रमजानुल मुबारक -१
*रमजान -सदाचाराची शिकवण देणारा महिना*
जगभरातील इस्लाम धर्मिय मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण व पवित्र समजला जाणाऱ्या रमजान महिन्यास आजपासून प्रारंभ झाला आहे . जगभरात या महिन्याचे श्रध्दापूर्वक पालन केले जाते .
रम्ज या शब्दाचा अर्थ जाळणे असा आहे . माणसातीत सर्व प्रकारच्या अवगुणांचा नाश करणे , आपल्यात असणाऱ्या वाईट सवयी नष्ट करणे या अर्थाने रम्ज चा रमजान असा शब्द रुढ झाला . या महिन्यातील प्रत्येक कार्य हे सदाचारास प्रोत्साहन देणारे असते .
रमजान हा इस्लामी वर्षाचा नववा महिना आहे . याला अल्लाहचा महिना म्हणून ही संबोधले जाते . याच महिन्यात पवित्र कुरआन शरीफचे पृथ्वीतलावर अवतरण झाले असल्यामुळे या महिन्यास विशेष महत्व प्राप्त झाले आहे . या महिन्यातील प्रार्थना,रोजे ;न माज ‘, तिलावते कुरआन या माध्यमातून अल्लाह ची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो .
या महिन्याची मुख्य प्रार्थना म्हणजे रोजा अर्थात उपवास .पहाटेपासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत काहीही न खाता पिता उपाशी राहून रोजा पूर्ण केला जातो . मात्र पहाटे उठून रोजा धरण्यापूर्वी काही तरी जेवण करणे आवश्यक आहे . पहाटे च्या या जेवणाला सहेरी म्हणतात .सहेरी खाणे आवश्यक आहे . प्रेषित हजरत पैगंबर साहेब यांनी याबाबत शिकवण दिली आहे . त्यांनी आपल्या जीवनात केलेले कार्य सुन्नत म्हणून संबोधले जाते .
स हेरी मध्ये आपणास शक्य आहे तेवढे जेवण करावे . कधी कधी उठण्यास उशीर झाला तर खाणे शक्य होत नाही , अशा वेळी ग्लासभर दुध किंवा पाणी पिऊन रोजा धरला जातो . काही ही न खाता पिता रोजा धरला जाऊ शकत नाही . (क्रमशः)
*सलीमखान पठाण*
9226408082.