आम्ही साहित्यिक

जवळून पाहिलेला कार्यकर्ता

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जवळून पाहिलेला कार्यकर्ता

             ==================

       आता खरं बघायला गेलं आणि एकंदर सारासार आजच्या दृष्टीने राजकारणामध्ये जी काही उलथापालथ चाललीयं त्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर विषय येतो कार्यकर्त्याचा तर कार्यकर्ता हे पात्र असं आहे की ते दोन-तीन वर्गामध्ये विभागलं जातं एक तर राजकीय कार्यकर्ता…दुसरा सामाजिक कार्यकर्ता…. तिसरा कामगार संघटनेचा कार्यकर्ता असे विविध कार्यकर्ते आपण पाहतो परंतु खरी छाप पडते ती सामाजिक कार्यकर्त्याचीच कोणताही कार्यकर्ता हा खरोखरच निष्ठावान असतो कारण तो आपला जास्तीत जास्त वेळ आणि लक्ष हे पक्षासाठी देत असतो पण आत्ताची परिस्थिती पाहिली तर निष्ठावान हा शब्द फक्त लिहायपुरता शिल्लक राहिलाय कारण कित्येक वर्ष तो त्या आदरणीय… दादा…साहेब… अण्णा…भाऊ… जो कोण असेल त्या नेत्यासाठी अविरतपणे झटतोय म्हणजेच आता तसं बघायला गेलं तर निष्ठावान राजकारण राहिलेलं नाही तर नुसतं निसटा निसटीचं राजकारण चाललंय.

         कारण प्रत्येक कार्यकर्ता हा एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या नेत्याच्या… किंवा त्याच्या पोराच्या कित्येक तरी लक्झरी कोट्यातल्या गाड्या झाल्या अन ह्यो पंधरा वर्ष झाली राजकारणात कार्यकर्ता म्हणून वावरतोयं पण अजून पण त्याच यामा गाडीवर आहे त्याच्यात पहिलं २० रुपयांचं म्हणजे आत्ताच पन्नास रुपयांचं पेट्रोल टाकायचं माझ्या नेत्याचं… माझ्या भाऊचं हे अन ते म्हणून घरदार सोडून पळतंय आणि विशेष म्हणजे मूळ कार्यकर्त्यांनी सुधारणं ही काळाची गरज आहे उगाच आपलं फापाल्ल्यावाणी करत संसार परपंचांकडं दुर्लक्ष करू नये आणि आपण ज्याचा कट्टर समर्थक म्हणवून घेतो त्याला या कार्यकर्त्याचं काही घेणं देणं नसतंय अन सकाळी उठल्यावर याला पाहिलं सुचतंय स्टेटस काय ठेवायचं त्या अण्णा… दादा…आणि साहेबांचं स्टेटस ठिवण्यापेक्षा आपल्या जीवनातला खरा नेता खरा हिरो हा आपला बाप आहे खरं बघायला गेलं तर त्याचं स्टेटस ठेवायला पाहिजे कारण कार्यकर्त्याला स्टेटस ज्या नेत्याचं ठेवायचं असतंय त्या नेत्याच्या फोनमध्ये ह्याचा साधा नंबर पण सेव्ह नसतोय त्या तसल्या कार्यकर्त्याचं मुळ काम म्हणजे काही कार्यकर्ते हे अपवाद सोडले तर नुसत्या सतरंज्या उचलणं…भोंगे बांधणं ही त्याची कामं.

         ह्यानं काय करायचं फक्त पांढराशुभ्र लिननचं कडक इस्त्री केलेलं शर्ट घालायचं… खिशाला गॉगल अडकवायचा आणि इशाऱ्याप्रमाणे नेत्याच्या सहवासात जिथे जिथे कार्यक्रम असेल…मीटिंग असेल तिकडं नुसतं तोंड घेऊन फिरायचं कारण याच्या डोक्यात एक खटकी नेमकी बसलेली असते ती म्हणजे कवा तरी वाढदिवसाच्या फ्लेक्सवर या नेत्यांनी त्याचा युवा नेता हा केलेला उल्लेख आणि ह्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या उपाध्या म्हणजे भावी नगरसेवक…उमलते नेतृत्व…आपल्या मतदारसंघाचे आधारस्तंभ… ढाण्या वाघ…अशा कितीतरी येडं बनवणाऱ्या उपाध्या यांना दिलेल्या असतात 

       आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यक्रम कोणताही असो मग तो सामाजिक…राजकीय किंवा गावकीचा असो मस त्याला प्रभारी असतील अध्यक्ष असतील विश्वस्त सुद्धा असतील पण खरं काम आणि कार्यक्रमाला शोभा येते आणि कार्यक्रम पार पडतोय तो या कार्यकर्त्यामुळे हे कार्यक्रमाचे मुख्य पात्र असलं तरी त्याला गौण किंवा पडद्यामागे ठेवलं जातं आता बघा साधं पंढरपूरला जाणारी दिंडी असो ती दिंडी मुक्कामी पोहोचायच्या आधी पाण्याचे टँकर भले नदीवरून नाही तर विहिरीवरून भरून आणून लावायचे… दिंडी यायच्या आत स्वयंपाक तयार…पंगत वाढणं… उष्ट खरखटं काढून साफसफाई करणं… तंबू राहुट्या ठोकणं…ही सगळी काम नवयुवक आणि कार्यकर्तेचं करतात

        कारण कार्यकर्ता… ही एक अशी कृती आहे एक शक्ती आहे आणि समुदायाने जर केली तर एक क्रांती आहे पण काही वेळेला कार्यकर्ता मानसिक दृष्ट्या दुखावला जातो कारण काही राजकीय क्षेत्रामध्ये कार्यकर्त्याला कढीपत्त्याची उपमा दिलेली आहे कारण पदार्थ सुग्रास होण्यासाठी खमंग फोडणीची गरज असते तुम्हाला तर माहितीच आहे फोडणीसाठी जिरे… मोहरी… आलं… लसूण…त्याबरोबरच कढीपत्ता एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो कारण ज्यावेळी कांदे पोह्याची प्लेट हातात येते व लिंबाची फोड पिळली जाते ओल्या खोबऱ्याचा कीस त्यावर असतो त्या पोह्याच्या पिवळ्या धमक कार्यक्षेत्रामध्ये हिरवागार तळलेला कडीपत्ता किती छान डेकोरेशन दिसतं पण होतं काय हे सगळे वरचे जे असतात फोडणीला टाकलेले पदार्थ ते सोडून फक्त कढीपत्त्यालाच दोन बोटानी अलगद धरून बाहेर काढून टाकून दिलं जातं सहसा कोणी खात नाही पण कढीपत्ता जर पोह्यात नसला तर ते पोहे मनात भरत नाही नुसता रात्रीचा शिळा भात हळद मिठाची फोडणी दिल्यावाणी दिसतो आणि कार्यकर्त्यांची जी भूमिका असते तिला खरंच मानावं लागेल ती एक संधी असती आणि तिचं सोनं करायला प्रत्येकाला जमलच असं काही सांगता येत नाही

         हे बघा मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो तो काळ होता 2000 च्या आसपासचा असावा त्यावेळी मी नोकरी सांभाळून काही राजकीय व सामाजिक व्यक्तींशी संबंधित असल्यामुळे माझा घनिष्ठ संबंध निर्माण झाला होता मी पण माझ्या परीने फावल्या वेळात त्यावेळी काय मोबाईल हे उपकरण एवढं वास्तवामध्ये नव्हतं सर्व फिजिकली करावं लागायचं लँडलाईन फोन होता तो पण काय वार्डातल्या बहुतांशी लोकांकडे नाही तर बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे लँडलाईन फोन होता त्यावेळी माझ्याकडे एक रिक्षा होती कारण रिक्षा घेतलेली काही दिवसापूर्वीच त्या उमेदवाराला पेढे देऊन सांगितलेलं होतं महानगरपालिकेची निवडणूक होती त्या गडबडीत माझी आणि त्या उमेदवाराची प्रत्यक्षदर्शी गाठभेट झाली नव्हती आणि निवडणुकीत उभा राहिलेला उमेदवार त्याच्या डोक्यात एक किडा असतोय काय आणि त्यात समोर भेटणारा बोलका पोपट पाहिजे म्हणजे उजाडलचं माझ्या हातात काही कागदाचं पेंडोळं होतं उमेदवार त्याच्या पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर काही कार्यकर्त्यांसह उभा होता मला बघितल्यावर माझाही जनसंपर्क त्याच्या लक्षात आला हे पात्र आपल्या खूप उपयोगाचं आहे त्यांनी मला सहज विचारलं…अरे बेंद्रे साहब आपका ऑटो किधर है l कारण त्याला प्रचारासाठी ऑटो पाहिजे होती कारण बहुतेक रिक्षावाले निवडणुकीसाठी आटो देत नाहीत कारण दोन-चार भोंगे बांधून खडबडीत रस्त्यामुळे रिक्षाचं हूड पार कामातनं जातं मी पण सहज त्याच्या दुसऱ्या कार्यकर्त्याला म्हटलं आठ दिन हो गया मंगलवार से मेरा ऑटो रिक्षा एस टी स्टँड और पोर्टर चालमे घूमकर प्रचार कर रही है l हमे क्या बोलना पडता है क्या?हम तो आपका ही प्रचार कार्य कर रहे है l आणि त्या कालावधीमध्ये रिक्षा दोनशे रुपये रोज प्रमाणे भाडे आकारत होती त्यांनी मला परत विचारलं आणि तुम क्या कर रहे हो l मी हातातील त्यांचेच निवडणुकीच्या प्रचाराचे पॅम्प्लेट दाखवले आणि दो चार गणपती मंडल के साथ मीटिंग थी l आपलं सहज म्हटलं तुम्हारा ही काम चालू हैं ना l मग तो म्हणाला ऑफिस मे जाओ सावंत क्या बोलता है देखो आत गेलो तर त्या सावंतनं मला 50 रुपयाचा गठ्ठा म्हणजे पाच हजार रुपये दिले मला कल्पना पण नव्हती इतके पैसे दिल म्हणून मला तर त्या कालावधीमध्ये लॉटरी लागल्यासारखं झालं आणि खरं बघायला गेलं तर फक्त दोन दिवसापासून माझी रिक्षा निवडणुकीचं प्रचार कार्य करीत होती पण या अगोदर म्हटल्याप्रमाणे उमेदवाराला प्रत्येक गोष्टीची शहानिशा करायसाठी वेळ असतोय कुठं कारण पूर्वी वॉर्ड होते आता त्याचं रूपांतर प्रभागांमध्ये झालं होतं म्हणजे दोन-चार वार्डाचा एकच प्रभाग कार्यक्षेत्र वाढलयं असं वागलचं पाहिजे  

             नाहीतर काही कार्यकर्ते जीवाचं रान करतात शारीरिक मेहनत वेळेचं बंधन नाही नुसते आपले झेंडे लावायचे माणसं गोळा करायची पद यात्रेला नाश्तापाणी जेवणखाण याची सोय लावायची सतरंज्या झटकायच्या अजून थोडा विचार केला तर पूर्वीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आत्ताच्या कार्यकर्त्या मध्ये खूप फरक आहे पहिला कार्यकर्ता आपल्या परीने जीवाचं रान करायचा उमेदवाराला कळत पण नव्हतं पण त्याला निवडून आणायचा आताचा कार्यकर्ता एखाद्या दिवशी रात्री दहा वाजता फोन केला माझे स्नेही आमके आमके आजारी आहेत काहीतरी बघा तर नगरसेवक म्हणाला ठीक आहे सकाळी बघू करून टाकू तिकडून त्यांनी आवाज चढवला काय म्हणतो…कुणाला म्हणतो तू… तुझ्या माग पंधरा वर्षे फिरतोय कार्यकर्ता म्हणून काही येडा म्हणून फिरलो का तू गेला उडत लगेच सकाळी उठलं की चालला दुसऱ्या पक्षाच्या गटामध्ये प्रवेश हे असलं बघा आता निष्ठा राहिली नाही नुसती निष्टा निष्टी चाललीयं कार्यकर्त्याबद्दल सध्या अशी अवस्था आहे या कार्यकर्ता बनण्याच्या नादामध्ये खूप लोकांचं आयुष्य जळताना समाजात पाहिलयं अनेक लोकं गुन्हेगारीच्या मार्गाला लागलीत शिक्षण अर्धवट राहिलं व्यवसाय करायची आर्थिक स्थिती भक्कम नाही म्हणजे भांडवलाला आर्थिक पाठबळ नाही अर्धवट शिक्षणामुळे नोकरी नाही मग टवाळखोरी…छेडछाडी…चोऱ्यामाऱ्या…मग काही गैरप्रकार झाला तर भाऊ नाहीतर दादा किंवा ताई वहिनी ही समाजातील बडी धेंडं म्हणजे त्या कार्यकर्त्याच श्रद्धास्थान आहेच सोडवायला मग हिम्मत वाढते मुजोरी वाढते मग एखाद्या प्रकरणात भाऊ काय ही सगळी धेंड काहीच करू शकत नाही मग आहेच आयुष्याची राख रांगोळी कोणत्याही नेत्याला काही घेणं देणं नसतं कार्यकर्त्यांची त्यांना गर्दी हवी असते त्यांना मागे घोषणा देणारे हवे असतात

           खऱ्या कार्यकर्त्यांची त्यांना किंमत राहिलेली नसते त्यांना काय माहित असतं तर रोज 500 रुपये.. दिवसाला एक बाटली… आणि दोन टाईम मटन…कार्यकर्त्याला वाटत असतं साहेब फक्त आमचेच एकदा निवडणूक संपू दे साहेबांचा दारात कुत्रा पण विचारत नाही मग काय निराशा…चोऱ्यामाऱ्या मला सांगा कोणत्या नेत्याने कार्यकर्त्याला वर आणलंय आणि आणलं पण असेल तर कवा आणलयं माहिती का मतदार संघ राखीव झाल्यावर त्याला आपलं एखादं पद देऊन त्याचे पाय बांधून ठेवले स्वतः कायम गुरमीत वावरायचं 

                   कार्यकर्ते बनत असाल तर आणि निवडणुकीच्या काळात हजार पाचशेची रोजची लेवल बाटली…मटन बघून येणारे हे हंगामी कार्यकर्ते यांना याची कधीही निष्ठा नसतेच ते बेरोजगार असतात घरी बसून पत्ते कुटण्या ऐवजी अशा उपक्रमामध्ये सहभागी होतात मग मिळेल तो पक्ष प्रत्येकाचा आपला एक असा स्वार्थ असतो 100 मध्ये चार कार्यकर्ते वेडे असतील पण या चार लोकांना उशिरा अक्कल येत असेल पण हे चार वेडे तसे सगळीकडेच असतात तर आपण या चार मध्ये नाही याची खात्री असेल तर बिंधास कार्यकर्ता बना बिन भांडवली धंदा आहे भांडवल माणसं जोडायचं टॅलेंट असेल तर कार्यकर्त्याच्या रूपान अवश्य पुढे जायला काय हरकत नाही पण काही वेळा कार्यकर्त्याची अशी पंचायत होती की त्याच्या नेत्यांनी जर पक्ष बदलला तर हे अगदी बेवारशी झाल्यावाणी यांची गत होती कारण ह्यांचा नेता त्या पक्षात गेलेला असतो पण यांनी काही दिवसापूर्वी गेल्या निवडणुकीत त्यांना विरोधी भावनेतून घोषणेद्वारे अपशब्द वापरलेले असतात आता तो हाणणार नाही हे कशावरून पण एक आहे हे कार्यकर्ते जे मोर्चे काढतात…वेळ प्रसंगी दंगली घडवतात… प्रक्षोभक वागतात किंवा कृती करतात पण यांचा जो प्रमुख नेता असतो सहसा त्याच्यावर कधीच गुन्हा दाखल होत नाही हा असेल ही शंभरात नाही पण हजारांमध्ये एखादा नेता जो सर्व जबाबदारी कार्यकर्त्यांवर न ढकलता आपल्या अंगावर घेतो बाकीच्या नेत्यांना पोलीस स्टेशनला नेलं जात नाही तिथे आरोपी किंवा गुन्हेगार म्हणून मारहाण होत नाही हे सगळं होतं फक्त कार्यकर्त्यांच्या बाबतीत आणि एक विशेष असतं कार्यकर्ता साठ वर्षाचा होऊ द्या त्याला कार्यकर्ता म्हणूनच ठेवतात व तशी वागणूक देतात कारण नेता किंवा पुढारी बनणं हा त्यांचा अनुवंशिक हक्क असतोय बाप गेला तर पोरगा तयार पोरगा गेला तर पोराबरोबर…सून…नातू… व्याही…तयार तालुका पंचायत समिती …दुध डेअरी…विविध कार्यकारी सोसायटी… जिल्हा परिषद..साखर कारखाना…बँका…पतपेढ्या… कुठेतरी यांचं सेटिंग केलं जातं वर्णी लागते पण इथं आयुष्यभर कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहिला जातो… कार्यकर्ताच राहिला जातो…

*************************************

 किरण बेंद्रे

 पुणे

7218439002

litsbros

Comment here