** थंडीची हुडहुडी अन झणझणीत बेत **
-०-०-०-०-०-०-०-
माणसाला कवा काय आठवल त्याचा नेम नाही पण माझी एक सवय आहे मला कवा पण अन काय पण भूतकाळातील आठवतं आणि इथं नव्या लेखाचा जन्म होतो
म्हणजे बघा साधारण वीस पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट अहमदनगर शहराबाहेर सावेडी रोडवर सावेडी नाक्याच्या थोडंसं पुढे गेल्यावर मला वाटतं काही जण त्याला पाईपलाईन रोड म्हणतात कारण खूप अंतरापर्यंत रस्त्याच्या कडेला 16 इंची पाईपलाईन दिसते आणि तिथेच एका बाजूला बांबूच्या पातळ पट्ट्यांची चटई बनवलेली असते त्याचं चटईचा चारी बाजूंनी आडोसा… त्याच्यावरील बाजूस दोन चार फुटाची मोकळीक आणि वर त्याच अवस्थेत असलेलं छत आत मध्ये एक पाच फुटी भिंत अन पलीकडं भटारखाना सगळा परिसर कसा धुरकट वाटायचा पण त्या चटईची चार फुटाची मोकळी जागा अन शेतातली फिरती हवा पण त्या ढाब्यात शिरायची फ्लोरींग म्हणाल तर
आपली साधी जमीन आणि पाच सहा लाकडी हलणारी टेबलं त्या प्रत्येक टेबलाच्या भोवतालनं पूर्वीच्या पत्र्याच्या घडीच्या खुर्च्या असायच्या त्या चार चार खुर्च्या त्यातलाच एक टेबल… त्याच्यावर एक छोटीशी लाकडीपेटी… आणि मालकाला पण पत्र्याची घडीची खुर्ची… हीच त्याचं काउंटर कसली आलीयं लाईट आणि कसलं आलयं मेनू कार्ड… सांच्याला अंधार झाल्यावर प्रत्येक टेबलावर एक आरगीन मात्र असायची…म्हणायला गेलं तर मला वाटतं तवा त्यांना मेनू कार्ड हा शब्द सुद्धा कानावर आलेला नसावा आपण गेल्यावर चार जर्मली पाण्याचे गिलास टेबलावर ठेवून कान थोडासा आपल्याकडे करणार आणि एखादा गाणं म्हणताना तो गायक आपला तळहात कानाला लावतो तसा लवून मान थोडीशी आदबिनं आपल्याकडे झुकवून मग आपण हळूच त्याच्या कानामध्ये आपली ऑर्डर द्यायची अगदी हळूहळू आवाजात त्याच्या कानात सांगितल्यावाणी करायचं तीन सागुती आणि सहा भाकरी सांगायच्या कांद्याच्या चकत्या अन चार फोडी लिंबू आणि एका प्लास्टिकच्या वाटीत मीठ असं हाटील पण माझ्या कायम आठवणीत राहील.
तसं खरं बघायला गेलं तर आपल्यातली काही खाणारी तरी धड हायती का त्यांच्यात पण दोन-तीन वर्ग काहीजण प्रवास रोडने करायचा असतो भूकची वेळ झाल्यावर तो ढाब्यावरच खाणार दुसरा वर्ग म्हणजे नुसता फुगीर… त्यांच्या चॉईस आल्या म्हणजे ए सी पाहिजे… कॉटेज पाहिजे…फॅमिली रूम पाहिजे… पण ही कुठं कळतंय की त्यांच्या प्रत्येक पदार्थाचा रेट जरा जास्तच असतो बरं ढाब्यावाल्यांचं एक आहे सगळे पदार्थ सारखेच असत्यात म्हणजे त्यातल्या त्यात ठळकपणे दिसणारं विशेष असं काही नाही फक्त चिकन थाळी अन ह्यांच्या ढाब्याचं नाव रानवारा तर रानवारा स्पेशल चिकन थाळी म्हणजे त्याच्यात काय तर दोन-तीन चिकनच्या डिश त्याच्या वरती छोटीशी काजूची भुरभुर म्हणजे प्रत्येक डिशवर दोन-चार काजूच्या अर्ध्या खापा आणि पांढरा जिरा राईस त्याच्यावर रंगीबेरंगी टूटीफ्रूटीचे सात आठ तुकडे पण साधी थाळी 250 रुपये अन ही स्पेशल थाळी 350 रुपये आता काय ते शंभर रुपयांचं काजू बदाम सारखं ड्रायफ्रूटचं मटेरियल टाकत नाही नुसतं येडं बनवायचा धंदा आता काही वर्ग असा पण आहे तो आपला जे मिळेल…उपलब्ध असेल ते आपलं गुपचूप खातो तर काहींचं अमुकचं पाहिजे.. तमुकचं पाहिजे.. हा अट्टाहास असतो खाऊन खायचं पण नुसती जिवाची वढाताण आता वशाट खाणाऱ्यांचा पण वर्ग आहे आवडीनुसार चॉईस वाढलीयं आणि ती प्रत्येक रेसिपी ही सुंदरच असते प्रत्येकीने आपापल्या परीने खाद्य संस्कृतीच्या इतिहासात नोंद करून ठेवलीयं तसं बघायला गेलं तर प्रत्येक पदार्थ आपापल्या प्रादेशिक पातळीवर लाडका पण त्यानीसुद्धा आपल्या क्षेत्राबाहेर लोकप्रियता मिळवलीयं लौकिक असाच अगदी अलीकडच्या काळात सर्वत्र मागणी असलेला पदार्थ म्हणजे सावजी
कारण सावजी हे नाव आणि सावजी मटण म्हटलं की डोळ्यापुढं पहिलं येतं ते माझं नागपूर नागपूर बद्दल मला खूप आदर आणि प्रेम तर नागपूर म्हणजे अगदी भोळं भाबडं माया लावणारा प्रांत विदर्भ तर विदर्भ म्हणजे मसालेदार पदार्थाचं माहेरघर त्याचं एक विशेष म्हणजे झणझणीत काळा तेलाचा तवंग त्याचा रस्सा खाताना डोळ्यात पाणी येईल इतका झणझणीतपणा आणि गॅरंटी सुद्धा तरीही तमाम खवय्यांना एक भूल पाडणारी व चटक लावणारी खाद्यशैली याचा एक छोटासा इतिहास आहे पूर्वी नागपुरात मुंबई…सुरत… सोलापूर प्रमाणे काही प्रमाणात का होईना पण मोठ्या संख्येने मिल्स होत्या मध्यप्रदेश सारख्या इतर प्रांतातून कोष्टी बांधव कामासाठी येथे आले आणि मग इथेच स्थायिक झाले सुट्टीच्या दिवशी सर्वजण मिळून एकत्र जेवायचे मग कोण…काय…व कशा पद्धतीने बनवतोय यात पैज लागायची त्यातूनच ही शैली निर्माण झाली या शैलीचे एक विशेष म्हणजे भाजीला काळ्या तर्रीचा तवंग आणि झणझणीत तिखटपणा सावजी तयार करताना यात वापरले जाणारे मसाले अधिक प्रमाणात म्हणजे जास्त भाजले जातात आणि त्याला अंगचाच एक नैसर्गिक जळकट असा खरपूसपणा येतो यामध्ये वापरले जाणारे खोबरे संपूर्ण काळे होईपर्यंत भाजले जाते आणि त्यामुळे सावजी डिशवर या काळ्या रंगाचा तवंग येतो शिवाय यामध्ये तेलाचा वापर ही अधिक असतो आणि रस्सा अधिक चवदार होण्यासाठी काही धान्याचं पीठ वापरलं जातं त्याला सवताळ म्हणतात मात्र त्याचं प्रमाण सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे आणि सावजी म्हटलं की केवळ मांसाहारी अशी समजूत आहे तर तसं नव्हे डाळ कांदा…पाटवडी…खसखसची भाजी… अख्ख्या वांग्याची भाजी… सुद्धा प्रसिद्ध आहे शिवाय ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी… वालाच्या दाण्याची भाजी…तर्री पोहे…सुद्धा सावजी पद्धतीने बनवून सावजी पोहे म्हणून विकतात
शहरातल्या चार भिंतीच्या बंदिस्त दुकानापेक्षा रानातल्या बाभळीला टांगलेलं बोकडाचं मटण कवा पण एकदम खासच आता मटणाबद्दल बोलू तर मटण खायची इच्छा होणे असे नव्हे तर मटण खाऊन ती एक प्रकारची इच्छा तृप्त होणे असा आहे मटण काय दोन-चार मसाले टाकले की मटण हे स्वादिष्टच लागणार पण मावशीने काहीतरी सांगितलयं की मटण शिजवताना तेल गरम झाल्यावर कांदा… लसूण…आलं…हळद…मीठ…आणि मटण शिजत घालायचं त्यात वरून पाणी घालायचं नाही पूर्ण अंगच्या पाण्यात मटण शिजवायचं पूर्ण पाणी आटलं की मगच वरून पाणी घालायचं ज्या पातेल्यात मटण शिजत घातलयं त्याच्यावर खोलगट थाळी ठेवून झाकायचं त्या थाळीतच तांब्याभर पाणी गरम करायला ठेवायचं अन गरम झाल्यावर तेच गरम पाणी पहिलं पाणी आटलं की त्यात घालायचं वरून थंड पाणी अजिबात घालायचं नाही जर मटण अंगच्या पाण्यात शिजलं नाही तर त्याची चव जाते पाणी घातलं नाही तरी सतत लक्ष ठेवायचं कारण जर मटण पातेल्याच्या बुडाला लागलं तर त्याची चव लागत नाही शिवाय मटणामध्ये मांदे म्हणजे चरबी असणं आवश्यक तर मटण शिजायला टाकताना तेलाबरोबर घालायचं त्याचंही तेल सुटतं अन मटण जास्त चवीला लागतं थोडक्यात म्हणजे मांद्याची फुलं मटणाच्या रश्यावर तरंगली पाहिजेत असा अट्टाहास असतो त्याचा एक प्रकारचा तेलकटपणा खाताना हाताला लागला पाहिजे नंतर मटण शिजल्यावर फोडणी टाकायच्या अगोदर थोडा आळणी रस्सा काढून घ्यायचा वेगळ्याचं चवीचा अतिशय पौष्टिक असा आळणी रस्सा लहान मुलांना भातावर घालून चारला की त्यांना आपोआपच मटणाची चव लागते तिल्लवी म्हणजे लिव्हर गरम पातेल्यात वरून चिकटवायचं म्हणजे खरपूस छान लागतं रश्यात किंवा सुक्या मटणामध्ये त्याला एवढी चव येत नाही बकऱ्याचे कान भाजून छान लागतात कलेजी आख्खी शिजवायची वाढताना तुकडे करून वाढायची आता मसाला करताना कांदा आणि खोबरं शक्यतो जास्त प्रमाणात काळ होईपर्यंत भाजायचं काही ठिकाणी ग्रामीण भागात इसुर हा प्रकार मटणामध्ये टाकतात आणि काही मटणामध्ये खडा मसाल्याचा असा वापर असतो की खाताना तोंड भाजत नाही परंतु जेवण झाल्यावर नरड्याचा जो पाईप असतो ना तो भकभक करतो म्हणजे त्यावरून कळतं कि कालवण किती तिखट होतं
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच डिसेंबर महिना सुरू झाला आहे काही दिवसांनी प्रत्येक जण नवीन वर्षाचं स्वागत करायच्या तयारीला लागणार आणि ही अंगाला बोचणारी गुलाबी थंडी…शेतात उभ्या पिकात आलेलं ज्वारीचं कोवळं कणीस म्हटलं की हुरडा पार्टीचा बेत आठवणार आणि मला तर हुरडा पार्टी म्हटलं की पोमलवाडी आठवते आणि पोमलवाडीची हुरडा पार्टी म्हटले की आदरणीय देवकर तात्या म्हणजे त्या काळातलं राजकारणातलं एक सन्माननीय व्यक्तिमत्व पार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत मजल मारलेलं एक नेतृत्व आणि अशा अविस्मरणीय प्रसंगी तात्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण तात्यांनी समस्त रेल्वेच्या टी सी लोकांना दिलेली हुरडा पार्टी जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या सोलापूर डिव्हिजनमध्ये प्रसिद्ध होती ज्या दिवशी तात्यांची हुरडा पार्टी असेल त्या दिवशी अगदी सकाळपासून सोलापूर डिव्हिजन आणि दौंड च्या पुढे हडपसर तिकडे अहमदनगर.. येवला… अंकाई दुसरीकडे मिरज.. लातूर… पंढरपूर इत्यादी भागातील रेल्वेचे तिकीट तपासणीस पोमलवाडीला हुरडा पार्टीसाठी हजेरी लावायचे त्यादिवशी रेल्वे स्टेशनवर…बाजारपेठेत…नदीवर… तिकडे फिल्टरवर आणि देवकर तात्यांच्या शेतामध्ये असं वाटायचं जणू काही टी सी लोकांची जत्राच भरलेली आहे काय की आणि त्याच पार्टीमध्ये तात्यांची दोन-चार मित्र मंडळी ज्वारीचं कोवळं कणीस हारामध्ये भाजून हाताने हुरडा चोळून देण्याचं मोलाचं काम करायची त्यामध्ये तात्यांचे जिवलग मित्र आणि आमचे आदरणीय अण्णा (मामा) बाबर…मा. दगडू मामा फाळके… मा. भाऊसाहेब खैरे आवर्जून हजर राहून कार्यक्रम छान पैकी पार पाडायचे यांची सुद्धा आठवण झाल्याशिवाय राहत नाही हुरडा तर नावाला होता खऱ्या पार्टीचा बहर यायचा तो मटण खाण्यामध्ये या तात्यांच्या हुरडा पार्टीमुळे तात्यांना रेल्वे विभागामध्ये एक विशेष मानाचे स्थान होतं रेल्वेतील प्रत्येक जण आदराने मान झुकवून त्यांना नमस्कार करायचा अजूनही ते थंडीचे दिवस आणि तो प्रसंग आठवला की मन कसं मोहरून जातं
*********************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
Comment here