*** जुन्या आठवणी ***
============
आमचे बंधू माननीय शिवाजीराव पाटील
(….. यांच्या तीक्ष्ण नजरेतून…..)
##########
सहज आपला बसलो होतो लहानपणीच्या बहुतेक मित्रांचे फोन वरचेवर येतच असतात मस ख्याली खुशाली समजती पण आपलं भाग्य हे की आपण आता शाळा सोडून सुमारे पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये पुलाखालून लई पाणी गेलयं जो तो आपापल्या संसारात मशगुल आहे तवाचे आम्ही मित्र बहुतेक सासरे…आजोबा… पणजोबा पण झालोय तीच गत आमच्या वर्गातल्या वर्ग भगिनींची त्या पण आपापल्या घरी सुखात आहेत खुशाली समजती मन पुन्हा बालपणाच्या आठवणीने मोहरून येतं.
कधी कधी डोळ्याच्या कडा किंचित वल्ल्या होतात तशा बालपणीच्या शाळेच्या जीवनातल्याच काहीतरी गल्लीतल्या मुलांच्या गमती जमती फार आहेत पण काही आठवणीत राहण्यासारख्या आठवणी पण असतात म्हणजे बघा बहुतेकांच्या घरची गरीबीचं असायची पण तवा आपण गरीब आहोत ही आपल्या आई बापाने आपल्याला आठवूणच दिलं नाही हीच आपली खरी श्रीमंती अन त्याच्यात आपलं शेतकरी जीवन म्हणजे बघा थोडीशी समज आलेली असते तसं दहावीत आपण पोहोचलेलो असतो आणि एक विशेष म्हणजे मराठी शाळा आणि हायस्कूल गावातच असते पण खरा विरह जाणवतो तो दहावीच्या नंतर काय आपली पण दहावीची एक बॅच असायची तसं बघायला गेलं तर लेखकाची दहावीची बॅच म्हणजे 1975 आणि त्यावेळी एक विचित्र योगायोग घडून आला म्हणजे पहिली मॅट्रिक अकरावी त्यांची शेवटची बॅच अन आमची दहावीची मॅट्रिकची पहिली बॅच त्या बॅचमध्ये मी म्हणजे किरण बाबुराव बेंद्रे… शिवाजीराव साहेबराव पाटील केतुर… शिवाजीराव साहेबराव पाटील गोयेगाव… शिवाजी श्रीरंग पाठक म्हणजे आपले पाठक भाऊसाहेब…सुभाष मारुती खाटमोडे… रमेश शिवदास देवकर…देवराव अंबादास नवले…सुभाष विठ्ठल जरांडे…विरचंद बंकटलाल रांका…अशी नामांकित मित्रमंडळी खरचं ती पण एक वेगळीच गंमत होती आणि त्या दहावीच्या बॅचचं काय कौतुक सांगावं आणि खरं कौतुक वाटायचं ते परगावहून दोन पाच किलोमीटर वरून चालत येऊन शिक्षण घेणाऱ्या माझ्या वर्ग मित्रांचं त्यांना पहिलं टेन्शन म्हणजे तवा काही एवढ्या एसट्या…सायकली…किंवा कोणत्याही वाहनांची सोय नव्हती आपली पायपीट करायची मिळालेल्या दोन टांगा टाकीत टाकीत शाळेत यायचं मग कडक ऊन…पाडणारा पाऊस… वाजणारी थंडी…सगळं काही यात आलं बघा प्रत्येकाची दहावीची बॅच असते आत्ताच्या घडीला बघायला गेलं तर कोण कुठे असेल हे कोणालाच माहीत नसतं कधीच भेटणं पण होत नसेल तरी ती दहावीची बॅच प्रत्येकाच्या मनात घट्ट दाटून बसलेली असते आणि हीच तर खरी गंमत असते तरीही आज किंवा आता ही ती दहावीच्या बॅच मधलीच मुलगा आणि मुलगी असते अशा असतात दहावीच्या आठवणी आणि सुखद असते त्याची उजळणी तिनं त्याच्याकडे पाहिलेलं असतं त्यांनी पण तिच्याकडे बघितलेलं असतं बस इतकंच बघण्या-बघण्यातचं वर्ष सरलेलं असतं दहावीचा निकाल लागतो प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या असतात कोणाची पाऊलवाट…कोणाचा हमरस्ता…तर कोणाचा हायवे पण असतो मनामधी विचाराचं काहूर उठलेलं असतं आणि तो दिवस उगवतो एक नव स्वप्न घेऊन
त्यादिवशी दहावीचा निकाल असतो प्रत्येकाचं विश्व वेगळं असतं त्यांचे मित्र बदलतात अन तिच्याही मैत्रिणी एका गोष्टीची सुरुवात होण्याआधीच तिच्या स्वप्नांना पूर्णविराम येतो नवीन वयात…नवीन विश्वात…आणि नवीन मित्रांमध्ये गप्पांच्या ओघात पुसटच्या स्पर्शाने प्रेम म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने समजायला लागलेलं असतं आता ओढ आणि सहवास दोन्हीही हवीहवेसे वाटायला लागतात त्याला अन तिला दोघांना पण कोणीतरी आवडतं अथवा कुणी सहजीवनाची शिडी एकत्र चढतो…कोणी पडतो कुणी धडपडतो…पुढच्या आयुष्यात प्रत्येकाचीच एक बाग असते आणि त्याच बागेत तो झाड होऊन जगतो आणि ती पण बागेत वेल होऊन जगते वेलीवर कळ्या येतात त्यांची फुलं होतात झाडांचा वृक्ष होतो सावली देत उभा असतो पण त्याच्या उभे राहण्याचाच खरंतर वेलीला त्याचा आधार असतो वर्षा मागून वर्ष सरत जातात कळ्यांची फुल होऊ लागतात वाऱ्यावर डुलत आपल्याच मस्तीत बहरत असतात कधी साध्यासुध्या वाऱ्याचं पण वादळ होतं सगळ्या बागेला हलवून जातं झाड मात्र ताठ असतं कसं हललं पण नाही म्हणून ताठरपणाने बघत असतं पण तीच ती वेल असते स्वतः वाकते म्हणूनचं झाडाला मोडण्यापासून वाचवते
आता आयुष्याच्या संध्याकाळी व्हाट्सअप आणि फेसबुक तोच एक विरंगुळा असतो फेसबुकवर शोध घेता घेता व्हाट्सअप वर दहावीच्या बॅचचा एक ग्रुप तयार होतो इतकी वर्ष बंद असलेल्या कोनाडा हळूच उघडतो हृदयाच्या कुपीत बंद ठेवलेल्या अत्तराचा सुगंध अजूनही तसाच असतो पण आता मात्र गप्पांच्या मैफिलीत जुन्या मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना उजाळा येतो कारण त्या अत्तराच्या कुपीतला सुगंध पुन्हा हवाहवासा वाटतो एका अर्थानं मन मनोमन म्हणत असतं अशी वेळ यावी केव्हातरी कुठेतरी जवळ ती दिसावी तेव्हाची ती खट्याळ नजरा नजर पुन्हा एकदा तरी व्हावी ती एक नजर पुढील जीवनाची सहचारी बनून जावी कारण घरची दशमी तर जिंदगीभर जिंदगीला पुरलेली असती त्यातच एक आशेचा किरण दिसतो दहावीच्या बॅचचा भेटण्याचा दिवस उगवतो त्यालाच आपण गेट-टुगेदर म्हणून दुधाची तहान ताकावर भागवतो पण त्यादिवशी प्रत्येक जण नव्यानेच पण जुनं दिसायचा प्रयत्न करतो. प्रत्येक मुलगा मुलगी मला ओळखेल हा भोळा विश्वास असतो त्याच वर्गात त्याच बेंचवर पुन्हा एकदा प्रत्येक जण बसणार असतो सारं काही तेच असतं साल फक्त पन्नास वर्षांनी बदललेलं असतं कारण तवा व्हटावर मिसरुड फुटलं नव्हतं पण आता पांढऱ्या फेक पाटील मिशावर ताव देऊन प्रत्येक जण या कार्यक्रमाला आलेला असतो
खरं पहिल्या झटक्यात ओळखूचं येत नाही आणि हीच तर खरी गंमत असते त्या गेट-टुगेदरची आठवणीच्या झर्यांचा महासागर होणार असतो भेटीगाठी होत असतात जुन्या आठवणी निघत असतात त्यातच तिची आणि त्याची नजरा नजर होते आणि एका क्षणात सारं काही सांगून जाते त्याला सुद्धा नवीन भेटीत खूप काही बोलायचं असतं पण उजाळा देण्यासारखं दहावीच्या वर्षात काही घडलेच नसतं तो तिला तिच्या टोपण नावाने हाक मारतो तिला सुद्धा लई दिवसांनी दोन तोळ्याचा सोन्याचा दागिना घातल्यावानी वाटतं कारण तिची अन तिच्या अंत:करणाची हीच तर खरी ओळख असते ती पहिल्यांदा टोपण नावाने मारलेली हाक ऐकून थोडीशी अवघडते पण तिचा त्याला आक्षेप ही नसतो कारण एक दिवसाचा सहवास पण पुढच्या संपूर्ण प्रवासाचा साथी होणार असतो निरोप द्यायची वेळ येते दोन समांतर रेषा काही क्षणासाठी एकत्र होऊन पुन्हा एकदा समांतर जाऊ लागतात पुढील जन्मी नक्की भेटण्याची नजरेने ग्वाही देतात हीच ती दहावीची बॅच मनात कायमचं घर करून राहते
हा अन तशातच या चार ओळी आठवल्या की अजून काही वर्ष मागं गेल्यासारखं वाटतं ती परत आठवते की लाटेने का कोणीतरी नेला तो किनाऱ्यावरचा वाळूचा किल्ला भवऱ्याच्या रश्शीला लावलेला कोल्ड्रिंगच्या झाकणाचा बिल्ला कुठे हरवली ती शाळेतली मुल्य शिक्षणाची वही इवलिशा मार्काच्या प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही गेला कुठे तो चालताना पॅक पॅक वाजणारा बूट मी नाही देणार जा माझं चॉकलेट म्हणून आवडलेली ती घट्ट मुठ किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या कुशीत ब्लॅंकेटहून पण जास्त ऊब होते बघा त्या मायेच्या कुशीत हरवला तो प्रेमाचा घास चिऊताई दाखवत आईने भरवलेला घरात न सांगता लपवून छपवून भेळ खायचा बेत ठरवलेला गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीची केस छोट्याशा बुटाची आईने बांधलेली आणि नंतर सुटलेली ती लेस गेली कुठे ती मामाच्या गावाला जाणारी झुक झुक गाडी हरवली कुठ ती ख्रिसमसमधल्या सांताक्लॉजची पांढरी पांढरी दाढी धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला शाळेत बडबड गीत गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला आहे आणि अ आ इ ई फळ्यावर लिहिणारा तो खडू कोणी पळवला आहे कशाला आले आपल्याला हे शहाणपण कारण खरंतर हरवलंय ते आपलं सुंदर बालपण
आणि पुन्हा पन्नास वर्षे मागं वळून बघितलं तर दहावीच्या वर्गाची बोर्डाची परीक्षा म्हणून आधीच आलेलं डोक्याला टेन्शन त्याच्यामध्ये काय त्या सरांची शिकवण्याची किमया बदडे सरांचं शिकवण म्हणजे जसं एखाद्या अभंगातल्या ओवीचे निरूपण… इतिहासाच्या गायकवाड सरांनी शिकवलेला इतिहास तो इतिहास राहिला नाही तर तो वर्तमान वाटतोय… गणिताचे चव्हाण सर त्यांना बघून बीजगणिताचे समीकरण आणि भूमितीचे प्रमेय चळचळा कापायचे…हिंदीच्या खांडेकर सरांनी शिकवलेले संस्कृतचे सुभाषित आजही ओठावर रेंगाळतात… सदिगले सरांनी शिकवलेले इंग्रजी आज ही चारचौघात वागताना बोलताना प्रभाव पाडतंय…पी टी च्या पाटील सरांनी शिकवलेली कबड्डी आपला एक गडी राखून समोरचे दोन गडी कसे आऊट करायचे हे खरं तर आताच राजकारण बघून आजही शिकवते ती शाळेची कौलारू इमारत आज पण डोळ्यापुढं जशीच्या तशी दिसतीयं हीच तर सहयोगी जीवनामध्ये खरी आठवण असते
**********************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
Add Comment