्णाभाऊ साठे यांचे कर्तुत्व त्यांच्या वारसदारांनाही स्थैर्य देऊ शकले नाही. सरकारची आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकारी कार्यालयात त्यांना चकरा माराव्या लागल्या ते आयुष्यभर कफल्लक राहिले, औषधोपचाराभावी त्यांचा मृत्यू झाला.
सामाजिक चळवळीतील लोकांनी लोकवर्गणीतून अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीबाई साठे आणि त्यांच्या नातवंडासाठी वाटेगाव जि. सांगली येथे दोन मजली पक्के घर बांधून दिले. 16 मे 2003 रोजी बुद्ध जयंती दिवशी या वास्तूचे हस्तांतरण श्रीमती सावित्रीबाई साठे यांच्याकडे करण्यात आले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. रात्र दिवस चौफेर पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरले.
तत्कालीन काँग्रेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी अण्णाभाऊ साठे यांना या चळवळीत असताना अमरावतीच्या तुरुंगात डांबले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता पण त्याची नोंद मात्र फारशी घेतली गेली नाही त्यांनीही कधी अपेक्षा केली नाही.
आणि जी उपेक्षा झाली त्याची कधी पर्वाही केली नाही. 1949 ला जागतिक शांतता परिषदेचे निमंत्रण आलेले असताना पासपोर्टसाठी गरज असलेल्या पैशाची कमतरता यामुळे तेथे जाण्यास त्यांना अडचण निर्माण झाली होती. सन 1961 मध्ये अण्णाभाऊ साठे यांना इंडोनेशियातील कल्चर सोसायटीतर्फे रशियाला पाठवण्याचे ठरले त्यावेळेस सुद्धा दारिद्र्याने त्यांचे पाठ सोडली नाही. मात्र जनतेने पैशाचा पाऊस पडला आणि अण्णाभाऊ साठे रशियाला गेले.
अण्णाभाऊ रशियन प्रवास आटपून जीवनाचे एक महत्त्वाचे पर्व संपून मायदेशी परतले. रशियाच्या जीवनशैलीने अण्णाभाऊ साठे पुरते भारावून गेले. समाजवादी शैलीने त्यांच्या मनाची घट्ट पकड घेतली. याच अनुभवावर त्यांचे माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णनही प्रकाशित झाले.
वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य पर्यंत पोहोचवणारा महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन ग्रामीण भागातील रांगड्या तमाशाला लोकनाट्य हे बिरुद त्यांनी दिले .
वैयक्तिक दुःखाचा विचार न करता आपले विचार कार्य व प्रतिभा यांच्या साह्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे साहित्यिक अण्णाभाऊ होते.
अकलेची गोष्ट,शेटजीचे इलेक्शन,बेकायदेशीर,माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची, मूक मिरवणूक,लोकमंत्र्याचा दौरा, खापऱ्या चोर,बिलंदर, बडवे यासारखी वगनाट्य अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी दिली. त्यातील
गरुडाला पंख,वाघाला नख
तशी ही मुंबई मराठी मुलखाला
हे कवण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत विलक्षण गाजले.
माझी मैना ही छक्कड म्हणजे अण्णाभाऊच्या कलात्मकतेचा अविष्कार आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये दीनदलीत पिचलेल्या, नायक नायकाचा संघर्ष आणि बंडखोरी आणि त्यातून झालेल्या उद्रेक दिसून येतो.
फकीरामध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने लुटून गरिबांना वाटप करणाऱ्या फकीरा या मांग जातीतील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे.
तर वैजयंता कादंबरीत तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे.
माकडीचा माळ ही भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे सूक्ष्म चित्रण करणारी मराठी साहित्यातील पहिली कादंबरी होय.
उपकाराची फेड या कथेत भारतीय समाजातील जातीय उतरंडीमुळे चांभार मांग समाजातही कशी श्रेष्ठ कनिष्ठ भावना वाढीस लागते याचे चित्र तर
कोंबडी चोर मध्ये स्वतंत्र मिळाल्यानंतरही दारिद्र्य उपासमार राहिल्याने माणूस कसा चोरी करण्यास मजबूर होतो याची कथा आहे.
गजाआड या कथासंग्रहामध्ये त्यांना तुरुंगात भेटलेले सहकारी, तर चिरागनगरीतील भूतं मध्ये आयुष्यातील काही वर्ष घाटकोपर मधील चिरागनगरीच्या ज्या झोपडपट्टीत त्यांनी घालवली येथील जीवन संघर्ष आढळतो.
बरबाद्या कंजारी यामध्ये मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या समाजाची अवस्था तसेच जात पंचायतीला आव्हान देणाऱ्या बरबाद्या व त्याची मुलगीची बंडखोरी तर,
मरीआईचा गाडा या कथेत अंधश्रद्धेला आव्हान देण्याचे काम कथेतील नाना नावाचे पात्र करते.
शाहीर अण्णाभाऊ साठे अमर शेख ही मंडळी जरी कम्युनिस्ट पक्षाकडे पगारी प्रचारक म्हणून कार्यरत होती तरी त्यांचे आपल्या भारत देशावर प्रेम होते हे त्यांच्या तिरंगी राष्ट्र निशाणा या पालोपदावरून स्पष्ट होते.
हेही वाचा – अबब! उजनी जलाशयात सापडला चक्क २५ किलोचा मासा
अण्णाभाऊंच्या गीतामधून तीन रंगी राष्ट्रध्वजासह, छत्रपती शिवाजी महाराज,, तानाजी बहिर्जी, येसाजी, हंबीरराव, बाजीप्रभू देशपांडे सूर्याजी,कानोजी आंग्रे,शाहिस्तेखान, आदिलशहा औरंगजेब,उमाजी नाईक,संताजी, संत ज्ञानेश्वर संत एकनाथ,संत तुकाराम, पंडित नेहरू,महात्मा गांधी, महात्मा फुले,डॉ.आंबेडकर आधी महामानवांचे दर्शन घडते.
अण्णाभाऊंनी ३५ कादंबर्या, ८ पटकथा, ३ नाटके, एक प्रवासवर्णन, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे व १२ उपहासात्मक लेख लिहिले.
कामगार चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशा सार्वजनिक जीवनात मशालकऱ्याची भूमिका घेतली असतानाच आपल्या अफाट व सजग प्रतिभेच्या जोरावर काव्य, कथा, कादंबरी, पोवाडा, लावणी, छक्कड या सारख्या साहित्य प्रांतांतही मुक्त संचार करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,
व्यवस्थेने उपेक्षित ठेवलेल्या, विलन ठरवलेल्यांना आपल्या कथा कादंबरीत नायक बनविणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी शाहीर
जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मात्र येथील व्यवस्थेने उपेक्षितच ठेवले.
लेखक
– राहुलकुमार चव्हाण
Comment here