पोथरे येथे होतेय राजरोसपणे दारू विक्री; आक्रमक महिलांनी काढला करमाळा तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा
करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील पोथरे येथील राजरोसपणे चालणारी अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी यासाठी आज महिला सहित पुरुषांनी भव्य असा मोठा मोर्चा तहसील कार्यालयावर काढला होता.
तालुक्यातील पोथरे येथे सुरू असलेल्या अवैध दारू धंद्याचा त्रास होत असल्याने ग्रामस्थांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, करमाळा तहसील कार्यालय आणि करमाळा पोलीस ठाण्यात शुक्रवारी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, पोथरे हे चार-पाच हजार लोकसंख्येचे आणि श्री शनैश्वराचे तीर्थक्षेत्र दर्जा असलेल्या पुरातन देवस्थान असलेले गाव आहे.
यामुळे या गावात विविध भागांतून भाविक भक्त येत असतात. गेल्या तीन-चार वर्षांपासून या गावात बसथांबा परिसरात अनेक अवैध धंदे निर्माण झाले आहेत. विशेषतः बेकायदा दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. याचा त्रास सामान्य गावकरी, शालेय विद्यार्थीनी आणि भाविकांना होतो.
याच ठिकाणी शासनमान्य वाचनालय देखील आहे. जवळच शासकीय दवाखाना देखील आहे.
मद्यपींमुळे भांडण-तंटे, मारामारीच्या घटना वाढल्या आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. कित्येक घरातील कर्त्या पुरुषांचे दारूचे व्यसनामुळे बळी गेलेले आहेत.
त्यामुळे पोथरे गावातील बेकायदा दारू विक्री तात्काळ बंद करून त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
लवकरात लवकर दारू विक्री बंद झाली नाही तर स्वातंत्र्य दिनी तहसील कार्यालय आवारात उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी या निवेदनात दिला आहे.
हे निवेदन देतेवेळी शेकडो गावकऱ्यांसह महिलांचा लक्षणीय सहभाग होता. अवैध दारू विक्री विरोधात महिलावर्गाने संतप्त प्रतिक्रिया देत दारुबंदी होण्यासाठी घोषणा दिल्या.
गावात राजरोसपणे दारू विक्री होत असून दारुबंदी यशस्वी झाली तर या अवैध दारू विक्रेत्यांची गावकऱ्यांना २१ हजार रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा करेपर्यंत मजल गेली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी काय करत आहे, हा संशोधनाचा विषय आहे.
या निवेदनासोबत ढेकळेवाडी (मु.पो. पोथरे) येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयाचेही निवेदन जोडण्यात आले असून या निवेदनावर धनंजय झिंजाडे, हरीभाऊ झिंजाडे, हरीभाऊ हिरडे,
नातीवर अत्याचार करणा-या त्या क्रूर आजोबाला कोर्टाने सुनावली सात दिवसांची पोलिस कोठडी
नितीन झिंजाडे, नाना महाराज पठाडे, तानाजी जाधव, आयुब शेख, दयानंद रोही, रमेश आमटे, सुनील पाटील, गणेश ढवळे, दत्तात्रय वाळुंजकर, चक्रधर नंदरगे, शंकर रणवरे, चंद्रकांत शिंदे यांच्या सह गावातील महिलांच्या एकूण १२० सह्या आहेत.
तहसील कार्यालयात ग्रामस्थ महिलांच्या हस्ते हे निवेदन तहसीलदार आणि पोलिस प्रशासनाने स्विकारले. लवकरात लवकर या अवैध धंद्यांविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.
Comment here