खातगाव शाळेमध्ये रमजान ईद साजरी करत दिला सर्वधर्मसमभावाचा संदेश

खातगाव शाळेमध्ये रमजान ईद साजरी करत दिला सर्वधर्मसमभावाचा संदेश

केतूर (अभय माने) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. 2 या शाळेत आज मोठ्या उत्साहाने रमजान ईद साजरी करण्यात आली.

“शाळा हे केवळ ज्ञानादानाचेच ठिकाण नसून विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य आणि नैतिक मूल्य रुजवण्याचेही महत्त्वाचे केंद्र आहे” हा विचार करून खातगाव नं.2 शाळेमध्ये नेहमी सर्वांगीण शिक्षणावर भर दिला जातो. शाळेमध्ये प्रत्येक जाती-धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे करून विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य जोपासण्यासाठी आवर्जून प्रयत्न केला जातो.

त्याच विचाराने प्रेरित होऊन आजही सकाळीच मुले शाळेत आली आणि रमजान ईद सण उत्साहात साजरा केला. या उपक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी रमजान ईद निमित्त आपल्या शाळेतील मुस्लिम बांधवांना “ईद मुबारक ” अशा शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली.

यावेळी शाळेच्या परिसरातील हिरव्यागार झाडांच्या सावलीमध्ये सत्तार सय्यद या पालकांनी विद्यार्थ्यांसाठी गुलाब जामुन, सोनपापडी, ड्रायफ्रूट हलवा, बालूशाही, मोतीचूर लाडू आणि शेव चिवडा अशी मिठाईची मनसोक्त मेजवानी उपलब्ध करून दिली. तर शब्बीर शेख या पालकांनी विद्यार्थ्यांना”गुलगुले आणि शिर – खुरमा” यांचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी उपलब्ध करून दिली.

यावेळी शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यांनी सर्वांनी एकमेकांना” ईद मुबारक” च्या शुभेच्छा देत हा सण साजरा केला आणि धार्मिक सलोख्याचे संस्कार शाळेतून राबविले जातात याची प्रचिती उपस्थित सर्वांना दिली.

शाळेतील शिक्षक बाळासाहेब बोडखे यांनी विद्यार्थ्यांना आपण कोणत्या कुटुंबात, जाती, धर्मात जन्माला यावे हे आपल्या हातात नसते पण आपण एकमेकांना सहकार्य करत आणि एकमेकांशी प्रेमाने वागत कसे जगले पाहिजे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. धार्मिक सलोखा राखणारा आणि विद्यार्थ्यांना बालवयातच धार्मिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार देणारा हा आगळावेगळा उपक्रम शाळेत राबवून या सर्वांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला.

हेही वाचा – करमाळ्यातील पोथरे गावात अनोखा उपक्रम! 300 आई- वडीलांची रथात बसवून काढली मिरवणूक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेतून वांगी गावचे सुपुत्र चि.श्रीराज देशमुख यांची कृषी अधिकारी म्हणून निवड

ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन राबवलेला हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक संजय गोरवे तसेच उपशिक्षक बाळासाहेब बोडखे यांचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले.

” राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभाव मुलांच्या कोवळ्या वयात रुजण्यासाठी पोषक उपक्रम उत्तम पद्धतीने घेतला आहे
आपल्या सर्वांचे खूप कौतुक
यातूनच उद्याचा एक भारत श्रेष्ठ भारत घडत आहे.”
— डॉ.नेहा बेलसरे उपसंचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे

karmalamadhanews24: