करमाळा तालुक्यात ग्रामीण भागात भाजीपाल्याचे दर वाढले: शंभरी पार !
केत्तूर (अभय माने) जूनच्या पहिल्या आठवड्यात करमाळा तालुक्याचे काही ठिकाणी समाधानकारक काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी अत्यल्प पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील आठवडा बाजार भाजीपाल्याने शंभरी पार केल्याने कभी खुशी कभी गम अशी अवस्था ग्राहकाबरोबरच विक्रेत्यांची झाली आहे.
तालुक्याचे ग्रामीण भागातील आठवडा बाजारात सर्व प्रकारच्या भाजीपालाचे दर 30 रुपये पावशेर म्हणजेच 120 रुपये किलो अशा प्रकारे झाले आहेत. कोबी, फ्लॉवर, गवार, भेंडी, वांगी, कारले याची दर तीस रुपये पावशेर तर कांदा पंचवीस ते तीस रुपये किलो, टोमॅटो साठ रुपये किलो बटाटा चाळीस रुपये किलो तर हिरव्या मिरचीचा तिखटपणा आणखी वाढला आहे 120 रुपये दर झाला आहे. कोथिंबीरने मात्र भाव खात असून एक पेंडी 20 ते 25 रुपये दराने विकली जात आहे.राजगिरा, तांदूळसा, पालक, चुका, मेथी पंधरा ते वीस रुपये पेंडी या दराने विकली जात आहे.
अगामी काही दिवस भाजीपाल्याची ही स्थिती अशीच राहण्याची संकेत मिळत आहेत.कारण सर्वच भाजीपाल्याची आवक घटली आहे. भाजीच्या भावात वाढ झाल्याने ग्राहक निवडून भाज्या घेत आहेत.मध्यतंरी सलग झालेल्या पावसाचा फटका भाजीपाला पिकाला बसला आहे त्यामुळे दर वाढत आहेत.
हेही वाचा – उमरड येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांना अभिवादन; दहावीतील गुणवंतांचा ही झाला सत्कार
कडधान्यही कडाडली —
पावसाची लगबग सुरू होताच दरवर्षी कडधान्याला तेजी येते. मटकी, हुलगा, चवळी ही कडधान्य सरासरी 80 ते 100 रुपये किलो या दराने विकली जात आहेत.भाजीपाल्याचे दर तेजीत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र चाट बसू लागली आहे.