करमाळाशेती - व्यापार

******** उजनीकाठचा भाजीपाला ********

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

******** उजनीकाठचा भाजीपाला ********
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


सगळ्यात प्रथम सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे… आपण म्हणतो उजनीकाठ… याचं पन्नास वर्षांपूर्वीच नाव भिमा तीर… आता जरी नवीन गावठाण असलं तरी माणसं तीच फक्त पिढी म्हणजे जनरेशन बदललंय…पहिली प्रत्येकाची पत्र्याची अन माळवदाची घरं आता सगळ्यांची स्लॅबची आहेत.. पहिली दारापुढे बैलगाडी असायची आता प्रत्येकाच्या दारापुढे फोर व्हीलर आहे… गोतावळा वाढलायं माणुसकी वाढतचं चाललीयं पहिला शुक्रवारचा बाजार जुन्या पोमलवाडी मधला तोच बाजार आत्ता शनिवारी केतुर नंबर 2 इथं सारं गुपित या एका उजनीकाठामुळे…एक साधी गोष्ट आहे आठवडे बाजारामध्ये किंवा भाजीपाल्याच्या ठेल्यावर गेल्यावर कोणती भाजी घ्यावी हा सर्वांना पडलेला गहन प्रश्न कारण शहरातली लोकं सहसा अर्धा किलो च्या वर किंवा पालेभाजी असल तर एखादी दुसरी पेंडी एवढ्यावर त्यांचं भागतं कारण चार पावलावर हा ठेला असतो सकाळ संध्याकाळ चार पावलं गेलं की टवटवीत भाजीपाला हजर… आता प्रश्न राहतो तो ग्रामीण जीवनाचा कारण माझं बालपण अस्सल ग्रामीण पोमलवाडी ला गेलयं पहिलं लोकेशन होतं भिमातीर आणि तेच पण आताच

 लोकेशन आहे उजनीकाठ म्हणजे पाणलोट क्षेत्र म्हणजे आपल्या करमाळा तालुक्यातील 28 गावं या पाणलोट क्षेत्रात गेली हे जरी खरं असलं तरी कितीतरी पटीने प्रगती झाली मी नवीन गावठाण वसाहतीत आता पाहिलं म्हणजे सर्वसाधारण 50 वर्षांपूर्वी सगळीकडे शेतात ज्वारी…हरभरा…भुईमूग… कायम असायचा भाजीपाला घेणारे म्हणजे मळईवाले हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते
पण तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप वेगळी आहे जनरेशन पण नवीन आहे पहिलं शेतामध्ये पिकवलेलं जाग्यावर नाहीतर स्थानिक पातळीवर म्हणजे आठवडे बाजार किंवा घरोघरी दारोदारी जाऊन विकायचे पण आत्ताच जनरेशन त्या मालासाठी मार्केट यार्ड नाहीतर साखर कारखान्याकडे डोळे लावून बसतयं एवढी आमच्यामध्ये प्रगती झाली बहुतेक क्षेत्र जिरायतीच होतं आता बहुतांश बागायती आहे आणि हा विषय निघाला भाजीपाल्याचा प्रत्येकाच्या पदरी थोडं फार तरी भाजीपाला फळबागाचं क्षेत्र पदरी असतं इथं उलाढालीचे एकमेव साधन म्हणजे त्यातल्या त्यात आठवडे बाजार आज सुद्धा आजूबाजूच्या खेड्यातील शेतकरी लोक आपले धान्य…भाजीपाला…फळं विकायसाठी आणतात आणि धान्याच्या राशीबरोबर बाजारामध्ये स्थान मांडून बसतात शेतकरी स्वतःच्या कष्टाने पिकवलेली भाजी स्वस्त आणि सढळ हाताने गिऱ्हाईकाला विकतात आणि दुपारी भरल्या खिश्याने परतीच्या प्रवासाला लागतात पण व्यापारी मात्र आपला मल खपवण्यासाठी अधिक ओरडून आपला मल किती चांगला आहे याची निश्चिती देतात बाजारातील

 भाजीची रांग पाहताना ही घ्यावी का ती घ्यावी असं होऊन जातं शिवाय ताजी आणि स्वस्त असल्यामुळे ग्राहकांची झुंबड उडते बाजारात प्रत्येक मालाची स्वतंत्र्य रांग असते पालेभाजी धान्य एकीकडे तर कपडे मासळी दुसरीकडे गिऱ्हाईक आणि मालवाले यांच्या मनोरंजनासाठी आपलं डबडं वाजवत माकडवाला येतो आठवडे बाजारामध्ये नेहमीचे दिसणारे दृश्य म्हणजे खरेदी करणाऱ्यांपेक्षा वस्तूची किंमत विचारणारे आणि उगीचच फिरणारे जास्त गर्दी करतात
आणि हो अजून एक या दिवशी विशेष म्हणजे सगळेजण जास्त खुश असतात कारण भाज्या…खाऊ…फळफळाव घेऊन प्रत्येकजण खुशीत असतो आणि इकडं विक्रेते खिशातून पैसे खुळखळवत घरी जातात आपल्या चिमुकल्यांसाठी खाऊ…खेळणी…चमचमीत मिठाई…खरेदी करतात आणि आता भाजीपाल्याबद्दल बघायचं झालं तर भाजीपाल्याबरोबरच जर भाजीपाला एखाद्या दिवशी मिळाला नाहीच तर बाजरीची भाकरी… हिरव्यागार मिरचीचा ठेचा…हरभऱ्याच्या पाल्याची भाजी…काहीजण ह्याला घोळाणा म्हणतात फक्त लसूण मिरची घालून परतलेली नाहीतर बेसनाची गरगटी भाजी म्हणजे आनंदी आनंद हिरवा हरभरा हाती येता क्षणीच बारकाईने निवडून साफ करून…दगडी खलबत्त्यात लसूण, मिरची, ओबडधोबड ठेचायची किंचितचे शेंगदाणे नेहमीपेक्षा थोडसं जास्त तेल लोखंडी कढईत सोडलं आणि परतलेली गरगटी अशा दोन्ही प्रकारच्या भाज्या बाजरीच्या भाकरी बरोबर सुखाने खातात ओली तुर…हिरवे ओले हरभरे…यांच्या हिरव्या मसाल्यातील उसळी आमटी आणि गरम गरम भात किंवा ज्वारी बाजरीची भाकरी सोबतीला लसूण मिरचीचा कोथिंबिरीचा ठेचा म्हंजे आनंदाची परमावली
चुलीवर ठेवलेल्या लोखंडी कढईमध्ये भाजलेले सोलाने…भाजलेला कवळा हुरडा… शेंगदाण्याची चटणी…तुरीच्या मिठात वाफवलेल्या शेंगा…शेकोटी आणि हवेतला गारवा म्हणजे माहोल तसंच हिवाळा अन रंगीबेरंगी भाज्या हे एक नैसर्गिक समीकरण तुरीच्या शेंगा…पावटा…मटार… देशी गाजर… रसदार लिंबं…ओली हळद… आवळे… गुजराती लाल मिरच्या…वालाची शेंग…पापडी…वेगवेगळी कंद…मुबलक पालेभाज्या तांदूळसा…पात्रा… पालक.. शेपु…चुका…करडई… असं कितीतरी देशी सीजनल संत्री…ऊस…बोरं असा समृद्ध करणारा शेतीमेवा असतो कडक उन्हामुळे भाज्या मान टाकतात म्हणजे सुकल्यासारख्या शिळ्या वाटतात मात्र हिवाळ्यामध्ये अगदी ताज्या आणि हिरव्यागार भाज्या हातात येतात कोथिंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध होते त्यामुळे ताज्या कोथिंबीरचा पीठ पेरलेला भगराळ… कोथिंबिरीच्या वाड्या… सूप ते कोथिंबीर वाळवून साठवण्यापर्यंत असंख्य प्रकार करता येतात याशिवाय भाज्या कोशिंबिरीची चव वाढवण्याचे काम ही ताजी हिरवी कोशिंबीर करते
आता बघा पालक…चाकवत… चवळी… करडई….मेथी…शेपू…कांद्याची पात…चंदन बटवा…आणि ओल्या हरभऱ्याचा पाला या सगळ्या भाज्या स्वयंपाक घराला सुद्धा ताजेपणा देतात पालकाची पचडी… सूर…मेथीचा कच्च्या तेलातला घोळाणा…गरगटी भाजी…चाकवताची ताकातली पातळ भाजी…आवर्जून खायला हवी याशिवाय ताजी ताजी लहान बोरं…मोठी खारकी बोरं…हिरवे खोबऱ्यासारखे दिसणारे आणि कडक लागणारे पेरू… खास कोल्हापुरी आंबट गोड संत्री चाखावीत…तर उजनी काठावरच आणि तेही हिवाळ्यात आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे भाजीपाल्याबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा आपण भाजी खरेदीला जातो तेव्हा काही वेळेला प्रश्न पडतो नेमकी कोणती भाजी घ्यावी कारण शहरी संस्कृती प्रमाणे किंवा ढाबा संस्कृती प्रमाणे शाही पनीर…बटर पनीर…मशरूम मसाला…स्पेशल पुणेरी थाळी…यामध्ये वेगळं असं काही नसतं फक्त पुणेरी थाळीपेक्षा या थाळीमध्ये असलेल्या जिरा राईस मध्ये डाळिंबाचे दाणे किंवा थोडीशी टूटीफ्रूटी टाकून डेकोरेशन केलेलं असतं स्टीलची वाटी दह्याची त्याऐवजी अमूलचं 100 ग्रॅमचं प्लास्टिकचं कंटेनर म्हणजे आर्थिक फरक जास्तीत जास्त दहा ते वीस रुपयाचा असतो पण त्या थाळी मधला फरक पन्नास रुपयाचा तफावत जाणवतो नुसता येडं बनवायचा धंदा का तर नुसता स्पेशल शब्द वापरला तर एवढा फरक म्हणून म्हणावसं वाटतं की आपला उजनी काठचं बरा… कारण इथल्या माणसांची भले घरं मोठी नसतील पण मनं नक्कीच मोठी आहेत
………………….***🌹***…………………….
किरण बेंद्रे
पुणे… थेट…कमल कॉलनीतून…
7218439002

litsbros

Comment here