आम्ही साहित्यिक

🌹🌹आण्णा, आप्पा अन तात्या 🌹🌹

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🌹🌹आण्णा, आप्पा अन तात्या 🌹🌹

               **********************

       मी माझ्या लेखणीतून ती पोमलवाडी माझं गाव ती माझी शीव कित्येकदा तरी साकार केली असल आणि त्यामध्ये काही वेळा त्या ठराविक जागा… पन्नास वर्षांपूर्वीचे प्रसंग… ती जुनी माणसं… ठिकाणं…आठवणी…यांची सदैव मला मांडणी करायची सदा हौस कारण काय तर एकच पोमलवाडी काय माझं मुळगाव नाही माझं मुळगाव भांड्याचं अमळनेर तालुका पाटोदा जिल्हा बीड पण काही कारणाने माझा बाप हातावरचं पोट घेऊन रेल्वेची नोकरी करायला पोमलवाडीला आला तवा एक आखरीत घडलं म्हणजे तो काळ होता 1965 चा पोमाईनी… पोमलवाडीकरांनी…पोमलवाडीच्या मातीनी… जीवापाड प्रेम दिलं आणि त्यांच्या सहवासामुळे माझ्यावर खरंतर कोवळ्या मनावर ते ग्रामीण संस्कार घडले खेड्याचे सवंगडी भेटले नंतर सारं म्हणजे शाळा झाल्यावर वयाच्या पंधराव्या वर्षीच खऱ्या अर्थाने मी मोठा झालो.

       अंगावर जबाबदारी पडली कमवायला लागलो आणि त्या धावपळीमध्ये आपण साठीच्या उंबरठ्यावर कवा आलो कळालच नाही वर्षातून फक्त एकदा आपण किती मोठे झालोय ही वाढदिवसाचा केक कापताना कळायचं पण मला रेल्वेच्या कामांमध्ये एक सहकारी नेहमी म्हणायचा सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा आणि यांची संगत नको रे बाप्पा या प्रेरणेमुळे ही चार शब्द लिहायचं बळ मिळालं बहुदा ग्रामीण भागात हे समाजातील तीन घटक अत्यावश्यक असतात म्हणजे बघा प्रत्यक्षात आपण पाहू प्रत्येक गावातील शिंपी हे बहुदा शिवणकाम असो किंवा नसो पण टेलरच्या दुकानात किंवा अवतीभवती रेंगाळणारी बहुतेक मंडळी आपल्याला सदैव पाहायला मिळते म्हणजे हे क्षेत्र सदैव गजबजलेलं दिसतं कोणताच टेलर लई टेन्शनमध्ये एका बाजूला नाराजपणे बसून शिवणकाम करतोय असं कधीच दिसत नाही

       त्याच्या आजूबाजूला चार जणांचं कोंडाळं सदैव असल्यामुळे सदा न कदा जागं वातावरण वाटतं एका दृष्टीने असं म्हणावं लागल की सगळ्या जगाची अब्रू झाकणारा हा घटक म्हणजे समाजाच्या खूप उपयोगी कारण आपल्या अंगावरची सदरा चड्डी ही काही घरी सुई दोऱ्यांनी शिवता येत नाही म्हणजे आवर्जून यांची आपली गाठ पडते तर दुसरं कारण म्हणजे गावकरी मग लहान असो किंवा मोठा असो महिलावर्ग असो किंवा कोणी आदराने त्यांना त्यांचं नाव घेऊन पुढे आण्णा पण म्हणतात दुसरा घटक म्हणजे सोनार सर्वप्रथम माहिती असावी म्हणून सांगतो कारण लेखक हा सोनार आहे फक्त नावाने बरं का व्यवहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर याला धंद्याचं काही सुद्धा ज्ञान नाही कारण पूर्ण हयात रेल्वेमध्ये नोकरी करण्यात गेली म्हणजे भटकंती आलीचं पण या घटकाला ग्रामीण भागामध्ये एक विशेष असा मान

       एकाद्या लग्न घरी भले घरात देव्हारा असो किंवा नसो लग्नाच्या देवक पूजेच्या वेळी आपल्या पूर्वजांचे चांदीचे टाक करणे आवश्यक असते अन अगोदर या सोनार तात्याला आदरपूर्वक ऑर्डर किंवा पत्रिका दिली जाते हळदीच्या दिवशी मुलाचे किंवा मुलीचे आई-वडील किंवा चुलतेमंडळी वाजत गाजत शिधा सोनार तात्याला आदराने देतात तिथे गेल्यावर प्रथम सोनाराची व ऐरणीची यथा सांग पूजा केली जाते उभयतांना पूर्ण पोशाख टोपी…टावेल… साडी…चोळी…ओटीचे सामान… वाजत गाजत नेऊन त्याला मान दिला जातो मागेपुढे एक एक माणूस त्या घोंगडीची ची दोन टोकं हात उंचावून धरतो देवक आणताना देवक घेतलेली व्यक्ती कुऱ्हाडीच्या दांड्याने वरच्या बाजूला त्या घोंगडीला टेकू देतो सोनार तात्याचा मळवट भरून त्याच्या सौभाग्यवतीला हळद कुंकवाचा मान देऊन ओटी भरून पूर्वजांचे टाक वाजत गाजत आणले जातात

       खूप विलोभनीय प्रसंग असतो तो आणि एरवी हे तात्या बहुतेक बलुत्याचीचं कामं मोल मजुरीच्या रूपाने करीत असतात आता तिसरा घटक कुलकर्णी आप्पा म्हणजे बघा आपण त्यांना गुरुजी म्हणतो आणि या शब्दाचा महिमा असा आहे बघा लग्न कार्यामध्ये घरगुती स्वरूपात व्रत वैकल्याच्या समाप्तीच्या वेळी आपणाला पूजा घालणे आवश्यक असते त्यावेळी हे आप्पा भिक्षुकीचे काम करतात म्हणजे महत्त्वाचं कार्य घरातला कर्ता पुरुष वय 70 वर्ष अन पूजा घालणारे गुरुजी त्यांचं वय 30 ते 35 च्या आसपास त्यांना गुरुजी व आहो जाहो बोलावं लागतं आणि हीच तर खरं कौतुकाची बाब आहे आम्ही आमची संस्कृती जोपासतो खूप अभिमान वाटतो आपण आता सोनाराचं कार्यक्षेत्र पाहू कारण आपल्याला सोनार दागिने घडवतो व तो सोन्या-चांदीशी संबंधित असतो म्हणून तो श्रीमंत अशी धारणा आहे एवढंच 

        आपला म्हणजे घरातला..अंगणातला हॉटेलातला… दुकानातला…झाडलेला कचरा… म्हणजे झिरो व्हॅल्यू मटेरियल आपण उकिरड्यावर जमा करतो पण सोनाराचं दुकान झाडलेला कचरा विकत घेणारा समाजातील एक घटक त्याला झारेकरी असं म्हणतात तर तो झारेकरी मौल्यवान भावाने कचरा खरेदी करून त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून काहीतरी टक्केवारीमध्ये तो त्याची कमाई करतो तो पण सोनाराच्या चार पावलं पुढं पोहोचलेला असतो या कचऱ्यात किती सोन्याचे कण किंवा चांदीचे कण आहेत हे पाहण्यासाठी देवाने त्याला तीक्ष्ण नजर दिलेली आहे ते बघूनच तो भाव ठरवतो सोनार 12 बलुतेदारांपैकी एक पण इतरांचं काम नेहमी उघड्यावर रस्त्याने जाता येताना आपल्याला सहज नजरेला पडतं पण सोनाराचं काम मात्र कोणाच्या नजरेस पडू नये असं हाय सिक्युरिटी झोन मध्ये चालतं प्रखर आचं देणारी खास प्रकारची शेगडी त्याला बागेसरी म्हणतात त्यावर लहानशी मूस त्यामध्ये वितळलेला सोन्याचा नेत्रदीपक चमणारा द्रव सोन्याच्या गोळ्यापासून पत्रा किंवा तार बनवायची अलंकाराला निरनिराळे आकार देणारे नाजूक अवजारं अत्यंत नाजूक असे अलंकार दागिने बनवून त्यावर वेलबुट्टी…पानं…फुलं… चास कोरणे हे कौशल्य…जर एका तोळ्यात 200 मनी करायचे असतील तर सोन्याचा पत्रा काढून त्याचे 400 तुकडे करायचे ते तुकडे किंवा मणी सांभाळायचे हे खूप महत्त्वाचं काम असतं त्यासाठी नजर फार तीक्ष्ण ठेवावी लागते एक-दोन तुकडे जर गहाळ झाले तर देताना वजनात कमी आले म्हणून ते नुकसान सोसावे लागते मजुरीतून पैसे कापून घेतले जातात नाहीतर पदरचं सोनं घालून त्याची भरपाई करावी लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जरी नाक किंवा कान टोचताना पंचिंग मशीन निघाले असतील तरी अजूनही सोनाराकडूनच कान टोचून घेण्याची प्रथा आहे कारण एक तर टोचलेला कान दुखत नाही आणि लवकर लागतो आणि समाजामध्ये पण ठराविक योग्य माणसाने केलेल्या कामाची अंमलबजावणी ताबडतोब होते बाकीच्यांनी किती पण प्रयत्न केले तरी फेल जातात त्याला म्हणतात सोनारांनीचं कान टोचावं लागत्यात दुखत नाही हे सगळं जवळून पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच असते

       पोमलवाडी जुन्या गावांमध्ये मा.डिगा सोनार नावाचं पंचक्रोशी मध्ये एक लाडकं व्यक्तिमत्व होतं आत्ताच्या गावठाणात म्हणजे केतुर नंबर दोनचा परिसर तिथं असलेले कुशल कारागीर माननीय महेश महामुनी सारखे कारागीर नावारूपाला आलेले आहेत आता दुसरा घटक म्हंजे शिंपी लोकमान्यता पावलेला एक घटक माझ्या लहानपणीचं सांगतो त्यावेळी आमच्या गावामध्ये नामांकित असे मा.अण्णा माने… मा.सुखदेव माने, मा.मेहबूब शेख… मा.गोविंदराव जगताप मा.नेमिनाथ होरणे यांच्यासारखी मातब्बर मंडळी शिवणकाम करणाऱ्या कलाकारांची फळी सदैव तैनात असायची त्यांच्या हातचं कसब वाखाणण्याजोगं होतं कि बिसनशेठच्या दुकानातून ताग्यातून कापड आणून त्यांना द्यायचं पोरगं किंवा पोरगी घरी असायची पण रस्त्यानी जाणारी पोरं ही चिल्लर कंपनी लांबूनच दाखवायची अन नुसतं ह्याच्या पेक्षा उजवं किंवा ह्याच्या पेक्षा डावं एवढा कोड वर्ड वापरायचा काय ती उंची… कंबर…छाती… जाडी… हाताची बाही…सगळं अंदाजे त्यांचं माप असायचं त्यांनी शिवलेली कापडं मापामध्ये फिट बसायची तसं आताच्या परिसरामध्ये म्हणजे केतुर नंबर दोन मध्ये मा.हिरालाल धोकटे व लेडीज टेलर माननीय बाबूलाल शेख हे निष्णात कलाकार पाहायला मिळतात तर त्यावेळी सुद्धा गावामध्ये चार-पाच सिंगर मशीन होत्या अगदी घरोघरी नसल्या तरी या लोकांच्या घरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून असायचा

       साधारणपणे दोन-तीन सहाय्यक कामगार ऑर्गन वाजवण्याच्या स्टाईल मध्ये त्यावर खडखडाटाची जुगलबंदी करून खेळत बसतात असं वाटायचं आणखी एक दोघं जमिनीवर बसून इथं काम करताना दिसायची कपडे बेतायचं सर्वात महत्त्वाचं काम दुकानाचा प्रमुख मालक टेलर मास्टर स्वतः करायचा त्यांच्या वहीत लिहिलेल्या आपल्याला अगम्य वाटणाऱ्या आकड्यांच्या आधाराने तो कापडावर खुणा करायचा व त्यांना जोडून सरळ किंवा वाकड्या रेषा मारायचा त्यासाठी चपट्या आकाराच्या विशिष्ट खडूचा वापर करायचा टेलर दुकान सोडलं तर तो खडू कुठेच वापरलेला मी पाहिलेला नाही दुकानातला इतर कोणीतरी माणूस त्या रेषा वरून कात्री फिरवून त्या कापडाचे तुकडे पाडायचा त्यात कोणी खिसे कापायचे कोणी गळे कापायचे हा सुद्धा एक प्रोटोकॉल ठरलेला असावा ग्राहक आणि दिलेल्या कापडामधून त्याच्या पोशाखाला लागतील तेवढे तुकडे कापून घेतल्यानंतर उरलेले कापड शक्यतो एक संघ निघावे अशा तऱ्हेने ते तुकडे कापले जात असत

       त्यानंतर उरलेल्या कपड्याच्या तुकड्यातून कोणती वेगळी कलाकृती तयार करून विकता येईल याचेही काही ठिकाणी नियोजन व्हायचं खरोखर ही सुद्धा एक कला आहे त्यानंतरचा घटक म्हणजे आपले कुलकर्णी आप्पा म्हणजे ब्राह्मण गुरुजी गावातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि स्थान आपलं प्रत्येक कुटुंबाचं आदराचं स्थान पहिलं जुन्या पोमलवाडीमध्ये पूजा अर्चा करायचे तो विधी करण्यासाठी माननीय लंके व माननीय जोशी गुरुजी तत्पर असायचे आता नवीन गावठाणा मध्ये गुरुजी उपलब्ध नसले तरी खातगावचे माननीय बाळकृष्ण कुलकर्णी व हिंगणीचे माननीय निलेश कुलकर्णी ही मंडळी येतात व गावामधील पूजा आर्चा विधी संपन्न करतात एका दृष्टीने या कुलकर्णी आप्पांचं कार्यक्षेत्र कुणाला माहीत नाही त्याचं काय झालं

       सोनार शिंपी काय करतात हे सर्व सामान्य लोकांना लगेच समजतं परंतु कुलकर्णी काय करतात किंवा करायचे याची व्याख्या कशी करता येईल हे मात्र कोणालाच सांगता येणार नाहीत इतिहास काळामध्ये गावागावामधून शेतसारा म्हणजे कर अथवा महसूल गोळा करणे त्याचा हिशोब ठेवणे राजा महाराजांच्या पदरी जहागीरदार… वतनदार जो कोणी शासक असेल त्याला तो पोहोचविणे व रेकॉर्ड किपिंग तसेच बुक किपिंगची कामं करायची आणि या घटकाला कुलकर्णी हा किताब असायचा या कामासाठी लहान खेडेगावी किंवा गावांमध्ये तलाठी नेमले गेले नंतर कुलकर्णी हा पेशाआता राहिला नाही हे वरील सर्व घटक खरोखरच समाजाला फार उपयोगी पडायचे

       आणि एकंदर दुसऱ्या बाजूने व्यवहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे सर्व घटक समाजातील दुसऱ्या इतर लोकांचे सोने… कापड व मालमत्ता यांचा व्यवहार बहुधा या लोकांकडे असायचा खरोखरीच वरील घटकांचा आदराने विचार केला पाहिजे आणि विशेष म्हणजे प्रत्येक बलुतेदारांना म्हणजे समाजातील विशेष घटकाला निसर्गाने एक वरदान बहाल केलेले आहे ते म्हणजे त्यांच्या अंगी असलेली वेगवेगळी कला…साध्या कपड्यापासून अंगावर पोशाख बनवणे…सोन्याच्या वितळलेल्या पाण्यापासून नेत्र दीपक अलंकाराची निर्मिती…तसेच आपल्याला जरी मंत्र…आरत्या… विधी…पाठ असल्या तरी ते समाजाला काय आपल्या घरच्यांना सुद्धा आपण केलेलं मान्य नसतं त्यामुळे या ठिकाणी गुरुजीच पाहिजे असा अट्टाहास तेव्हा कुठे आपल्या व्रताचा संकल्प पूर्ण झाल्याचं मनसोक्त समाधान मिळतं

😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

किरण बेंद्रे

पुणे

7218439002

litsbros

Comment here