आम्ही साहित्यिककरमाळापुणे

पोमलवाडीचा संभा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🌹🌹🌹 पोमलवाडीचा संभा 🌹🌹🌹
🚴🚴🚴🚴🚴


आता बघा काही कारणास्तव पुन्हा एकदा पोमलवाडीचे एक पात्र डोळ्यासमोर आलं अन सुरू झाली माझी शब्दांची मेजवानी…कारण असं माझा 50 वर्षांपूर्वीचा काळ आणि गावामध्ये दोन पाच दुकाना तर होत्याच पण काही अनामिक असं पात्र सुद्धा होतं की जिथे चार चौघांचा थांबा असायचा असाच एक थांबा म्हणजे गावचा संभा…व्यवसायाने विचारा चर्मकार पण गावचं एकुलतं एक लाडकं व्यक्तिमत्व…कारण नाही तर हिंडा अनवाणी काट्या कुट्यातनं नाहीतर भर उन्हाळ्यात त्या तापलेल्या मातीमध्ये पाय घोरपळून घ्यावे लागायचे तवा काही स्लीपर एवढ्या अस्तित्वात नव्हत्या प्रत्येकाकडं आपली एक अंगठा आणि एक पन्हा दोन ताळी चमड्याची चप्पल असायची खरं तर मला या समाजातील घटका विषयी नितांत आदर आणि कौतुक कारण त्यांचा काही शोरूम सारखा फिक्स रेट नसतो आपण जी देऊ ती बिदागी समजून प्रेमाने स्वीकार करतात काम अगदी थोडसं म्हणजे डागडुजी केल्यावानी तवा चलन तर काय होतं दहा पैसे वीस पैसे एवढ्यावर गिर्‍हाईकानी ती हातावर दिल्यावर त्या नाण्याला आपल्या धंद्याच्या हत्याराला टेकवून प्रत्येक वेळी भक्ती भावांनी नमस्कार करणार एवढेच काय आम्ही पाहिलयं दळणाच्या डब्यात त्याची कारभारीन पाच पैसे दहा पैसे जराचं कमी अर्धा डबा चिल्लर सासवायची हे पात्र कारण गावात बुट

 कोणीच वापरत नव्हतं वापरायचे ते स्टेशन मास्तर…हायस्कूलची सर मंडळी… बंडींगचे साहेब लोकं…किंवा तालुक्याहून आलेला एखादा अधिकारी अन दुसरा आमचा मा. बाळूमामा सुमंत तो एस टी स्टँड वर हमालीचं काम करायचा बूट चकचकीत असावा म्हणून दिवसातून दोनदा तीनदा पालीश करायचा आमच्या शेजारीच राहायला होता तवा कवा तरी गाव चकचकीत बूट बघायचं कारण आमचे मा.तुळशीराम मामा उगले आणि तिकडे मा.संभाजी व्हलर अशी दोघेचं नामवंत कलाकार कायम उपलब्ध असायची त्या पैकी माननीय तुळशीराम मामा हे माननीय दगडूमामा फाळके यांच्या घराशेजारी त्यांचे घर आणि अंगणातचं पोत्याचं नाहीतर छोटसं ताडपत्रीचं पाल पण ते रेल्वेत पाणीवाला म्हणून पण काम पहायचे व व्यवसायाशी पण एकरूप होते तर तिकडे मा. किसनराव पानसरे हे राहत असलेल्या रेल्वेच्या दगडी चाळीच्या बाहेरच्या बाजूला दोन-चार पत्र्याचं मातीच्या भेंड्याचं बांधकाम केलेलं एखाद्या खणाचं घर तिथेच शेजारी मा. भैरू पत्रेवाला हे पत्र्याच्या बिस्किटाच्या डब्याला कडी कोयंडा बसवून दळणाचा डबा तयार करून देण्यामध्ये त्यांचा हातखंडा तसं पाहायला गेलं तर हा सुद्धा एक नामांकित कलाकार सकाळी उठून कुठेही एखादी वाडी वस्तीवर किंवा शेजारच्या गावात फेरफटका मारला तर संध्याकाळी येताना ओंजळ दोन ओंजळी चिल्लर जमा करायचा तर असे हे आपल्या समाज घटकापैकी आदरणीय घटक परंतु हे संभाजी मा. राधेश्याम शर्माच्या हॉटेलच्या समोर रोडच्या पलीकडे वडाच्या झाडाखाली सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे 24 X 7 असे उपलब्ध असायचे
सोलापूरच्या भागवत थिएटरला एक वरदान आहे की रोज

 चार विटाचं तरी बांधकाम झालं पाहिजे त्यानुसार जुनी भिंत पाडून कायम कुठे तरी विटाचं बांधकाम चालू असतं तसं जवर ही व्यक्ती वडाखाली बसलेली आहे तोपर्यंत पाच पैसे दहा पैसे का असेना पण कायम आपला पैशाचा झरा चालू असायचा कोणाचा बंध तुटला कोणाचा अंगठा तुटला कोणाच्या चपलेला टाळे मारून दे अशी कलाकारीची कामं करायची आणि पोमलवाडीमध्ये जरी आठवड्याचा बाजार शुक्रवारी असला तरी बाहेरगावची मंडळी म्हणजे चांडगाव…केतुर…पोमलवाडी गावातले…इकडे खातगाव…टाकळी…गुलमरवाडी…तिकडे जिंती रामवाडी.. पारेवाडी… हिंगणी… अशा मंडळींचा कायम राबता पोमलवाडीमध्ये असायचा कारण रेल्वे नाहीतर एस टी साठी इथेच यावं लागायचं बाहेर गावाहून आलेले इथे उतरायचे त्यातल्या त्यात दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंत गाव कसं गजबजलेलं असायचं कारण या काळामध्ये खालची पॅसेंजर आणि वरची पॅसेंजर यांची वर्दळ असायची करमाळा राशीनला जाणाऱ्या एस टी गाड्या पण त्याच वेळेला यायच्या आणि आपल्या मार्गे निघून जायच्या
आता अजून एक विचार केला तर तो परिसर पाहिला तर श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचा परिसर त्याचं काय झालं असंच एके दिवशी मॉल मध्ये फिरत असताना रॅकमध्ये मांडलेल्या फॅशनेबल चपलांच्या किमती बघून डोळे अक्षरशः पांढरे झाले एकेकाळी गावच्या बाजारपट्टीत आपल्या माणसाकडे मिळणाऱ्या या पायतानांना इतकं ग्लॅमर प्राप्त झालेलं बघून मन कसं हरकून गेलं पण क्षणभर गावचा वडाखाली बसणारा संभा ध्यानात आला मॉलच्या काचेतून बाहेर बघितलं तर रोडच्या पलीकडे समोरच्या झाडाखाली संभाचं असल्याचा भास झाला अंगावर मळकट सदरा…केस पिंजारलेले… कळकटलेला पायजमा…वडाच्या झाडाखाली हमखास बसलेला दिसायचा समोर रापी…टोचा खिळे… जाड दोऱ्याच्या दोन-तीन गुंड्या… सोबत चपलांच्या भल्या मोठ्या डिगामध्ये सकाळची कवळी उन्ह अंगावर घेत पायतान शिवत बसायचा

आणि बाजूला असलेल्या सानेवर आधी मधी रापी उलटी पलटी करून घासायचा घासलेल्या रापीने पायतानावर बारीक-बारी छटा मारायचा झिजून झिजून तुटलेल्या चपलीच्या तळाला पुन्हा चामडं कापून ठिगळ जोडून बसवायचा त्याच्यावर नवे कोरे शिवलेले अंगठे शिवारातल्या पिकागत उभे राहायचे एखाद्या पायतानाचा तळ निसटला असला तर जुना जाडसर टायर कापून तो पायतानाच्या तळाला आकार देऊन लावायचा नवं पायतान तयार करताना तो असं काही खालून तळ जोडायचा की चार-पाच वर्षे तरी पायतान निसटणार नाही बांधलेल्या नव्या कोऱ्या पायतामाला तेल लावून मुरवायचा तेल प्यायलेलं पायतान रस्त्यावरून जाताना कारकार आवाज करायचं त्याच्या कामात कधी फसवेगिरी नाही का कधी लांडी लबाडी नाही फेकलेल्या शब्दाला जागणारा प्रामाणिक होता संभा…असाच मी श्रीगोंदा साखर कारखाना परिसरामध्ये एक कलाकार पाहिला खरोखरच होतकरू कलाकार निसर्गाने काही तरी किमया घडवून दाखविण्यासाठी त्याला विशेष कला बहाल केली होती असं म्हणावं लागेल
आपल्या समाज व्यवस्थेतील महत्त्वाचा कणा सालभर मोडकं…तोडकं… तुटकं… शिवून द्यायचं कुणाच्या विहिरीवरच्या मोटची… कोणाच्या पखालीची…कामं करून द्यायची ही सारं वरदान म्हणायचं कुणाच्या चाबकाच्या वाद्या वळायच्या… बैलाच्या गळ्यातील चामडी घुंगर पट्टे बनवायचे… तंबाखूसाठी चामड्याचा बटवा बनवायचा…नाही तर नवा बांधलेला पायतानाचा जोड मात्र विकतच घ्यावा लागायचा बलुत्याच्या म्हणजे बैत्याच्या बदली सुगीच्या दिवसात खळ्यावर पोतं घेऊन गेल्यावर त्याला धान्य मिळायचं त्यावर सालभर त्याची गुजरान चालायची सुगी सुरू झाली की संभा सायकलीवर रिकामी पोती अडकवून बाहेर पडायचा तर शिवारात मळणी चाललेल्या खळ्यात एका टायमाला जाईल तेवढे म्हणजे साधारण पाच पंचवीस किलो धान्य प्रत्येक जण द्यायचा शेंगा सकट भुईमुगाचे वेल न्यायचा हक्काने वैरण गाडी कापायचा इतर वेळात तो मारुतीच्या पारासमोर वडाखाली चपलांच्या ढिगार्‍यात एकजीव व्हायचा
त्याची कारभारीन बिचारी मुलांसोबत नदीच्या कडेला असलेल्या पिढी जात मिळालेल्या शेताच्या तुकड्यावर दिवसभर राबताना दिसायची कधीमधी संभा पण चांभारकीच्या शेतात दिसायचा शुक्रवार म्हणजे दिवाळी गावचा आठवड्याचा बाजार आठवडाभर शेतामध्ये राबणारी पावलं त्या दिवशी हमखास पोमलवाडीकडे फिरकायची तवा काय आपली पायपिटच असायची गावात एखाद दुसऱ्याकडे सायकल असायची नाही तर आपली बैलगाडी जुपायची गर्दीत फुलून गेलेल्या आठवडी बाजाराच्या गर्दीत संभाची स्वारी दिसायची गावच्या मुख्य टेळ्यावर याची बसायची जागा रस्त्याच्या पलीकडे चिंचेच्या झाडाखाली मोरेची जुगारीची चक्री त्यामुळे माणसांचा राबता तिथे जास्त असायचा खेळणाऱ्या पेक्षा बघणारेच जादा असायचे
वर्षानुवर्षी संभा याच जागेवर बसलेला दिसायचा आजूबाजूच्या 10-12 गावातले तर संभाला चांगलेच ओळखायचे बाजारच्या दिवशी अशी ओळखीची लोकं चपलीचं गाठोडं आणून त्याच्यापुढे ओतायची त्या दिवशी त्याची मान वर होत नसे वर वडाची सावली त्यामुळे त्याला छत्रीची गरज कधी भासलीच नाही आजूबाजूला गारेगार सावली आणि वाऱ्याची झुळूक दुपारच्याला घास कुटका खाल्ल्यावर गडी बसल्या बसल्यास डुलक्या काढायचा उन्हं कलू लागली की साडेपाच वाजता समोरच्या मा.राधेश्यामच्या हाटेलातनं 15 पैशाची गोल कांदा भजी आणून वडाखालीच बसून खायचा कधी कधी सोबत बटराचा पुडा पण असायचा दिवस मावळतीला गेला की बाजार उठायचा पुढ्यात असलेलं सामान घेऊन संभा घराची वाट धरायचा
वर्षामागून वर्ष वर्ष गेली गाव पण पाण्यात गेलं तिथल्या साऱ्यांनी नवीन गावठाणात बस्तान बसवलं गेलेल्या त्या चांगल्या वाईट दिवसाबरोबर नवीन गावाला झळाळी आली कच्च्या रस्त्यावर डांबराची चकाकी उमटली गाव नवी कापड घालून दिमाखात सजू लागलं याच काळात रबराच्या रेडिमेड चपला शहरातून गावात घुसल्या सगळीकडे रबराच्या आणि प्लास्टिकच्या चपलांचा सुळसुळाट संभा मनातून थोडासा खिन्न वाटत होता कारण या चपला म्हणजे वापरायच्या आणि फेकून द्यायच्या रिपेअर कुणी करीतच नव्हतं युज अँड थ्रो जमाना सगळीकडे रेडिमेड चपलाची दुकान सजली संभाने पण असलच एक दुकान सजवलं आणि एकदाचा स्थिरस्थावर झाला त्याचं सुद्धा एक छोटसं दहा बाय दहाच शोरूम निर्माण झालं समोर वरपासून खालपर्यंत काचा लावल्या गेल्या
गावठाणातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व
काळाच्या ओघात असलं तरी विसरून कसं बरं चालल
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
किरण बेंद्रे
थेट… पुण्याहून
7218439002

litsbros

Comment here